मुंबई : पश्चिम रेल्वेच्या जलद लोकल गाड्या येत्या शनिवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री १०:३० पर्यंत मुंबई सेंट्रल आणि चर्चगेट दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. तसेच सर्व धीम्या लोकल गाड्या चर्नी रोड स्थानकावर थांबणार नाहीत.त्याचबरोबर पश्चिम रेल्वेकडून शनिवारी मध्यरात्री १२ विशेष लोकल गाड्या चालवल्या जातील. शनिवार व रविवार पहाटे गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर येणाऱ्या भाविकांसाठी चर्नी रोड स्थानकावर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात काही बदल केले आहेत. पश्चिम रेल्वेकडून शनिवारच्या मध्यरात्री चर्चगेट आणि विरार दरम्यान १२ अतिरिक्त लोकल गाड्या चालवल्या जातील. तसेच संध्याकाळी ४ ते रात्री ८:३० पर्यंत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यानच्या सर्व स्थानकांवर जलद अप लोकल थांबतील. तर संध्याकाळी ४ ते रात्री ९:३० पर्यंत चर्नी रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर सर्व अप धीम्या लोकल थांबणार नाहीत जेणेकरून प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ वर येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी होऊ नये.