मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले ५ दिवस नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण केले होते, ज्यात त्यांनी यश मिळवले आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे ही त्यांची मुख्य मागणी होती. सरकारने त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्या आहेत. दरम्यान जरांगे पाटील यांनी नितेश राणे यांच्यावर मोठी टीका केली होती. ज्यात त्यांनी नितेश राणे यांना चिचुंद्री म्हणून उल्लेख करत राजकीय वातावरण तापवले होते. ज्यावर नितेश राणे काय प्रत्युत्तर देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आंदोलनाच्या दरम्यान जरांगे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती, त्यादरम्यान त्यांनी फडणविसांच्या आई बहिणीवरून अपशब्द काढले होते. ज्यावर मंत्री नितेश राणे यांनी जरांगेवर टीका केली होती. त्यानंतरही नितेश राणे यांनी मराठा आंदोलनाविरुद्ध जरांगेंचा समाचार घेतला होता. ज्याच्या प्रत्युत्तरादाखल जरांगेंची नितेश राणेवर टीका करताना जीभ घसरली. जरांगे यांनी थेट नितेश राणे यांना चिंचुद्री असे म्हणत, "फक्त एकदा आंदोलन संपू द्या, नितेश राणेंना बघतोच अशी धमकी देखील दिली होतिउ. यानंतर राणे नेमके काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. शेवटी आता नितेश राणे यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानताना दिसले. नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांचे आंदोलन संपल्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, आतापर्यंत जेव्हा मराठा समाजाने गुलाल उधळला, तो देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कालावधीमध्येच! आता मराठा समाजाने याची दखल घेतली पाहिजे. प्रत्येक मराठा समाजातील नागरिकांने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले पाहिजेत, असे नितेश राणेंनी म्हटले.