Thursday, September 4, 2025

सिक्रेट लॉकचा पर्दाफाश; हायवेलगतच्या टार्जन डान्सबारवर पोलिसांची धडक कारवाई, ५ बारबालांची सुटका

सिक्रेट लॉकचा पर्दाफाश; हायवेलगतच्या टार्जन डान्सबारवर पोलिसांची धडक कारवाई, ५ बारबालांची सुटका

मुंबई : पनवेलसह मुंबईत डान्सबार सर्रास सुरू असल्याची अनेकदा प्रकरणं समोर आली आहेत. काही महिन्यांपूर्वी तर थेट गृहराज्यमंत्र्यांच्या सावली बारवर पोलिसांनी धाड घालून कारवाई केली होती. त्यामुळे मुंबईतील डान्सबारचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला होता.

आता काशीमीरा पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील महामार्गालगत असलेल्या “टार्जन डान्सबार”वर मध्यरात्री धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी बारच्या आत तयार केलेल्या दोन गुप्त केबिन्सचा पर्दाफाश केला. या केबिन्समधून ५ बारबालांची सुटका करण्यात आली. याशिवाय बारमध्ये काम करणाऱ्या आणखी १२ बारबालांनाही पोलिसांनी मुक्त केलं. या संपूर्ण कारवाईदरम्यान बार मालक, मॅनेजर, वेटर आणि इतर मिळून एकूण २१ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या धाडीनंतर मुंबईतील डान्सबारवर सुरू असलेल्या कारवायांना पुन्हा एकदा गती मिळाली असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे.

बार माफियाकडून पोलिसांच्या नजरेला चकवा देण्यासाठी बारच्या आत अगदी कौशल्याने दोन गुप्त केव्हेटी तयार करण्यात आल्या होत्या. त्यातील पहिल्या केव्हेटीचा दरवाजा बारच्या काचेच्या मागे हुशारीने लपवण्यात आला होता. या खोलीत कोणी शिरल्यावर आतून लॉक केल्यास, बाहेरून तो दरवाजा उघडणे जवळपास अशक्यप्राय होतं. दुसऱ्या गुप्त दरवाज्याची रचना तर अधिकच गुंतागुंतीची होती. त्यासाठी इलेक्ट्रिक बोर्डवर खास तीन पिनचा प्लग लावावा लागे. त्यानंतर शेजारील बटन ऑन करून, दरवाज्यावर जोरदार लाथ मारल्यावरच तो दरवाजा उघडायचा. म्हणजेच पोलिसांनी सहजतेने आत प्रवेश करू नये यासाठी एक भन्नाट यंत्रणा बसवण्यात आली होती. या सगळ्या क्लृप्त्या वापरून बारमालक आणि मॅनेजर बारबालांना आत लपवत असत, जेणेकरून अचानक धाड टाकली तरी पोलिसांच्या हाती काहीच लागू नये. पण अखेर पोलिसांनी हा गुप्त खेळ उघडकीस आणत मोठा पर्दाफाश केला.

या संपूर्ण कारवाईमागे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना मिळालेली खात्रीशीर माहिती कारणीभूत ठरली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी योजनाबद्ध पद्धतीने धाड घालत बारच्या आत लपवून ठेवलेल्या गुप्त केव्हेटी शोधून काढल्या. त्या केव्हेटीत अडकवून ठेवण्यात आलेल्या मुलींची सुटका करण्यात आली. या धाडीत पोलिसांनी बार मालक, मॅनेजर, वेटर यांच्यासह एकूण २१ जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. या कारवाईनंतर संपूर्ण काशीमीरा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला की, अशा अवैध बारमाफियांना यापुढे कोणतीही सूट दिली जाणार नाही आणि कायद्याच्या कठोर चौकटीत राहून कडक कारवाई केली जाईल.

Comments
Add Comment