त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यात पंधरा दिवसात विविध ठिकाणी तीन बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला यश आले. जिल्ह्यात ५० हून अधिक बिबटे असण्याची शक्यता वन विभागाकडून वर्तवली जात आहेत. त्र्यंबकेश्वरजवळ पहिने ग्रामपंचायत हद्दीतील व त्र्यंबक वन परिक्षेत्रातील नियतक्षेत्र बोरीचीवाडी येथे म्हसाळ यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्या अडकला होता. वन विभागाने त्याला जेरबंद केले.
गुरुवारी पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास बिबट्या कोंबड्या खाण्यासाठी एका ठिकाणी फाटलेल्या जाळीतून आत घुसला. जाळीच्या आत जास्त कोंबड्या नव्हत्या. त्यामुळे तीन-चार कोंबड्या फस्त करून, बिबट्याबाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला बाहेर येता येईना.
विशेष म्हणजे, ज्या फटीतून तो आत घुसला, ती फटही आपोआप पुनः पूर्ववत झाली. त्यामुळे त्याचे बाहेर पडण्याचे मार्गच बंद झाले. दरम्यान, पोल्ट्रीफॉर्म मालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्र्यंबकेश्वर वनविभागाशी संपर्क साधला, त्यानुसार, त्र्यंबक रेंज स्टाफ व नाशिकच्या इसीओ इसीएचओ रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. त्यांनी बिबट्याला गनद्वारे भूलीचे इंजेक्शन देऊन रेस्क्यू करण्यात आले. त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर, वनपाल अरुण निंबेकर, वनरक्षक रवी मौळे, दीपक जगताप, बबलू, दिवे, कैलास महाले आदी कर्मचाऱ्यांसह रेस्क्यू टीमने ही मोहीम राबविली.