Tuesday, September 2, 2025

आझाद मैदान तातडीने रिकामं करा; मुंबई पोलिसांची जरांगेना नोटीस

आझाद मैदान तातडीने रिकामं करा; मुंबई पोलिसांची जरांगेना नोटीस
मुंबई:  मनोज जरांगे हे मागील पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. उच्च न्यायालयाने आंदोलकांना रस्ते रिकामे करण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना देखील आझाद मैदान खाली करण्याची नोटीस बजावल्याचे समजते. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मागील पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. पोलिसांकडून जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटी-शर्तींसह आंदोलनास परवानगी देण्यात आली होती. परंतु या आंदोलनात नियमांची पायमल्ली होत असल्याचं सांगत काल मुंबई हायकोर्टाने आंदोलकांनी व्यापलेले दक्षिण मुंबईतील रस्ते रिकामे करण्याचे आदेश दिल्यानंतर आता मुंबई पोलिसांनीही जरांगे यांना नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही दिलेले नियम पाळले जात असल्याचं सांगत मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील आणि त्यांच्या कोअर कमिटीला आझाद मैदान रिकामे करण्यासाठी नोटीस बजावल्याचे समजते.

नोटीस मिळाली नसल्याचं कोअर कमिटीचा दावा

आझाद मैदान पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून लवकरात लवकर आझाद मैदान खाली करण्याबाबत पत्रात म्हटले आहे. तसेच पत्रात मनोज जरांगे पाटलांनी प्रसार माध्यमांवर केलेल्या वक्तव्यचाही पोलिसांनी दखल घेत त्याचा उल्लेखही नोटीसमध्ये केला आहे. तर आम्हाला नोटीस मिळाली नसल्याचं कोअर कमिटीचा दावा केला आहे. आता या नोटीशीला जरांगे यांच्याकडून कसा प्रतिसाद दिला जातो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, तसेच मेलो तरी मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मैदान सोडणार नाही असा पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला आहे. दरम्यान, सरकारच्या शिष्टमंडळाने केलेल्या प्राथमिक चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम होते. मात्र त्यानंतर सरकारकडून अद्याप कोणताही प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही मंत्री आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीतील चर्चेनंतर सरकारकडून आज जरांगे पाटील यांना एक प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचे समजते. दरम्यान, "इतर मागासवर्ग प्रवर्गातच (ओबीसी) मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं आमरण उपोषण आंदोलन शांततेनं आणि अटी व नियमांचं पालन करून होत नसल्याचं स्पष्ट आहे’, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नोंदवलं असून मुंबईतील शांतता बिघडू नये आणि जनजीवन सुरळीत व्हावे यादृष्टीने मनोज जरांगे पाटील, वीरेंद्र पवार व अन्य प्रतिवादींनी आंदोलकांनी व्यापलेले सर्व रस्ते व संबंधित जागा आज, मंगळवारी दुपारी १२ पर्यंत रिक्त होतील आणि त्या जागा स्वच्छ होतील, याची खबरदारी घ्यावी, असा आदेश न्या. रवींद्र घुगे व न्या. गौतम आंखड यांच्या खंडपीठाने दिला. तसंच आज, मंगळवारी दुपारी १ वाजता नियमित न्यायालयात पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा