
नागपूर : बाबासाहेब चळवळीतील दामूदा शिवाजी मोरे यांचे निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा संवेदनशील अनुयायी हरपला असल्याच्या शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे. दामूदा मोरे यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्याची बातमी शहरभर लाऊडस्पीकरने प्रसारित केली होती. त्यांच्या या बातमीने सर्वत्र खळबळ माजली, तसेच यामुळे त्यांना बाबासाहेबांच्या अनुयायांकडून मरण देखील झाली होती.
पंच्याहत्तर वर्षांपूर्वी नागपुरात सर्वात मोठी मोरे साऊंड सर्विस होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नागपुरात होणाऱ्या सर्व सभांमध्ये मोरे साऊंड लावण्यात येत होता. विशेष म्हणजे, गुलाम अली, जगजितिसंग यांच्या कार्यक्रमात दामूदा यांचीच साऊंड सर्विस असायची. गायक किशोरकुमार यांच्याशी त्यांची जवळीक होती, त्यांच्या कार्यक्रमातही दामुदांची सिस्टिम होती. विशेष असे की, दामुदा यांच्या स्कुटरवर मागे बसून किशोरकुमार शहरात फिरले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९५६ च्या धम्मदीक्षा सोहळ्यात मोरे कुटुंबियांचा लाऊस्पीकर होता. काका नामदेव मोरे यांच्या सोबत दामूदा यांनीही दीक्षा घेतली होती. सहा डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यावर पहाटे रिक्षात बॅटरी, हातात माईक अन् डोळ्यात अश्रू घेऊन दामूदा आनंदनगर, भानखेडा, नवी शुक्रवारी, कर्नलबाग, जोगीनगर, इंदोरामध्ये ‘बाबासाहेब गेले...'' एवढेच बोलत फिरत होते. तेव्हा काहींनी त्यांना मारहाण केली होती. त्यांच्या निधनाने दामुदा यांच्या या जुन्या आठवणीला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.