
माेरपीस : पूजा काळे
गणेशोत्सवाच्या रणधुमाळीत भजन, कीर्तनात रमलेला चाकरमानी शोधायचा असेल तर, तो कोकणात सापडेल. परशुरामाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणच्या भूमीला निसर्गाचं अलौकिक वरदान आहे. शिमगा गौरी-गणपतीसारख्या सणांची नांदी इथं फार आधीपासूनच सुरू होते. कुटुंबाबरोबर सण साजरा करायचा तो कोकणवासीयांनीचं. सदाबहरलेला कोकणचा भूभाग वर्षभर संस्कृती जपतो. तनामनात साचलेला उत्साह ओसंडून वाहतो, सणांचा रात्रभर जागर होतो. उत्सव शिगेला पोहोचतो. खेडोपाड्यात आनंदोत्सव साजरा करायला गेलेल्या मुंबईकराचं श्रद्धास्थान म्हणजे गौरीगणपतीचे दिवस. या समीकरणाला कुठेही फाटा बसलेला दिसत नाही एवढी एकरूपता यानिमित्ताने महाराष्ट्रात पाहायला मिळते. या दिवसात हक्काने माहेर गाठायचं ही महिलांची श्रद्धा. “बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी, गणपतीच्या सणाला... किंवा सया माहेरी, माहेरी, माहेरी आल्या ग्... किती आनंदी, आनंदी, आनंदी झाल्या ग्...गीतातून अभिव्यक्त होतात. पूजा-अर्चा, सोवळ-ओवळं, चालीरिती, पै-पाहुणा, आल्या गेल्याचं स्वागत, हरितालिका, गौरीपूजन ते विसर्जनसारख्या दिवसाचं नियोजन होत. अख्ख्या पंचक्रोशीला जाग आणावी. सणांच्या स्वागताला रात्र जागवावी. आज्या, सुना, नातवंड, जावई, लेकुरवाळांनी गोकुळ भरावा. गप्पा-गोष्टींना ऊत यावा. नाचगाणं रंगात यावं. खेळ, फुगड्यानी दरबार भरावा यासाठी माहेरवाशिणी एकत्र येण महत्त्वाचं. रुणझुणत्या पाखरा, जारे माझ्या माहेरा... माहेर म्हणजे सुखाचे अंगण. आनंदाची शिंपण. प्रेमाने बांधलेल्या नात्यांची कधीही न कोमेजणारी मायेची वेल. किती घट्ट असतात ना हे माहेरचे ऋणानुबंध. माहेर आठवताचं डोळ्यात दाटतो ममतेचा पाझर. सण मांदियाळीचं निमित्त उरताना हा पाझर या न् त्या कारणे वर्षभर फुटतो.
सया म्हणजे सखी. सखी म्हणजे मैत्रीण. मग ती आई असो, बहीण असो, असो नणंद वा भावजय वा कुणीही. घराला साजेसं घरपण देणारी तुमच्या माझ्यासारखी कुटुंबवत्सल स्त्री, जी संसारात सप्तपदीशी बांधिल असते. पैंजणात रुणझुणते. किणकिणत्या चुड्यातून, मेंदीच्या रंगाप्रमाणे त्याची किर्ती दूर पसरवते. तिच्या पैठणीवरील मोर गाली लाली पसरवितात. प्रतीक्षेत उंबरठ्याचे माप ओलांडताना सौभाग्यकांक्षिणी भरते प्रीतवसा. लेकीचं साजिरे रूप पाहून बापाचा जीव गलबलतो. निरोप देण्याच्या प्रसंगात,‘जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा.’ मन घट्ट करून चेहऱ्यावर हसू आणत लाडक्या लेकीला निरोप दिला जातो. नववधू प्रिया मी बावरते. सुखस्वप्ने, उत्सुकता आणि जोडीदार अशा अनेक भावना घेऊन उंबरठा ओलांडून सासरी येते तेव्हा सुरू होतं तिचं खरं आयुष्य. तेव्हाची तिची अवस्था म्हणजे, “सुखदुखाच्या ओंजळीतल्या भरल्या राशी तिने पाहिल्या, पाहूनी मग ती जरा लाजली निमित्त मात्रे परि भुलली. गुलाल गाली ओठाशी लाली, कळी गुलाबी फुलण्या आली... बहकण्याचा नाद लागला नाच गं घुमा भादव आला. घेण्या विसावा सरी धावल्या निरोप द्याया सया पावल्या.” सर्वत्र चातुर्मास सुरू झाल्याचे संकेत निसर्ग आपल्या परीने देत असतो. निसर्गचक्राला अनुसरून सण-उत्सव येताना माहेरची किलबिल तिला स्वस्थ बसू देत नसावी. मनात मांडे रचणारे एक मन माहेराकडे धावते तर दुसरे मन सासरच्या कर्तव्याशी बांधिल राहाते. तडजोड या शब्दाची ओळख इथून सुरू होत असावी असं मला वाटतं. कारण माहेर’ मनाचं कोंदण तर सासर संसाराची पहिली पायरी असते. हृदयाच्या पायथ्याशी वसलेल्या गावात तिचे भावविश्व दिसू लागते. ओढीतून निर्माण झालेल्या तिच्या पाणावलेल्या नयनांत दिसू लागतात उफाळलेल्या लाटा. आसवांचा पुराला ओसंडण्याची मुभा नसली तरी पापण्यांच्या काठावर वाट शोधणाऱ्या मनाची व्याकुळता कशी कुणा दिसत नाही? संघर्ष मनाचा मनाशी होताना ओढ या शब्दातलं सामर्थ्य जाणवू लागतं. ओढ माहेरची आईच्या ममतेची. ओढ बापाच्या क्षमतेची अतूट नात्यांची.
गौरी-गणपतीच्या निमित्ताने, माहेराला जायचा योग म्हणजे पुन्हा नव्याने सूर्योदय. आनंदाला भरत येणं आणि आसवांना ओहोटी लागणं एवढं सोप्प होतं. घड्याळाचे काटे वेगाने फिरतात. वेळेचं अंतर गाठू लागतात. कामाची लगबग करताना सामानांची आवराआवर होते. निर्मल नात असलेलं माहेर नुसतं नाव नसतं, तर त्याला आठवाचं वलय आल्याने चुका माफ करण्यासाठी असलेला माहेरचा उंबरठा खुणावू लागतो. तो प्रत्येकीसाठी आधारवड असतो. गौरी-गणपती, दिवाळी, भाऊबीज, रक्षाबंधनला माहेरा जायला मिळालं की, जीव फुलून येतो. चार दिवस मायेच्या वर्षावात मन भरून येतं. निघताना पाय उचलत नाही. निरोपाचे क्षण जड होतात. म्हणजे ‘भेटी लागे जीवा, लागलीसी आस. माहेरची ओढ ही अशी असते...’ सण माहेर गाठण्या वाट उत्सव दाखवी, आल्या गौराई नटूनी साऱ्या दिसती लाघवी.. दिसं अडीज पाहुणी कोण सान कोण मोठी, एकमेका गळाभेटी इथं सुटतील गाठी.. शोभा आणि सप्तरंगद्वार खुलवी मनाचे, मुख नाजूक सानुले नर्म ओल्या भावनांचे. सया बाया वरसाने गोफ धरती सुखाचे, झिम्मा फुगड्यात गौराई बघा फेर धरून नाचे... काळजाची मुक्त गाणी ठेका धरती अंगणी, रिक्त होतील वेदना येता डोळ्यातचं पाणी. सणवार मांदियाळी रात जागर झेलते, स्पंदनात कुठूनशी लय जगण्यास येते... हा सगळा खेळ लयींचा-माहेरपणाचा. सया माहेरी आल्या ग् म्हणत कौतुक करण्याचा.