
ऋतुराज : ऋतुजा केळकर
“ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त :...”
मंत्रपुष्पांजलीचे खडे सुस्वर स्वर घरात प्रातःकाळी घुमायला लागले. कालची फुले, जी देवाच्या चरणी अर्पण झाली होती, आता निर्माल्य म्हणून हळुवार उचलली गेली. पण त्या फुलांमध्ये अजूनही गंध होता, भक्तीचा आणि समर्पणाचा. पण खरे तर प्रत्येक फुलाचं प्राक्तन हे वेगळं असतं. कुणी गजऱ्यात गुंफलं जातं पण त्यासाठी त्याला आपल्या हृदयात सुई टोचून घ्यावी लागते. कुणी एखाद्या ललनेच्या वेणीत गुंफलं जातं, जिथे ते सौंदर्य आणि सुगंध याच्याशी एकरूप होतात. कुणी प्रथम मिलनाचे साक्षी ठरतात, जिथे स्पर्शात एक नवा अर्थ जन्म घेतो. तर कुणी भगवंताच्या चरणी अर्पित होतात शांत, निःशब्द, पण पवित्र. इथे न कळे एक ओळ आठवते जी मनात रुंजी घालते... घटा घटाचं रूप वेगळे ... प्रत्येकाचे दैव वेगळे ... तुझ्याविना ते कोणा न कळे ... मुखी कुणाच्या पडते लोणी... कुणा मुखी अंगार... तू वेडा कुंभार... म्हणूनच प्रत्येक घटकाचं दैव वेगळं, पण त्या वेगळेपणाच्या गाभ्यात एकच स्पंदन आणि ते म्हणजे ‘तू’. तुझ्या अनुपस्थितीत नियतीचं गणित कोडं होतं आणि जीवनाच्या प्रत्येक समीकरणाचे तूच उत्तरही असतोस. त्यामुळे निर्माल्य म्हणजे फुलांचं शेवट नव्हे, तर ते त्यांचं उत्तरार्ध. जसं एखादं गाणं संपल्यावरही त्याची लय मनात घुमत राहते, तसं निर्माल्याचं अस्तित्वही मनात रुंजी घालतं. ते मातीत मिसळतं, नव्या अंकुरांना पोषण देतं आणि भक्तीचं चक्र पूर्ण करतं. म्हणूनच वाटतं की ही फुलं देवाच्या सान्निध्यात जाऊन परत आली आहेत पण त्यांचं अस्तित्व आता संपलेलं नाही, तर बदललेलं आहे. निर्माल्य म्हणजे केवळ उरलेलं नव्हे, तर ते एक स्मरण आहे त्या पायस क्षणाचं, त्या निस्वार्थी भावनेचं, भक्त आणि परमेश्वर यांच्यातील निःशब्द संवादाचं. नेहमीच घराच्या अंगणात एक कोपरा असतो, जिथे निर्माल्य ठेवले जाते. तिथे सूर्याची पहिली किरणं पोहोचतात. त्या किरणांमध्ये त्या फुलांचा रंग थोडा उजळतो, आणि जणू ते पुन्हा एकदा देवाला नमस्कार करतं.मी नेहमीच त्या निर्माल्याला हात जोडते कारण माझ्या मते “हेही पवित्र आहे.” लक्ष्यात घ्या ही भावनादेखील शब्दांपेक्षा खोल असते. त्याच एक खूप महत्त्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे निर्माल्याचं आयुष्य इथे संपत नाही. ते परत मातीत मिसळतं, नव्या अंकुरांना पोषण देतं. म्हणूनच भक्तीचं हे चक्र कधीच पूर्ण होतं नाही. अर्पण, विसर्जन, आणि पुनर्जन्म आणि असेच असतात. जन्म आणि मृत्यूचे फेरे. मृत्यू म्हणजे अखेर नव्हे, तर एक संधी असते पुन्हा नव्याने जन्मण्याची, जीवनाच्या गाभ्यातून पुन्हा अंकुरण्याची. जसं निर्माल्य मातीत मिसळून नव्या फुलांचं बीज बनतं, तसं प्रत्येक अंतात एक नव्याची चाहूल असते. मृत्यू हे केवळ शरीराचं विसर्जन नाही, तर अनुभवांचं संकलन, स्मृतींचं विसर्जन आणि आत्म्याचं पुनःप्रवास.
जन्म आणि मृत्यू यांच्यामधली ही वाट म्हणजे एक नाजूक फूल जिथे भक्ती, कर्म, आणि प्रज्ञा एकत्र चालतात त्यालाच जीवन अशी म्हटले जाते. जसं फूलं देवाच्या चरणी अर्पण होतात, तसं जीवनही एका क्षणी अर्पण होतं शांत, निःशब्द, पण पवित्र आणि मग त्या अर्पणातूनच जन्मतो एक नवा सूर, एक नवा श्वास, एक नवा गंध...जो पुन्हा एकदा जगण्याच्या लयीशी एकरूप होतो. अखेरीस माझ्याच शब्दात सांगायचं झाल तर, अर्पणाच्या त्या निःशब्द क्षणात... गंध उरतो समर्पणाचा... मृत्यूही वाटतो एक बीज... नव्या अस्तित्वाचा, नव्या गाभ्याचा...