मुंबई : ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील आघाडीची कंपनी झोमॅटोने प्लॅटफॉर्म शुल्कात दोन रुपयांची वाढ केली आहे. हे शुल्क आता १० रुपयांवरून १२ रुपये करण्यात आले आहे. हे शुल्क वस्तू आणि सेवा कर व्यतिरित असल्याने आता झोमॅटोवरून ऑर्डर करणेही महाग होणार आहे. यापूर्वी स्विगीनेनेही प्लॅटफॉर्म शुक्लात वाढ केली आहे. त्यानंतर आता झोमॅटोनेही वाढ केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्लॅटफॉर्म शुल्क हे प्रत्येक ऑनलाइन ऑर्डरवर आकारली जाणारी अतिरिक्त रक्कम असून २०२३ मध्ये झोमॅटो आणि स्विगीने हे शुल्क लागू केले होते. त्यांतर दोन्ही कंपन्यांकडून या शुल्कात सातत्याने वाढ करण्यात आली आहे. सध्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील वाढीचा वेग काहीसा मंदावला असताना ही शुल्कवाढ करण्यात आल्याने आल्याने अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे.
प्लॅटफॉर्म शुक्लाव्यतिरिक्त झोमॅटोकडून इतर शुल्क आकारले जाते आहे. यात ‘रेन सरचार्ज’ ‘व्हीआयपी मोड’ अशा शुल्काचा समावेश आहे. याशिवाय झोमॅटोने जुलै २०२५ मध्ये दुरच्या हॉटेलमधील डिलिव्हरीसाठी नवीन शुल्क लागू केले होते. रेस्टॉरंट ४-६ किमी अंतरावरील डिलिव्हरीसाठी २० रुपये आणि ६ किमी पेक्षा जास्त अंतरासाठी ४० रुपये शुल्क आकारणार असल्याचे झोमॅटोकडून जाहीर करण्यात आले होते. झोमॅटोच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, झोमॅटोने वाढवलेले शुल्क केवळ २ रुपये असले तरी याची मोठा आर्थिक फायदा कंपनीला होणार आहे. या निर्णयामुळे कंपनीला महिन्याला १५ कोटी रुपये मिळू शकतात, असा अंदाज आहे. तर वर्षाला कंपनीला १८०-२०० कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळण्याची शक्यता आहे. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने मात्र या शुल्कवाढीचे स्वागत केले आहे.