
दी लेडी बॉस : अर्चना सोंडे
गरज ही शोधाची जननी मानली जाते. तिच्या बाबतीत ही उक्ती १०० टक्के खरी ठरली. चेहऱ्यांवर आलेल्या मुरुमांवर तिने उपाय शोधला. या उपायांमुळे ती उद्योजिका म्हणून घडली. एवढंच नव्हे तर ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल आज तिची कंपनी करत आहे. ती उद्योजिका म्हणजे डेगा ऑर्गेनिक्सची आर्थी रघुराम.
तामिळनाडूतील इरोड येथील आर्थी रघुराम यांनी स्वतःला झालेल्या त्वचेच्या समस्येतून डेगा ऑर्गेनिक्सची संकल्पना उभी केली. शाळा आणि महाविद्यालयीन काळात मुरुमांच्या समस्येमुळे त्यांनी असंख्य उपाय केले, डॉक्टरांचा सल्ला घेतला, क्रीम वापरली, पण परिणाम तात्पुरता ठरला. शेवटी त्यांना कळले की त्यांनी वापरलेली औषधे (बेंझॉयल पेरोक्साईडयुक्त) दीर्घकाळ वापरल्याने त्वचेवर विपरीत परिणाम होत होता. तेव्हा त्यांनी बाजारातील रसायनयुक्त उत्पादनांना नाकारून घरगुती नैसर्गिक उपाय करण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांना उत्तम परिणाम दिसले. हाच अनुभव नंतर व्यवसायाच्या कल्पनेत परिवर्तित झाला.
आर्थीचे वडील ‘आर्थी कॉम्प्रेसर’ नावाने कॉम्प्रेसर निर्मिती व्यवसाय करतात. आपल्या वडिलांपासून प्रेरणा घेऊन स्वतःही व्यवसाय करायचा ठरवून आर्थीने पीएसजी कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी संपादन केली. कोईम्बतूर येथील जॅन्सन्स स्कूल ऑफ बिझनेसमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पीजी डिप्लोमा पूर्ण केला. शालेय जीवनात ती उत्तम क्रीडापटू होती. सात वर्षे खो-खो संघाची कर्णधार, राज्यस्तरीय थ्रो बॉल खेळाडू आणि रिले धावपटू म्हणून तिने आपला ठसा उमटवला. क्रीडा आणि नृत्याची आवड असूनही आर्थीला व्यवसायातच आपले भविष्य दिसले.
२०१७ साली तिने साबण बनवण्याच्या एका कार्यशाळेला हजेरी लावली. यानंतर घरी विविध साबण तयार करण्यास तिने सुरुवात केली. त्यातील ‘चारकोल साबण’ने तिची त्वचा सुधारली. हा परिणाम तिच्या मित्रपरिवारालाही जाणवला. त्यांच्याच सांगण्यावरून आर्थीने याला व्यवसायाचा आकार दिला. २०१८ मध्ये इरोडमधील एका शाळेत छोटा स्टॉल लावून तिने पहिले साबण विकले आणि एका दिवसात तब्बल ११,०५० रुपयांची विक्री केली. हीच खरी सुरुवात होती.
आर्थीचे पती रघुराम एक बांधकाम व्यवसायिक आहेत. रघुराम आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने आर्थीने इरोडमध्ये लहानसे उत्पादन केंद्र सुरू केले. काही उत्पादनांसह डेगा ऑर्गेनिक्सची स्थापना केली. ‘डेगा’ हा शब्द तमिळमधील देयगम या शब्दापासून घेतला असून त्याचा अर्थ ‘शरीर’ असा होतो. सुरुवातीला साबण, फेस पॅक, केसांचे तेल व सीरमपासून सुरू झालेला प्रवास आता १०० हून अधिक उत्पादनांपर्यंत पोहोचला आहे.
चारकोल साबण हे सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन ठरले आहे, कारण ते कोरड्या आणि तेलकट त्वचेवरही परिणामकारक आहे. यानंतर बीटरूट लिप बाम लोकांच्या पसंतीस उतरला. हा लिप बाम पूर्णपणे नैसर्गिक असून गिळला गेला तरी निरुपद्रवी आहे. उत्पादनांची किंमत २५० रुपयांपासून (लिप बाम) ते १२०० रुपयांपर्यंत (केसांचे तेल) आहे. किंमत तुलनेने जास्त असली तरी त्यामागे सेंद्रिय कच्चा माल आणि वेगळी उत्पादन पद्धती हे कारण आहे.
आर्थीच्या कुटुंबाच्या ६० एकर शेतात नारळ, कोरफड व एरंडेल तेलाचे उत्पादन होते. याशिवाय भारतातील आणि परदेशातील शेतकऱ्यांकडूनही सेंद्रिय कच्चा माल खरेदी केला जातो. सर्व उत्पादनांमध्ये रसायनमुक्त घटक वापरण्यावर तिचा कटाक्ष आहे. सुरुवातीला फक्त माऊथ पब्लिसिटीवर चालणारा व्यवसाय आता सोशल मीडिया कॅम्पेन आणि ऑनलाइन जाहिरातींमुळे वेगाने वाढला आहे. आज डेगा ऑर्गेनिक्सचे ८-१०% ग्राहक परदेशात आहेत.
आर्थीला तीन वर्षांचा मुलगा आहे. व्यवसाय आणि मातृत्व दोन्ही सांभाळणे आव्हानात्मक असले तरी, पती आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे ते शक्य झाले आहे, असे आर्थीचे म्हणणे आहे. समस्या ही प्रत्येकाला असते. त्यातून मार्ग काढतो तो खरा, पण त्यातून उद्योग उभारतो ती खऱ्या अर्थाने लेडी बॉस होय.