
खरे कुणबी असतील त्यांना आरक्षण मिळेल: मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
मुंबई : जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने काढलेल्या जीआरविषयी वेगवेगळे मतमतांतरे व्यक्त केली जात असताना, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जीआर मराठा समाजाला आरक्षणाचा सरसकटचा लाभ देणारा नसल्याचे स्पष्ट केले. राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी काढलेला जीआर सरसकटचा नाही. या प्रकरणी जे खरे कुणबी असतील त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळेल. या प्रकरणी कुणालाही खोटेपणा करता येणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मराठा आरक्षणाशी संबंधित सरकारने काढलेल्या जीआरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी हा जीआर दिशाभूल करणारा असल्याचा आरोप केला आहे. जरांगे यांनीही या जीआरमुळे मराठवाड्यातील मराठ्यांचे भले झाल्याचा दावा केला आहे. विशेषतः या प्रकरणी ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यांनी या प्रकरणी कॅबिनेटलाही दांडी मारली. पत्रकारांनी गुरूवारी हा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे उपस्थित केला. त्यावर त्यांनी भुजबळ नाराज नसल्याचे नमूद करत सरकारचा जीआर सरसकट आरक्षण देणारा नसल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री या मुद्यावर भाष्य करताना म्हणाले,भुजबळ हे मंत्रिमंडळातून कुठेही निघून गेले नाहीत. त्यांची व माझी चर्चा झाली. मी त्यांना आश्वस्त केले आहे की, सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाजाला कोणताही धक्का बसणार नाही. हा सरसकट जीआर नाही. हा पुराव्याचाच जीआर आहे. फक्त मराठवाड्यात इंग्रजांचा राज्य नव्हते. तिथे निझामाचे राज्य होते. त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातील पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात, तसे मराठवाड्यात मिळत नाहीत. मराठवाड्यातील पुरावे हे निजामाच्या म्हणजे हैदराबाद गॅझियटमध्ये मिळतात. त्यामुळे तेथील पुरावे आपण ग्राह्य धरले. त्यामुळे जे खरे कुणबी असतील त्यांनाच हे आरक्षण मिळेल.
भुजबळांच्या मनातील शंका दूर करणार
मला असे वाटते की, यातून (जीआर) जे काही खरे हक्कदार आहेत, त्यांनाच ते मिळेल. पण कुणालाही खोटेपणा करता येणार नाही. अशा प्रकारचा हा जीआर आहे. अनेक ओबीसी संघटनांनी त्याचे स्वागत केले आहे. आमच्या मनात कोणतीही शंका नाही असे त्यांचे म्हणणे आहे. भुजबळ व इतर नेत्यांच्याही मनातील शंका आम्ही दूर करू. ओबीसी नेत्यांनाही एक गोष्ट माहिती आहे की, जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही. जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचे काढून दुसऱ्या समाजाला देण्याचा विचार होऊ शकत नाही.आम्ही मराठ्यांचे मराठ्यांना देणार, ओबीसींचे ओबीसींना देणार आणि ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना ते ते देणार. कुणाचे काढून कुणाला केव्हाच देणार नाही. दोन समाजाला एकमेकांपुढे केव्हाच उभे करणार नाही.
सरकार कुणावरही अन्याय होऊ देणार नाही
फडणवीस म्हणाले, अनेकदा समजुती गैरसमजुती होतात. अनेकदा काही लोक जाणिवपूर्वक गैरसमजुती तयार करतात. पण आम्ही जे काही राजकारण शिकलो, त्या राजकारणात 'पथ का अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जाना. सब समाज को लिए साथ में, आगे हे चलते जाना', हे आमचे ब्रिद वाक्य आहे. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचे आहे. मराठा समाज एक महत्वाचा समाज आहे. या महाराष्ट्राच्या जडणघडणीत एक मोठे योगदान देणारा हा समाज आहे. पण त्यासोबतच ज्या अठरापगड जाती आहेत, ज्यांनी स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे म्हणून काम केले आहे. त्यांनीही बलिदान दिले आहे. कुणावरही अन्याय होऊ नये ही आमची भावना आहे. ही भावना पुढेही राहील.