
गुन्हेगारांची मानसिकता आणि त्यामागील मानसशास्त्रीय कारणे, गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या लोकांची मानसिकता एकाच साच्यात बसवता येत नाही. प्रत्येक व्यक्तीबाबतीत कारणे वेगवेगळी असू शकतात, पण काही सामान्य मानसिक कारणे आणि सामाजिक घटक यामागे कारणीभूत असतात. याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.
समाजात नेहमीच घडणाऱ्या चोरी, घरफोडी, दरोडा, लुटमार आणि कोणत्याही स्वरूपाची आर्थिक फसवणूक यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सामान्य जनतेमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते. जनतेचे मेहनतीने साठवलेले, बँक अकाउंटमध्ये असलेले, रिटायरमेन्टचे पैसे, दागदागिने, रोकड, पार्किंगमधील वाहने देखील चोरटे हातोहात लंपास करतात. शहरी तसेच ग्रामीण भागातसुद्धा जबरी लूट, दरोडा, घरफोडी, महिलांचे मंगळसूत्र खेचणे, खोटे कॉल सेन्टर, सायबरमार्फत आर्थिक फसवणूक, पैसे दाम दुप्पट करणे, सरकारी नौकरी लावण्याच्या बहाण्याने असे आमिष दाखवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक सुरू आहे. अनेकदा जीवघेणा हल्ला करणे, अपहरण करणे त्यानंतर ब्लॅकमेल करणे यांसारख्या गंभीर घटना देखील घडताना आपण पाहतो. सुशिक्षित, पदवीधर व्यक्तीसुद्धा अशा गुन्ह्यात सहभागी असल्याचे दिसते. अशा गुन्हेगारांना आपण व्हाईट कॉलर क्रिमिनल म्हणू शकतो. अशा गुन्हेगारांचे उच्च राहणीमान, सर्व भाषा सफाईदारपणे बोलणे, त्यांच व्यक्तिमत्त्व, विषयाचं सादरीकरण इतकं प्रभावी असतं की कोणीही त्यांच्यावर संशय घेत नाही. अशा प्रकारचे गुन्हे करणारी व्यक्ती केवळ लोभी किंवा वाईट नसते, तर त्यांच्या या कृतींमागे अनेक जटिल मानसशास्त्रीय कारणे दडलेली असतात. या कारणांना समजून घेणे आणि त्यावर योग्य उपाययोजना करणे हे समाजाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा चोरी, घरफोडी यांसारख्या गुन्ह्यांचे मूळ कारण दारिद्र्य आणि बेरोजगारी असते. जेव्हा एखादी व्यक्ती मूलभूत तसेच दैनंदिन जीवनासाठी आवश्यक गरजा पूर्ण करू शकत नाही, तेव्हा ती हताश होऊन चुकीच्या मार्गाचा अवलंब करते. समाजात आर्थिक आणि सामाजिक असमानता वाढत असताना, काही लोकांना असे वाटते की, त्यांच्यासाठी न्याय्य मार्ग उपलब्ध नाही आणि म्हणून ते गुन्हेगारीकडे वळतात. कितीही शिकले तरी नोकरी मिळत नाही, उद्योग व्यवसायाला भांडवल उपलब्ध नाही, कोणताही प्रयत्न यश देत नाही, आर्थिक साथ देणारे कोणी नाही अशा परिस्थितीत, सरळ मार्गाने पैसे कमवणे खूप अवघड आहे किंवा खूप वेळखाऊ आहे हे लक्षात आल्यावर अनेकजण गुन्हेगारीकडे वळतात. समाजात प्रामाणिकपणाला, मेहनतीला काही किंमत नाही, खरं वागून, खरं बोलून आपली कधीच प्रगती होऊ शकत नाही असा ग्रह करून वाम मार्गाकडे सुशिक्षित लोक सुद्धा वळतात. आपल्या सरळ मार्गाने कमवलेल्या पैशात आपल्या गरजा, जबाबदाऱ्या, अपेक्षा पूर्ण होत नाही, सतत आर्थिक ओढाताण होते अशा परिस्थितीमध्ये चुकीची संगत, चुकीच्या लोकांचे सल्ले मिळाले तरी अगदी चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे लोक चुकीच्या मार्गाने पैसे कमावू लागतात. असे करत असताना त्यांना घरातून, समाजातून चांगले समजावून सांगणारे, शिकवणारे, योग्य मार्गदर्शन देणारे कोणीही न भेटल्यास हे लोक पटकन भरकटतात. हे सर्व होतानाच नैतिक मूल्यांचा अभाव अनेक लोकांमध्ये दिसून येतो. काही व्यक्तींमध्ये लहानपणापासूनच नैतिक मूल्यांची योग्य वाढ झालेली नसते. चुकीचे काय आणि बरोबर काय, याची त्यांना जाणीव नसते. कोणाला लुबाडणे हे चुकीचे वाटत नाही.
अनेकदा, अशा लोकांना चुकीचे मार्गदर्शन मिळते किंवा ते चुकीच्या संगतीमुळे गुन्हेगारीकडे आकर्षित होताना त्यांना कोणीच आडवत नाही, कोणीच आळा घालत नाही. त्यांना तत्काळ मिळणाऱ्या फायद्यासाठी इतरांचे नुकसान करणे याची थोडीही पर्वा नसते. बालपणी भोगलेले दारिद्र्य, सतत मनाला मुरड घालावी लागलेली असणे, सरळ सोप्या मार्गाने अथवा खूप मेहनत, कष्ट करूनही अपेक्षित उत्पन्न, यश न मिळणे, घरातील व्यक्तींनी योग्य दिशा न दाखवता फक्त पैसे कमवून आिण यासाठी तगादा लावणे, आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त जबाबदाऱ्या अथवा खर्च ओढवून घेणे, लहानपणापासून चांगले संस्कार मिळालेले नसणे, कायम दुर्लक्षित राहिलेले असणं यामुळे अनेक चांगल्या घरातील व्यक्ती सुद्धा चोऱ्या, लबाडी, आर्थिक फसवणूक करणे असे मार्ग निवडतात. मानसिक विकृती हे देखील महत्त्वाचे कारण अशा गुन्ह्यात पाहायला मिळते. काही विशिष्ट मानसिक विकृतींमुळे देखील व्यक्ती गुन्हेगारीकडे वळू शकते. उदाहरणार्थ, काही लोकांमध्ये 'अँटी-सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर' आढळते. अशा व्यक्तींना दुसऱ्यांच्या भावनांची पर्वा नसते आणि ते नियमांचे उल्लंघन करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यांना स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचा वापर करण्यात काहीच गैर वाटत नाही. सामाजिक दबाव आणि प्रतिष्ठा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. सुशिक्षित, सुसंस्कृत चांगल्या घरातील लोकं सुद्धा जेव्हा अशा मार्गाने पैसे उपलब्ध होण्यासाठी चुकीची कामं करतात. समाजात मिळणाऱ्या 'प्रतिष्ठेसाठी' अनेक लोक गुन्हेगारीकडे वळतात. उदाहरणार्थ, टोळीमध्ये सामील होणे, धोकादायक कृत्ये करणे, समाजात लवकर श्रीमंत होण्याचा दबाव असतो आणि त्यातून फसवणूक, ऑनलाइन स्कॅम यांसारखे गुन्हे घडतात. अशा गुन्हेगारांना 'स्मार्ट' किंवा 'हुशार' मानले जाते आणि समाजामध्ये त्यांना एक प्रकारची चुकीची प्रतिष्ठा मिळते.
अशा प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी काय करता येईल? यावर चर्चा करणे आजकाल खूप निकडीचे आहे. सामाजिक दृष्टीने आर्थिक विकास करणे गरजेचे आहे. गरिबी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने प्रभावी योजना राबवणे आवश्यक आहे. लोकांना रोजगार आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्यास, ते चुकीच्या मार्गाकडे वळणार नाहीत. तसेच, गरीब आणि वंचित लोकांसाठी योग्य पुनर्वसन कार्यक्रम सुरू करणे गरजेचे आहे. शिक्षण तसेच नैतिक शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. शाळेतील अभ्यास क्रमांव्यतिरिक्त मुलांना लहानपणी मूल्य, तत्त्व, चांगलं वाईट शिकवण्यात आले पाहिजे. शाळांमध्ये नैतिक मूल्यांवर आधारित शिक्षण देण्यावर भर दिला पाहिजे. अनेकदा घरातील खूप गरिबीचे वातावरण, आहे त्यात समाधान मानन्याची वृत्ती नसणे, लोकांवर अधिकाधिक प्रभाव टाकण्याची जिद्द, आपण खूप वेगळे, मोठे कोणीतरी आहोत हा भ्रम टिकवण्याची मानसिकता, सुखी असण्यापेक्षा सुखी आहोत हे दाखवण्यासाठी केलेली धडपड व्यक्तीला चुकीच्या मार्गाने पैसे मिळवायची प्रेरणा देते. समुपदेशन थेरपी आणि उपचार उपलब्ध करून दिल्यास अशा लोकांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवता येऊ शकतो. मानसिक आरोग्य तपासणी आणि उपचार सहज उपलब्ध करून दिल्यास, व्यसनाधीनता आणि इतर मानसिक समस्यांमुळे होणारे गुन्हे कमी होतील. समाजातील प्रत्येक व्यक्तीने फसवणुकीचे प्रकार, ऑनलाइन स्कॅम आणि इतर गुन्हेगारी कृत्यांविषयी जागरूक असणे महत्त्वाचे आहे. आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल साक्षरता वाढवणे आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, नागरिकांनी संशयास्पद किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांबद्दल पोलिसांना त्वरित माहिती दिली पाहिजे. आपल्या आजूबाजूला कुठेही कोणीही असे चुकीचे कृत्य करते आहे अथवा करू शकते अशी जाणीव झाल्यास त्याला वेळेत आळा घातला गेला पाहिजे. या उपाययोजनांचा एकत्रित वापर केल्यास, समाजात सुरक्षितता वाढू शकते आणि गुन्हेगारी कृत्ये करण्यामागील मूळ कारणांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. गुन्हेगाराला केवळ शिक्षा देणे पुरेसे नाही, तर त्याच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यामागील कारणे दूर करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. कायद्याने झालेली शिक्षा गुन्हेगाराला तात्पुरते रोखण्यासाठी मदत करते; परंतु अनेक लोकांमध्ये शिक्षा भोगून पण गुन्हेगारी वृत्ती कायम राहते. अनेकदा शिक्षा भोगल्यावर गुन्हेगार जास्त पक्का होतो, निरड होतो आणि जास्त जोमाने परत त्या मार्गाकडे आगेकूच करतो त्यामुळे गुन्हेगारीचा समूळ नायनाट करण्यासाठी गुन्हेगारांचे समुपदेशन खूप मोलाची भूमिका बजावते.
- मीनाक्षी जगदाळे