
मुंबई (प्रतिनिधी) :
बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा या महिन्याच्या अखेरीस होत आहे. बीसीसीआय आणि आयपीएल अध्यक्षपद रिक्त होत असल्यामुळे या दोन महत्त्वाच्या पदी कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता आहे. सध्याचे आयपीएल अध्यक्ष अरुण धुमल यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांना आता तीन वर्षांचे ‘कुलिंगऑफ’ अनिवार्य आहे. रिक्त होणाऱ्या या पदासाठी मुंबई क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष संजय नाईक यांच्या नावाची चर्चा आहे.
बीसीसीआयचे विद्यमान उपाध्यक्ष राजीव शुक्ला हेसुद्धा शर्यतीत असतील. काँग्रेसचे राजीव शुक्ला पुन्हा आयपीएल अध्यक्ष झाले तर बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व भाजप नेते राकेश तिवारी यांना बीसीसीआय उपाध्यक्षपदासाठी दावेदारीची संधी मिळू शकते. सध्या सचिवपदावर एकूण तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले देवजित सैकिया (संयुक्त सचिवपदावर दोन वर्षे तीन महिने + सचिव म्हणून नऊ महिने) आपल्या पदावर कायम राहतील. ही वार्षिक सर्वसाधारण सभा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या वर्षी काही मोकळी पदे असतील, कारण निवडणुका बीसीसीआयच्या स्वतःच्या नियमांनुसार घेतल्या जाणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा शासन कायदा लागू होण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याने बीसीसीआय तोपर्यंत प्रतीक्षा करणार नाही.