
येऊ घातलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राजद आणि काँग्रेस यांची टक्कर भाजपशी म्हणजेच मोदी आणि नितीश कुमार यांच्या आघाडीशी आहे. या निवडणुकीत राहुल गांधी आपल्याकडील सारे डावपेच वापरून पाहत आहेत आणि त्यामुळे निवडणुकीत कसेही करून जिंकायचेच अशा निर्धाराने पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत आहेत. याच ओघात त्यांच्या पक्षातील एक किरकोळ नेत्याने एकदा मोदी यांच्या मातोश्री यांच्यावरही टीका केली आणि कोणताही पुत्र असा आईवर झालेला हल्ला सहन करणार नाही. त्यात मोदी यांच्या मातोश्री तर स्वर्गवासी झालेल्या. त्यामुळे मोदी यांनी राहुल आणि राजद या त्यांच्या पिल्लावळीला आपल्या भाषणात पाटणा येथे धारेवर धरले आणि राहुल आणि विरोधी पक्षांवर घणाघाती टीका केली. राहुल हे संरंजामी मानसिकतेतून बोलत असतात आणि त्यांना वाटते की मोदी यांच्यावर जेवढे ते टीका करतात तेवढी लोकांना सहन होते. पण तसे नसते. लोकांना राजकीय प्रतिस्पर्ध्यावर टीका करण्याचा अधिकार आहे पण वैयक्तिक आणि कुणाच्या आईवर आणि खानदानावर टीका करण्याचा कुणालाच अधिकार पोहोचत नाही. मोदी यांनी आपल्या भाषणात रूद्रावतार धारण केला, पण राहुल यांना दोष तरी का द्यायचा. त्यांची आई सोनिया गांधी यांनीही मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे राहुल यांनी आणि विरोधीपक्षांनी मोदी यांच्या दिवंगत मातोश्रींवर टीका करणे हे परंपरेला साजेसेच झाले.
काँग्रेस जशी सत्तेतून हद्दपार झाली आहे, तशी सैरभेर झाली आहे आणि दिसेल त्यांच्यावर ती टीका करत सुटते. कारण काँग्रेसवाल्यांना वाटत होते की हा देश म्हणजे त्यांची जहांगीर आहे आणि कायमस्वरूपी तो त्यांच्याच ताब्यात दिला आहे. पण मोदी यांनी काँग्रेसच्या या विचारांना सुरूंग लावला आणि तेव्हापासून काँग्रेसची तळपायाची आग मस्तकात जाऊ लागली. भाजपही विरोधीपक्षात होता तोही सरकारच्या कारभारावर टीका करत असे. पण त्याने अशा खालच्या पातळीवर जाऊन कधीही टीका केली नव्हती. अगदी आणिबाणीच्या काळातही. अगदी नेहरूंच्या काळातही भारताने चीनकडून पराभव पत्करला तेव्हाही राम मनोहर लोहिया यांनी नेहरूंवर प्रचंड टीका केली पण जनसंघ शांत राहिला. स्थानिक काँग्रेस समर्थक महंमद रिझवी यांनी मोदी यांच्या दिवंगत आईवर टीका केली आणि मग मोदी यांच्या संतापाचा पारा चढला. विरोधीपक्ष म्हणून त्यांच्या धोरणांवर टीका करणे एक वेळ ठीक, पण दिवंगत आईवर टीका करणे हे कुणालाही शोभत नाही. मात्र काँग्रेसतर्फे कुणीही याबद्दल क्षमायाचनाही केली नाही. हा राजकीय उद्दामपणा आहे आणि तो राहुल काय पण सर्व गांधी घराण्यात मुरलेला आहे. राहुल यांची बिहार विधानसभा निवडणुकीत बोलती बंद झाली आहे. अनेकवेळा त्यांनी आयोगावर टीका केली आणि प्रत्येकवेळी त्यांना आयोगाने फटकारले आहे. पण त्यातून धडा घेतील, तर ते राहुल गांधी कसले. वीर सावरकर यांच्यावरील टीकेच्यावेळीही तसेच झाले. राहुल हे स्वतःला युवराज समजतात आणि त्यामुळे त्यांना वाटते सारी जनता त्यांची गुलाम आहे. पण ५५ वर्षांच्या या नेत्याला अजूनही देशात कोणत्याही राज्यात देदीप्यमान यश मिळवता आले नाही. तरीही काँग्रेसवाल्यांना वाटते की राहुल हे काँग्रेसला पूर्वीचे यश मिळवून देतील. पण राहुल त्याबाबतीत अपयशी ठरले. मोदी यांच्या मातोश्रींवरील टीकेबाबत बोलायचे तर काँग्रेसच्या मित्रपक्षांनी सारी पातळी सोडली आहे. मोदी यांच्यावर टीका करताना राहुल काय किंवा राजद काय किंवा अखिलेश यांचा समाजवादी पक्ष काय, या सर्वांना राजकारणात किमान नैतिकता राखावी लागते याचेही भान नाही. राहुल यांनी नुकतीच बिहारमध्ये मतचोरीविरोधात यात्रा काढली. पण तिला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यावरून आपल्या टीकेचे काय पडसाद उमटतात हे राहुल यांना कळायला हवे. विरोधीपक्षांनी कसलेही ताळतंत्र नसल्यासारखे बोलणे सुरू केले आहे. त्यामुळे जनता या विरोधीपक्षांना खास करून राहुल आणि तेजस्वी यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या संस्कृतीत मातृ देवो भव: असे म्हटले आहे. सर्वात वरचे स्थान आईला आहे. पण कोणत्याही भारतीय मूल्यांची पर्वा नसलेले विरोधीपक्ष आणि इटलीच्या संस्कृतीत वाढलेले राहुल यांना आईची महती काय कळावी. राहुल हे सत्ता गेल्याने सैरभैर झालेत आणि म्हणून तसे ते वाट्टेल ते आरोप करत आहेत. प्रत्येक राज्यात त्यांनी जेथे यात्रा काढली तेथे त्यांचा पराभव झाला. काँग्रेसला आता या पराभवांचेही काही वाटेनासे झाले आहे. त्यामुळे राहुल यांनी बेताल आरोप करत सुटावे आणि मग आयोगाने त्यांच्या श्रीमुखात लगावली की राहुल यांनी माफी मागावी. आताही राहुल यांनी याच सरंजामी मानसिकतेतून मोदी यांच्यावर आरोप केले. त्यांना चौकीदार चोर हे म्हणावे, तर कधी राफेल विमानांवरून मोदी यांच्यावर टीका करावी, पण प्रत्येकवेळी जनतनेच त्यांचे हे आरोप हाणून पाडले. बिहार विधानसभा निवडणुकीत राहुल आणि तेजस्वी यांना पराभव समोर दिसत आहे. त्यामुळे ते मोदी यांच्यावर टीका करत आहेत आणि त्यांच्या दिवंगत मातोश्रींवरही टीका करतात. पण यातून विरोधीपक्ष जास्तच उघडे पडलेत. प्रत्येकाने याची खूणगाठ बांधून ठेवली पाहिजे. कारण निवडणुका येतात आणि जातात पण शब्द राहतात.