Thursday, September 4, 2025

पितृऋण

पितृऋण

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे

हिंदू धर्माने सांगितलेली चार ऋणे म्हणजेच देवऋण, ऋषीऋण, पितृऋण व समाजऋण. मोक्षप्राप्तीसाठी मनुष्याला ह्या चार ऋणातून मुक्त होणे गरजेचे आहे. देवांना यज्ञ भाग देऊन देवऋण फेडता येते, तर ऋषी मुनी संत यांच्या विचारांना आदर्शांना आत्मसात करून त्यांचा प्रचार, प्रसार करत त्यानुसार जीवन घडवून ऋषीऋण फेडता येते.

तर पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. श्राद्धविधी हा हिंदुधर्माचा अविभाज्य भाग आहे व धर्मशास्त्रात श्राद्ध हे गृहस्थाश्रमी लोकांना कर्तव्य म्हणून सांगितले आहे आणि म्हणूनच पितृऋण फेडण्यासाठी भाद्रपद महिन्यातला कृष्णपक्ष पंधरवडा हा पितृपक्ष म्हणून गणला जातो. “पितृपक्षा”ची उत्पत्ती प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळते, ज्याचा उल्लेख गरुड पुराण आणि महाभारत यांसारख्या ग्रंथांमध्ये केला आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान कृष्णाने स्वतः पूर्वजांसाठी हा विधी करण्याचा सल्ला दिला होता तोच हा काळ मानला जातो “पितृपक्ष”ची वेळ साधारण सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान भाद्रपद महिन्यात येते. हिंदू परंपरेनुसार सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेला या पितृपक्षास पितृपंधरवडा किंवा श्राद्धपक्ष असेदेखील म्हणतात. दिवंगत आत्म्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही विधी केले जातात. या काळात हिंदू त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांच्यासाठी तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करतात.

देश काले च पात्रे च श्रद्धया विधिनाच यत। पितनुद्दिश्य विप्रेभ्यो दत्तं श्राद्धमुदाहृतम ।। म्हणजे देश, काल आणि पात्र यांना अनुलक्षून श्रद्धा आणि विधीयुक्त असे जे अन्नादी दान पितरांना उद्देशून ब्राह्मणांना दिले जाते त्याला ‘श्राद्ध’ म्हणावे.

या पंधरवड्यात निधन पावलेल्या व्यक्तींसाठी तिथीनुसार श्राद्ध घातले जाते व त्यांना संतुष्ट करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. यादिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध व तर्पण करून सुख, समृद्धी व संततीसाठी प्रार्थना केली जाते. जर तिथी लक्षात नसेल तर पितृपंधरवड्याच्या शेवटच्या दिवशी अमावास्या येते. तिला सर्वपित्री अमावास्या म्हटले जाते. या दिवशी श्राद्ध केले जाते व पितरांना संतुष्ट केले जाते.

आई-वडील तसेच आप्तबांधव हे हयात असताना त्यांची सेवाशुश्रूषा आपण करतो. त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले जे कर्तव्य असते तेच पितृऋण होय. हे पितृऋण फेडण्याची संधी आपल्याला श्राद्धविधी करून मिळते. असं आपली भारतीय संस्कृती सांगते. आपल्या प्रियजनांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यासाठी श्राद्धविधी करणे आवश्यक असते. श्राद्धविधी हा हिंदुधर्माचा अविभाज्य भाग आहे व धर्मशास्त्रात श्राद्ध हे गृहस्थाश्रमी लोकांना कर्तव्य म्हणून सांगितले आहे.

ऋग्वेदकाळी समिधा आणि पिंड यांची अग्नीत आहुती देऊन पितृपूजा केली जात असे. यजुर्वेद, श्रौत, व गृह्यसूत्रांच्या काळात पिंडदान प्रचारात आले. गृह्यसूत्रे, श्रुती-स्मृती यांच्या पुढील काळात श्राद्धामध्ये ब्राह्मण भोजन आवश्यक मानले गेले आणि तो श्राद्धविधीतला एक प्रमुख भाग ठरला. सध्या आपण ज्याला श्राद्धविधी म्हणतो त्यामध्ये वरील तिन्ही अवस्था एकत्रित झाल्या आहेत. या पंधरवड्यात ‘श्राद्ध’ विधी केला जातो. या विधीमध्ये पुरोहितांसाठी भोजन तयार करून ब्राह्मणांना आमंत्रित केले जाते. ब्राह्मणांना भोजन अर्पण केल्याने अप्रत्यक्षपणे पितरांना भोजन दिले जाते अशी श्रद्धा आहे. धर्मग्रंथांमध्ये श्राद्धचे जवळजवळ शंभरपेक्षा जास्त प्रकारे वर्णन केले आहेत. त्यातील मुख्य श्राद्ध विधींची माहिती आपण पुढील भागात पाहूया.

Comments
Add Comment