आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य
‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे
घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे!
खरंच आपण लहानपणापासून हे ऐकत आलोय. किती गहन अर्थ सामावला आहे यात! जगात नेहमी घेण्यापेक्षा देण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण मागू ते आपल्याला मिळेलच याची शाश्वती नसते, पण आपण मनापासून एखादी वस्तू दिली आणि ती कोणी स्वीकारली नाही असे क्वचितच घडते. तथापि, असेही म्हटले जाते की, ‘देणाऱ्यापेक्षा घेणारा श्रेष्ठ असतो’ फक्त देताना अहंकार नसावा, ‘मीपणाची भावना नसावी, ‘मी’ कोणाला तरी काहीतरी देतोय म्हणून त्याला मिळतंय ही भावना नसावी. देतानाची भावना साफ असावी. फक्त घेणारा ती गोष्ट मनापासून घेत आहे किंवा नाही हे पाहणेही महत्त्वाचे आहे. कारण काही जण स्वाभिमानी असतात त्यामुळे त्यांच्या स्वाभिमानाला तडा पोहोचू न देण्याची जबाबदारीही आपलीच असते. घेणाऱ्याने ती वस्तू किंवा गोष्ट घेण्यास नकार दिला तर आपल्याला वाईट वाटणे साहजिकच आहे. कारण आपण त्याचे दुःख किंवा काळजी मिटविण्याचा प्रयत्न करतो; परंतु ती मदत त्याला नको आहे. पण असे असले तरीही शांतपणे बाजूला व्हावे त्याचा राग मनात धरू नये.
प्रत्येक गोष्ट पैशात मोजता येत नाही. त्यामुळे देणारा खूप श्रीमंत असला पाहिजे हे जरूरी नाही. अगदी गरिबातला गरीब व्यक्ती सुद्धा ‘देणारा’ बनू शकतो. फक्त दुसऱ्याला देण्याची दानत किंवा दुसऱ्याला देण्याची वृत्ती असावी लागते. दानाचे अनेक प्रकार आहे. दिल्याने आपले कधीच काही कमी होत नसते, उलट वाढतेच. अनमोल असे अवयव दान करून एखाद्याच्या जीवनात आनंद, खुशी निर्माण करू शकतो. देता येण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. असे म्हणतात, माणूस जन्माला येतो तेव्हा तो अनेकांचे देणे त्याला द्यायचे असते. उदा. समाजाचे देणे, मातृभूमीचे देणे, निसर्गाचे देणे इ. अन्नदान, वस्त्रदान, शिकण्याची इच्छा असलेल्यांना ज्ञानदान, श्रमदान, निराश, हताश झालेल्यांना आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन, मनाची उभारी, खचून गेलेल्यांना धीर देणे या गोष्टी पण देऊ शकता, यात देण्याची गोष्ट दिसत नाही किंवा घेणाराही घेताना दिसत नाही; परंतु ज्याची चिंता, काळजी किंवा आवश्यक व्यक्तीला दिलेला धीर याने आपल्याला जी मानसिक शांती मिळते. त्या व्यक्तीचे आशीर्वाद आपल्याला खूप काही देऊन जातात आणि त्यातूनही घेणाऱ्याकडून घेण्याची इच्छा झाल्यास चांगले गुण, शांत स्वभाव, सहिष्णुता, कृतज्ञता, इतरांच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्यांच्या आनंदाचे कारण आपण स्वतः बनणे इ. असे काही गुण हेरून स्वतःमध्ये त्याचा अवलंब करू शकता. त्यात कठीण असे काहीच नाही फक्त इच्छा हवी. वेळ लागेल पण सहज साध्य होऊ शकते. कोणतीच व्यक्ती परिपूर्ण नसते, मग ती व्यक्ती श्रीमंत असो किंवा गरीब. प्रत्येकात गुण दोष असतातच. त्याची तीव्रता कमीजास्त असू शकते. प्रत्येकातील दोषांकडे दुर्लक्ष करून त्या व्यक्तीकडून कोणते गुण घेता येतील ते पाहणे गरजेचे आहे. दुसऱ्यांमधील चांगले गुण नेमके हेरून ते आत्मसात केले, तर आपले जीवन प्रेरणादायी होईल.