
मुंबई: अनंत चतुर्दशीला अवघे काही दिवस बाकी आहेत, शनिवार ६ सप्टेंबरला बाप्पा आपल्या गावी जाणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या अखेरच्या दोन दिवसात लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा सम्राट, मुंबईचा राजा, राजा तेजुकायाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत असते. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे यादरम्यान प्रशासनाला तसेच मंडळ व्यवस्थापकांना देखील काहीवेळा कठीण होऊन बसते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मागणी काही वर्षांपासून केली जात होती. सध्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
मुंबईत दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाची मोठ्या प्रमाणात धामधूम पाहायला मिळत आहे. आतापर्यंत दीड, पाच, सहा तसेच सात दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन झाले आहे. त्यामुळे आता अनंत चतुर्दशीला मुंबईतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या गणपतींचे विसर्जन आणि मिरवणुकीचे वेध सर्वांना लागले आहेत. शनिवारी ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याकारणामुळे लालबाग-परळ-गिरगाव येथील गणेश मंडळात भाविकांची गर्दी वाढत चालली आहे. मुखदर्शनासाठी वाढणारी या दोन दिवसांत वाढणारी रंग पाहता, सुरक्षा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान मंडळ ट्रस्टना तसेच पोलिस प्रशासनावर आहे. याच कारणामुळे, लालबागचा राजा मंडळाने ‘फेस डिटेक्टर’ ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तर अन्य गणेश मंडळांमध्ये मेटल डिटेक्टर तसेच इतर यंत्रणा लावण्यात आल्या आहेत.
फेस डिटेक्टर तंत्रज्ञानाचा फायदा काय?
फेस डिटेक्टर हे तंत्रज्ञान आज जगभरात सुरक्षा व्यवस्थेसाठी वापरले जाते. संशयित व्यक्तींचा शोध घेणे, गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे किंवा गर्दीतून धोका निर्माण करू शकणाऱ्यांची ओळख पटवणे यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरते. काही मोठ्या उत्सवांमध्ये, रेल्वे स्थानकांवर, विमानतळांवर हे तंत्रज्ञान वापरले जाते.
फेस डिटेक्टर तंत्रज्ञान खर्चीक
फेस डिटेक्टर तंत्रज्ञान खर्चीक असल्याकारणामुळे मोठ्या आणि प्रतिष्ठित मंडलांना वगळता इतर लहान मंडळांना ते कार्यान्वित करणे शक्य होत नाही. फेस डिटेक्शनमध्ये व्यक्तीचा चेहरा हा बायोमेट्रिक डेटा म्हणून नोंदवला जातो. या डेटाचा गैरवापर होऊ नये, यासाठी कठोर नियम आहेत. अशा डेटाचे संकलन व साठवणूक करण्याची जबाबदारी घेणे मंडळांसाठी कठीण होते. तसेच, परवानगीची प्रक्रियाही वेळखाऊ असते. त्यामुळेही सर्रास सर्व मंडळे या यंत्रणेचा वापर करत नाहीत. परंतु आता हळूहळू सुरक्षेच्यादृष्टीने फक्त व्यवस्थेवर अवलंबून न राहता मंडळे स्वत:च सुरक्षेसाठी सतर्क झाली आहेत.
सध्या, लालबागचा राजा व्यतिरिक्त फेस डिटेक्टर यंत्रणा इतर मंडळांनी लावलेली नसली तरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोणाने मेटल डिटेक्ट बसवण्यात आली आहेत.