
टॅरिफ शून्य करून भारताची माफी मागण्याचे एडवर्ड प्राइस यांनी डोनाल्ड ट्रम्पना केले आवाहन
वॉशिंग्टन: भारत-अमेरिका संबंध डोनाल्ड ट्रंप यांच्या ५० टक्के टॅरिफमुळे चांगलेच बिघडलेले दिसत आहेत. त्यात आता या विषयावर अमेरिकेतूनच ट्रंप यांच्या निर्णयावर जोरदार विरोध होताना पहायला मिळत आहे. अलीकडेच, न्यू यॉर्क विद्यापीठातील सहायक प्राध्यापक आणि अमेरिकेच्या गृह विभागाचे माजी प्रवक्ते एडवर्ड प्राइस यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारतावरील ५० टक्के टॅरिफ ताबडतोब मागे घेण्याचे, ते शून्यावर आणण्याचे आणि भारताची माफी मागण्याचे आवाहन केले आहे. तसेच मोदी खूप हुशार आहेत असे कौतुक देखील त्यांनी भारताच्या पंतप्रधानांचे केले आहे.
जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला लोकशाही देश आणि क्वाड सुरक्षा गटाचा आधारस्तंभ असलेला भारत, इंडो-पॅसिफिकमधील अमेरिकेच्या धोरणात महत्त्वाचा भाग बनला आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ आक्रमकतेमुळे विश्वास निर्माण करण्याच्या अनेक वर्षांच्या प्रगतीला धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा प्राइस यांनी दिला.
भारताची माफी मागावी
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना एडवर्ड प्राइस म्हणाले, “भारत आणि अमेरिकेतील भागीदारी ही २१ व्या शतकातील सर्वात महत्त्वाची भागीदारी आहे. ही भागीदारी चीन आणि रशियामध्ये काय घडते हे ठरवेल. २१ व्या शतकात भारताची भूमिका निर्णायक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चीनशी संघर्ष करत आहेत, रशियाशी युद्धाबाबत वाटाघाडी करत आहेत, अशा परिस्थितीत त्यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ का लादले हे मला समजत नाही.”
पंतप्रधान मोदी खूपच हुशार
यावेळी एडवर्ड प्राइस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे अमेरिका, रशिया आणि चीनबरोबर एकत्रित वाटचाल करण्याच्या क्षमतेबद्दल कौतुक केले. “पंतप्रधान मोदी खूपच हुशार आहेत. ते अमेरिकन लोकांना, माझ्यासारख्या लोकांना आठवण करून देत आहेत की त्यांच्याकडे पर्याय आहेत, परंतु त्यांनी चीन आणि रशियाला पूर्णपणे स्वीकारलेले नाही.”