
मुंबई : वांद्रे परिसरात आई आणि भावासोबत राहणाऱ्या २० वर्षीय कबड्डीपटूने टोकाचे पाऊल उचलले. गंभीर आजारी असलेल्या या कबड्डीपटूने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करताना चिठ्ठी किंवा कोणताही संदेश मागे ठेवला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या बाबत सखोल चौकशी केली आणि नैराश्यातून कबड्डीपटूने टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली. वांद्रे पोलीस या प्रकरणात अद्याप तपास करत आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार कबड्डीपटू मोहम्मद आसिफ खान आई आणि भावासोबत वांद्रे परिसरात राहत होता. बुधवार ३ सप्टेंबर रोजी मोहम्मदची आई कामानिमित्त घराबाहेर होती. मोहम्मदचा भाऊ कॉलेजला गेला होता. घरात कोणीही नव्हते. त्यावेळी मोहम्मद आसिफ खानने गळफास घेऊन जीवन संपवले. शेजाऱ्यांना जेव्हा मोहम्मदने आत्महत्या केल्याचे लक्षात आले त्यावेळी त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि मोहम्मदला तातडीने भाभा रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन मोहम्मदचा मृत्यू झाल्याचे सांगितले.