
अन्नपूर्णा देवी
आपल्याला विकसित भारत घडवायचा असेल, तर जिथून जीवनाची सुरुवात होते तिथूनच आरंभ करायला हवा. आपल्या सर्वात तरुण नागरिकांच्या क्षमतेचे संगोपन करून, अंगणवाडी केंद्रांमधील बालकांच्या निरागस हास्यामधून, त्यांच्या बडबडगीतांमधून आणि ते तयार करत असलेल्या खेळण्यांच्या ब्लॉक्समधून आपल्या राष्ट्राच्या भविष्याचे वचन पूर्ण होते.
आजच्या भारतात खेळ केवळ वेळ घालवण्याचे साधन राहिलेले नाही, तर ते आहे एक धोरण आणि त्याचे परिणाम स्वतःच बोलके आहेत. गेल्या दशकात, मोदी सरकारने बालविकासाच्या दृष्टिकोनात मूलभूत पातळीवर पुनर्रचना केली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा क्षण, ज्यावेळी मेंदूचा ८५ % पर्यंतचा विकास सहा वर्षांच्या वयाच्या आधी होतो हे मान्य करण्यात आले तो होय. जर आपल्याला अधिक कुशाग्र, सुदृढ आणि अधिक निर्माणक्षम लोकसंख्या हवी असेल तर आपल्याला तिथेच गुंतवणूक करायला हवी, जिथे तिची अत्याधिक आवश्यकता आहे. आयुष्याच्या पहिल्या सहा वर्षांमध्ये. वैज्ञानिक पुरावेदेखील याचे समर्थन करत आहे. सीएमसी वेल्लोर येथील क्लिनिकल एपिडेमियोलॉजी विभागाने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे, की ज्या मुलांना १८ ते २४ महिन्यांच्या संरचित बालपणाच्या काळात योग्य देखभाल आणि शिक्षण मिळाले त्यांच्या बुद्ध्यांकामध्ये लक्षणीय आणि कायमस्वरूपी वाढ दिसून आली. पाच वर्षांच्या वयापर्यंत १९ गुणांपर्यंत आणि नऊ वर्षांच्या वयापर्यंत ५ ते ९ गुणांपर्यंत. विकसनशील भारतासाठी हे फायदे खूप महत्त्वाचे आहेत. भारताचे हे निष्कर्ष जागतिक संशोधनाशी सुसंगत आहेत. जी बालके पाच वयोवर्षाच्या आत दर्जेदार प्रारंभिक बालव्यवस्था देखभाल आणि शिक्षण उपक्रमात सहभागी होतात, त्यांचा बुद्ध्यांक अधिक असण्याची शक्यता ६७% जास्त असते, त्यांच्यात उत्तम सामाजिक कौशल्य आणि सुधारित शैक्षणिक कामगिरी दिसून येते असे आंतरराष्ट्रीय अभ्यासातून दिसून आले आहे. या संदर्भात नोबेल पारितोषिक विजेते डॉ. जेम्स हेकमन यांचे प्रसिद्ध वाक्य, ‘जितके लवकर तितके चांगले-आणि तितके त्याचे परिणाम बुद्धिमान.’ त्यांच्या संशोधनातून असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, की बालपणातील गुंतवणूक १३-१८ % परतावा देते, म्हणजे शिक्षण किंवा नोकरीतील प्रशिक्षणाच्या इतर कोणत्याही टप्प्यापेक्षा जास्त. प्रारंभिक बालव्यवस्था देखभाल आणि शिक्षण उपक्रमाचे आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ओळखून महिला आणि बालविकास मंत्रालयाने ‘पोषण भी पढाई भी’ हे अभियान सुरू केले आहे, जे आहे अंगणवाडी केंद्रांना चैतन्यशील शिक्षण केंद्रात रूपांतरित करण्याचे अभियान. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच प्रारंभिक बालव्यवस्था देखभाल आणि शिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे, ज्यामध्ये स्थानिक आणि देशांतर्गत साहित्यसामग्रीचा अवलंब करून कृती आधारित आणि खेळ केंद्रित दृष्टिकोनाला प्राधान्य देण्यात येत आहे. अध्यापन-ज्ञानार्जनासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूदीतही लक्षणीय वाढ करण्यात आली आणि मासिक दिवस निश्चित करण्यात आले आहे. आज अंगणवाडी केंद्र हे केवळ पोषणाचे ठिकाण नसून ते प्रत्येक बालकाचे पहिले विद्यालय आहे, जिथे मुलांच्या बालपणातील अत्यंत महत्त्वाच्या काळात जिज्ञासा, सर्जनशीलता आणि सर्वांगीण विकासाचे पोषण करते.
या परिवर्तनाच्या प्रक्रियेला मार्गदर्शन करण्यासाठी मंत्रालयाने ३-६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी आधारशिला या नावाने प्रारंभिक बालव्यवस्था देखभाल आणि शिक्षण उपक्रमासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम तयार केला आहे. आधारशिला अंतर्गत बालकांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले जाते. यामध्ये केवळ बौद्धिक विकासावर नव्हे, तर भावनिक, शारीरिक आणि सामाजिक क्षम कल्याणावर देखील भर दिला जातो. या अंतर्गत संरचित खेळांवर आधारित शिक्षणाचा दृष्टिकोन अंगीकारून मुलांना पोषक वातावरणात प्रगतीचे द्वार खुले केले जाते. मुले स्वाभाविकरित्या खेळाकडे आकर्षित होतात. योग्य वातावरणाच्या साथीने हाच अंतर्भूत घटक आयुष्यभराच्या शिक्षणाचा पाया बनतो. ‘पोषण भी पढाई भी’ हे अभियान सुरक्षित, संरचित आणि उत्साही वातावरण प्रदान करुन या अनुभूतीला समृद्ध करते जिथे मुले मार्गदर्शित खेळ आणि शिक्षणाद्वारे विकसित होऊ शकतात. पोषण भी पढाई भी अभियानाअंतर्गत देशभरातील अंगणवाडी केंद्रे प्रारंभिक शिक्षणासाठीची पोषक केंद्रे म्हणून उदयास येत आहेत. संरचित आधारशिला ५+१ साप्ताहिक योजना सुनिश्चित करते यामध्ये अंगणवाडीतील दिवस ३० मिनिटांच्या खुल्या वातावरणातील खेळाने सुरु होतो, त्यानंतर भाषाविषयक तसेच मुलांमधील सर्जनशीलता वाढवणारे खेळ, गतीप्रेरक कौशल्ये आणि संवाद कौशल्य यांसारख्या विशिष्ट कृती मुलांकडून करून घेतल्या जातात. त्यानंतर पोषक आहार आणि विश्रांती झाल्यानंतर दिवसाचा समारोप मैदानी खेळ तसेच मूल्यात्मक आणि भावनिक बंध दृढ करणाऱ्या संभाषणाने होतो.
संरचित आणि असंरचित खेळांचा अंतर्भाव केलेला हा संतुलित दृष्टिकोन महत्त्वाचा असून विशेषतः राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० ने औपचारिक शालेय प्रवेशाची वयोमर्यादा सहा वर्षे इतकी निश्चित केल्याने त्याचे महत्त्व अधोरेखित होते. संरचित प्रारंभिक बालव्यवस्था देखभाल आणि शिक्षण उपक्रमामुळे बालके भावनिक, सामाजिक आणि आकलनाच्या पातळीवर शाळेत प्रवेश करण्यास सज्ज असल्याचे सुनिश्चित केले जाते. सर्वात उत्साहजनक गोष्ट ही आहे, की देशभरातील पालकांचा यावरील विश्वास वृद्धिंगत होतो आहे. जी कुटुंबे एके काळी अंगणवाडी केंद्राना केवळ पोषण केंद्र म्हणून पाहत असत ते आता त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक प्रवासातील पहिली पायरी म्हणून त्याकडे पाहत आहे. भारतातील प्रत्येक बालकाला एक मजबूत सुरुवात मिळाली पाहिजे. याचे महत्त्व ओळखून महिला बालविकास मंत्रालयाने लहान मुलांच्या प्रारंभिक प्रोत्सहनासाठी नवे चेतना हा राष्ट्रीय आराखडा सादर केला. हा उपक्रम पालक आणि पालनकर्त्यांना सोप्या, खेळांवर आधारित आणि मुलांच्या वयाप्रमाणे कृतींच्या आधारे लहानग्या मनांना घरातच समृद्ध करण्यासाठी सक्षम करतो. माता- पित्यांचा सहभाग हा बालकांच्या विकासाची गुरुकिल्ली आहे. एकीकडे उच्च उत्पन्न गटातील पालक आपल्या मुलांसाठी खेळणी आणि पुस्तके खरेदी करण्यात गुंतवणूक करू शकतात; परंतु अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी समान संधी उपलब्ध करून देणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. नवचेतना आणि ‘पोषण भी पढाई भी’ या अभियानाच्या माध्यमातून ही तफावत दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील मुलाला सुरुवातीपासूनच वाढीसाठी आवश्यक असलेले प्रोत्साहन, देखभाल आणि संगोपन मिळेल याची खात्री होईल. भारताला खऱ्या अर्थाने विकसित व्हायचे असेल तर आपल्या सर्वात तरुण पिढीला आयुष्याच्या आरंभीच योग्य सुरुवात मिळणे आवश्यक आहे. खेळ ही काही आरामदायी गोष्ट नव्हे, तर तो शिक्षणाचा पाया आहे. भारतातील प्रत्येक मुलाला शिक्षण, विकास आणि समृद्ध होण्याची संधी मिळेल याची खात्री करण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालय वचनबद्ध आहे, कारण राष्ट्रउभारणीची सुरुवात आपल्या सर्वात तरुण नागरिकांच्या संगोपनापासून होते.