
मुंबई : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात वायव्येला तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. समुद्राच्या काही भागात चक्रीवादळाची स्थिती आहे. यामुळे उत्तर कोकणासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात चार दिवस मध्यम तसेच तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह राज्यातील सात जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. पालघर, ठाण्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई - ठाण्यात मध्यम सरींची शक्यता आहे. पालघरमध्ये काही ठिकाणी शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने रायगडला गुरुवारी आणि शुक्रवारी, तर रत्नागिरीला गुरुवारी ऑरेंज ॲलर्ट दिला आहे. तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसराला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता असून उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे. गणपती विसर्जनानंतर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.