Wednesday, September 3, 2025

संस्कृती आणि स्त्रीगीते

संस्कृती आणि स्त्रीगीते

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर

सभोवताली पसरलेल्या हिरव्यागार वातावरणात सणा-उत्सवाच्या दिवसांमध्ये महाराष्ट्र एका वेगळ्याच आनंदाने न्हाऊन निघालेला असतो. अशावेळी हमखास आठवण होते महाराष्ट्रातील स्त्रीगीतांची! गौरीच्या सणानिमिताने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात अनेक स्त्रीगीते रचली गेली आहेत. स्त्रिया सखी गौराईला जिव्हाळ्याने साद घालतात, घागर घुमू दे, देवा पावा वाजू दे पाव्याच्या नादानं गौराय कधी येशील गं आणिही साद ऐकून नाना फुलांनी नटलेल्या रानाची आस मनात जपणारी गौरी जणू काही शब्द देते, पाऊस पडलं, नदी भरलं तवा येईन गं तेरड्याच्या फुलावरी वस्ती करीन गं सासुरवाशिणीना या दिवसांत माहेरी जायची ओढ लागते, तशी गौराईला देखील माहेरी जावेसे वाटते. तेव्हा ती शंकराची परवानगी काढून माहेरी जाण्यास निघते अशी कल्पना एका स्त्रीगीतात दिसते. गौर पुशी शंकरासी, स्वामी विनंती तुम्हासी मला पाठवा माहेरासी, भेदून येईन आई बापांशी तर तिच्या माहेरी जाण्याबद्दलची ओढ अन्य एका स्त्रीगीतामधून खालीलप्रमाणे दिसते, कराड-कोलापूरच्या गौराय निगाल्या म्हायारी त्येंच्या ग पैंजनाचा नाद येतुया दुयेरी निसर्गाचे लेणे गौरीने ल्यावे, अशी आकांक्षा एका गीतात खालीलप्रमाणे व्यक्त होते. आला शंकरूबा शंकरुबा गवर माजी लेवू दे मोरपंखी चोळी गवर माजी लेवू हिरव्या रानात रानात गवर माजी नाचूं दे गौराईची पावले सुख-समृद्धी, आरोग्य, वैभव घेऊन येते अशी श्रद्धा आहे. खालील गीत संवादातून हे सूचित होते. गवराय आली गवराय आली कोणत्या पायानं? हळद कुंकवाच्या हिऱ्या माणकांच्या गौरीच्या घरी येण्याचे अपार कौतुक आणि त्याकरताचे रितीरिवाज यांचे सुंदर वर्णन गीतामधून येते. रानामागली तुळस पानाफुलांनी भरली जोडव्याच्या नादी गौर माझी लवली किंवा माहेराले आली काय काय गौरा लेली बापानं घेतला वो सोनसडा किंवा गुळाची पापडी तिळानं घोळली लाडाची गवरा माहेराला आली गौरीचा सण महाराष्ट्रात सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो. तिची रूपेही नानाविध! ठिकठिकाणी जागरण करून गौरीच्या आगमनाचा आनंद वेगवेगळे खेळ खेळून साजरा केला जातो. घागर घुमू दे, घुमू दे गोकुळाच्या नारी गौर माझी घुमू दे जोडव्याच्या नादी गौर माझी घुमू दे साखळ्यांच्या नादी गौर माझी घुमू दे बिलवरांच्या नादी हौशी स्त्रियांनी विविध दागिन्यांचा उल्लेख देखील गीतांमधून केलेला आढळतो. गौरी आगमनाचा जसा सोहळा असतो तसे तिच्या पाठवणीच्या प्रसंगांचे वर्णनही स्त्रीगीतांमधून येते. माझ्या लाडक्या गवरे अंगणी तापतंय दूध दुधा पिवळी साय ये गं गवरी बाई एवढं पिऊनि जाये किंवा माय बोले लाडक्या लेकी, बुगड्या लेवून जाय गो आता गं माय कवा लेवू शंकर वाट पाय गो स्त्रीगीतांचा, लोककथांचा उल्लेख नि संदर्भ सरोजिनी बाबर, शांताबाई शेळके, अरुणा ढेरे, तारा भवाळकर यांच्या लेखनात विविध किणी गुंफलेला आढळतो. या अभ्यासातून आपल्या लोकसंस्कृतीच्या वैभवाच्या खुणा आवर्जून दिसतात नि मन प्रसन्न होते. हा संस्कृतीचा आरसा अधून मधून समोर धरायला सणांचे निमित्त तर नेहमीच असते.
Comments
Add Comment