
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत लाखोंचा मराठा जनसमुदाय मुंबईत गेल्या चार दिवसांपासून ठाण मांडून बसला आहे. ज्यामुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था आणि मुंबईकरांचे जनजीवनदेखील विस्कळीत झाले आहे. त्यामुळे हे आंदोलन लवकरात लवकर संपावे याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर न्यायालयाने जरांगेना मुंबईचे रस्ते तात्काळ मोकळे करून देण्याचे आदेश दिले, तसेच नियमांची पायमल्ली केल्याबद्दल आज मनोज जरांगे आणि त्यांच्या कोअर समितीला दुपारी ३ वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करण्याची नोटिस मुंबई पोलिसांनी जारी केली होती. ज्यावर मेलो तरी मैदान सोडणार नाही असा पवित्रा जरांगे यांनी घेतल्यामुळे, आंदोलन चिघळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील मराठा आंदोलनाच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.
आज आंदोलनाच्या पाचव्या दिवशी इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटलांची आझाद मैदानावर जाऊन भेट घेतली. जलील यांनी, जरांगे यांना पोलिसांनी हाथ लावल्यास अथवा पोलिसांनी बळजबरी केल्यास मुस्लिम समाज छातीचा कोट करून सर्वात पुढे असेल, असे आश्वासन देत, त्यांना खंबीर पाठिंबा दिला आहे.
मुंबई पोलिस ॲक्शन मोडवर
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार मुंबई पोलिस ॲक्शन मोडवर असून मुंबई शहरासह नवी मुंबईला छावणीचे स्वरूप आलं आहे. जब्बल 60 हजाराहून अधिक पोलीस रस्त्यावर राज्य सरकारने उतरवले आहे. दरम्यान मुंबई आणि नवी मुंबईतील चौकाचौकातील आंदोलकांची वाहने आणि आंदोलकांना उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हटवण्यात आले आहे.
जरांगे यांना एमआयएमकडून पाठिंबा!
दरम्यान एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट आझाद मैदावर जावून भेट घेतली. त्यांनी यावेळी अगदी पहिल्या दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास एमआयएमचे अध्यक्ष बॅरिस्टर असेदुद्दिन ओवेसी यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांच्या आंदोलनाचा मुद्दा देखील लोकसभेत उचलला आहे. जरांगे पाटील यांची आरक्षणाची मागणी रास्त असून ती सरकारने पूर्ण करायला हवी. ती पूर्ण न करता आता सरकार हे आंदोलन दडपण्याच्या प्रयत्न करत आहे. या आंदोलनाकडे सरकार अजिबात गांभीर्याने बघत नाही. या आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी आमची मागणी आहे. मी स्वत: जरांगे पाटील यांचा मोठा फॅन आहे. मी त्यांच्यासोबत कायम आहे व राहणार असेही जलील म्हणाले.
जलील यांनी पुढे म्हंटले की, "जरांगे यांच्या या आंदोलनास MIM चा आणि मुस्लिम समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे मी राज्य सरकार आणि मुंबई पोलीसांना हा इशारा देवू इच्छतो की, जरांगे यांच्यावर बळजबरी करू नका. सरकार अथवा पोलिसांनी बळजबरी केल्यास, हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केल्यास याचे परिणाम भोगावे लागतील. या दडपशाहीच्याविरोधात जितक्या ताकदीने मराठा समाज रस्त्यावर उतरेल, तितक्याच ताकदीने मुस्लिम समाजही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उतरलेला असेल'. फक्त चारच दिवसात सरकार नोटीशी देऊन सांगते की आता घरी जा. त्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करू द्या. ही लोकशाही आहे, हुकूमशाही नाही, असेही त्यांनी सरकारला ठणकावले आहे.
मराठा आरक्षणासाठी मुस्लिम समाजाकडून मदत?
ओबीसी प्रवर्गातून १० टक्के आरक्षण मिळवण्याच्या मागणीवर हे आंदोलन होत आहे. यासाठी जरांगे समर्थक लाखोंच्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. पण या गर्दीने मुंबई शहराला वेठीस धरले आहे. इतकेच नव्हे तर आंदोलकांमधील काही हुल्लडबाजांना चेव फुटला आहे. आंदोलन हाताबाहेर आणि नियमाबाहेर जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने तसेच न्यायालयाने कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र या दरम्यान ईम्तियाज जलील यांचा मराठा आंदोलकांना पाठिंबा हा एका वेगळ्याच राजकीय षडयंत्राचा भाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच जरांगे यांच्या मागे आणखीन कोणकोणत्या छुप्या राजकीय नेत्यांचा पाठिंबा आहे, याच्या तर्कवितर्काला देखील सुरुवात झाली आहे.