Saturday, October 25, 2025
Happy Diwali

लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारणार

लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारणार
मुंबई : महाराष्ट्र सरकारने लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची इमारत ५ कोटी रुपयांना लिलावात जिंकली असून, तेथे छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारण्यात येणार आहे. उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयातील विधिमंडळ वार्ताहर कक्षात पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. हे केंद्र जगातील मराठी भाषेचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित होईल आणि त्यासाठी विशेष यंत्रणा उभी करण्यात येईल. महाराष्ट्र हे असे वैश्विक भाषा केंद्र तयार करणारे देशातील पहिले राज्य ठरेल, अशी माहिती सामंत यांनी दिली.

मंत्री सामंत म्हणाले, "मराठी भाषा आम्हाला सातासमुद्रापार न्यायची आहे. त्यादृष्टीने आम्ही प्रत्यक्ष कार्यवाही केलेली आहे. या परिसरात १ लाखांहून अधिक मराठी बांधव आहेत. त्यांच्या मुलांना मराठी भाषा कळावी यावी, यासाठी विविध उपक्रम राबवणार आहोत. मराठी बोलता येत नसले तरी कोणाच्या कानाखाली मारणे हा उपाय नाही, तर ज्यांना मराठी येत नाही त्यांना शिकवणे ही आपली जबाबदारी आहे. उद्योग विभागामार्फत मराठी बांधवांसाठी तेथे रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. या इमारतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येईल आणि एक-दोन महिन्यांत ही जागा ताब्यात घेतली जाईल". लंडनमध्ये एक लाख मराठी भाषिक असून महाराष्ट्र मंडळ लंडन ही युनायटेड किंगडममधील सर्वात जुन्या मराठी संस्थांपैकी एक आहे. १९३२ मध्ये महात्मा गांधींच्या दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या निमित्ताने ब्रिटिश सरकारसोबत लंडनला आलेल्या महात्मा गांधींचे सचिव डॉ. एन. सी. केळकर यांनी या मंडळाची स्थापना केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देखील या मंडळाचे सभासद होते. १९८९ मध्ये उदार देणग्यांद्वारे हा परिसर खरेदी करण्यात आला होता.
Comments
Add Comment