पुणे : पुणे-पानशेत रस्त्यासह सिंहगड, पानशेत भागात वारंवार बिबटे आढळण्याचे प्रकार घडत आहेत. भरदिवसा बिबट्यांचे दर्शन होत असल्याने या परिसरात दहशत पसरली आहे. परिणामी, येथील स्थानिकांसह पर्यटकांनाही धोका निर्माण झाल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे सुरक्षेसाठी वन विभागाने मुख्य पानशेत रस्त्यासह परिसरात रात्रीची गस्त सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.याबाबत हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती किसनराव जोरी यांनी वन विभागाचे लक्ष वेधले आहे.
जोरी म्हणाले की, सिंहगड किल्ल्याच्या डोंगररांगांतून व खडकवासला धरणतीरावरून जाणार्या पानशेत रस्त्यावर मोठी वर्दळ असते. खानापूर ते पानशेत यादरम्यानचा रस्ता जंगलातून जातो. या भागात बिबट्यांचे लपणक्षेत्र आहे. त्यामुळे खाद्य किंवा पाण्यासाठी बिबट्यांसह वन्यप्राणी रस्त्याच्या बाजूला फिरतात. बिबटे, तरस असे प्राणी थेट खासगी कंपन्या, फार्म हाऊस, जनावरांच्या गोठ्यात शिरण्याचे यापूर्वी प्रकार घडले आहेत. त्यामुळे या परिसरात या प्राण्यांची मोठी भीती आहे. पानशेत रस्त्यावरील मालखेड (ता. हवेली) येथील एका खासगी कंपनीत बिबट्याने गेल्या आठवड्यात ठाण मांडले होते. त्या वेळी कंपनीच्या वॉचमनसह कामगारांची मोठी धावाधाव झाली होती. सिंहगड पायथ्याच्या थोपटेवाडी, काळुबाई मंदिर भागातील जंगलात दोन बिबट्यांचा वावर आहे. कुत्री, वासरे अशा जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. दरम्यान, सिंहगड वन विभागाने मालखेड, सिंहगड भागातील कंपन्या, गावोगाव जनजागृती सुरू केली आहे.
वन विभागाची गस्त सुरु
पानशेत, रुळे, धिंडली भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी पानशेत वन विभागाच्या वनपरिमंडल अधिकारी स्मिता अर्जुने, वनरक्षक राजेंद्र निंबोरे यांच्या पथकाने गस्त सुरु केली आहे.