वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांच्या निर्णयांमुळे मोठ्या अडचणीत आले आहेत. त्यांनी भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ (आयात शुल्क) लावले आहे, ज्याचा तीव्र विरोध होत आहे. शिकागो आणि वॉशिंग्टनमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, या विरोध प्रदर्शनामागे कारण केवळ टॅरिफ नाही, तर इतरही कारणे आहेत. अमेरिकेत श्रमिक दिनानिमित्त अनेक शहरांमध्ये ट्रम्प यांच्या धोरणांचा जोरदार विरोध करण्यात आला. आंदोलन करणाऱ्यांची मागणी होती की, त्यांच्या मेहनतीनुसार त्यांना योग्य वेतन मिळायला हवं. या वेळी आंदोलकांनी “ट्रम्प को अब जाना होगा” अशा घोषणा दिल्या.
ट्रम्प टॉवरच्या बाहेर ‘नेशनल गार्ड्स’ विषयी मुद्दा उपस्थित झाला. आंदोलकांनी ‘नो नेशनल गार्ड’ अशा घोषणा दिल्या. ट्रम्प यांनी काही शहरांमध्ये नेशनल गार्ड तैनात करण्याचे आदेश दिले होते. त्यांचा दावा होता की ते देशाला सुरक्षित बनवू इच्छितात. त्यांनी शिकागो आणि वॉशिंग्टनला क्राइम फ्री करण्याचे आश्वासन दिले होते. वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या विरोधात शिकागो, वॉशिंग्टन डी.सी., आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये देखील आंदोलन झाले. या दरम्यान शिकागोमध्ये एक महिला गाडीतून उतरून आंदोलकांसमोर ‘डोनाल्ड ट्रम्प जिंदाबाद’ अशा घोषणा देऊ लागली. हे पाहून आंदोलकांनी तिला घेरले. काही वेळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र काही मिनिटांत ती महिला तिथून निघून गेली. ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर टॅरिफ लावले, पण भारतावर २५ टक्के अतिरिक्त शुल्क लावल्यामुळे एकूण ५० टक्के टॅरिफ लागू झाले आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. टॅरिफच्या मुद्द्यावर ट्रम्प यांच्यावर त्यांच्या स्वतःच्या देशातही टीका होत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी सांगितले की, भारतावर टॅरिफ लावणे योग्य नाही. त्यांनी म्हटले की, यामुळे भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर वाईट परिणाम होईल.