Tuesday, September 2, 2025

कृत्रिम तलावात विसर्जन झालेल्या मूर्ती कचऱ्याच्या गाडीत

कृत्रिम तलावात विसर्जन झालेल्या मूर्ती कचऱ्याच्या गाडीत
भाईंदर : मीरा भाईंदरमध्ये कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आलेल्या गणेश मूर्तीचे एकत्रित संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने मीरा रोडच्या शिवार गार्डन जवळ एक केंद्र उभारले आहे. शहरातील कृत्रिम तलावातून केंद्रावर मूर्ती आणण्यासाठी पालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीचा वापर करून त्यातून मूर्ती नेल्या जात असल्याने गणेशभक्तांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मीरा भाईंदर महापालिकेने ६ फुटांखालील गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा निर्णय घेऊन शहरात ३५ कृत्रिम तलावाची निर्मिती केली. परंतु त्यात अनेक गैरसोयी असल्याने दीड दिवसांचे गणपती विसर्जन करण्यासाठी काही ठिकाणी विरोध झाला होता त्यावरून मोठा वादंग होऊन ३१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु त्यात प्रशासनाने सुधारणा केली नाही. मंगळवारी गौरी गणपती विसर्जन करण्यासाठी सर्व तलावावर मूर्ती येत होत्या. तेथे गणेश भक्ताना संताप आणणारी दृश्य पाहायला मिळत होती. काशिमिरा येथील जरीमरी तलावाजवळ उभारलेल्या कृत्रिम तलावात विसर्जित झालेल्या मूर्तीची दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या कचऱ्याच्या गाडीतून वाहतूक केली जात होती. असेच प्रकार अनेक कृत्रिम तलावाजवळ दिसत असल्याची तक्रार अनेक गणेश भक्तांनी केली आहे. जरीमरी या नैसर्गिक तलावाजवळ असलेल्या कृत्रिम तलावात गेल्या सात दिवसात मोठ्या संख्येने गणेश मूर्तींचे विसर्जन झाले आहे. विसर्जन झाल्यावर लगेचच कर्मचारी मूर्ती बाहेर काढून ठेवत होते. तरी देखील कृत्रिम तलावात व आजूबाजूला पीओपीचा गाळ साठला गेला हा गाळ स्वच्छ करण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी त्यावर पाण्याचा मारा करून तो नैसर्गिक तलावात टाकला त्यामुळे नैसर्गिक तलाव दूषित झाल्याची बाब समोर आली आहे. न्यायालयाचे आदेश न पाळणाऱ्या ३१ नागरिकांवर गुन्हे दाखल केले आता या कर्मचाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करा अशी मागणी गणेश भक्त करत आहेत. विसर्जित गणेशमूर्तीच्या वाहतुकीचे नियोजन करण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. मात्र कचऱ्याच्या वाहनातून ती केली जात असल्यास त्याबाबत माहिती घेऊन उचित कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.
Comments
Add Comment