
मुंबई: ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे. कसोटी क्रिकेटमधील आपल्या कामगिरीवर आणि पुढील काही वर्षांत होणाऱ्या महत्त्वपूर्ण मालिकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्टार्कने हा निर्णय घेतला आहे. 35 वर्षीय स्टार्कला वाटते की, या निवृत्तीमुळे त्याला कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपली फिटनेस आणि फॉर्म सर्वोत्तम ठेवण्यास मदत होईल, ज्यामुळे तो २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी खेळू शकेल.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टार्कने २०१२ मध्ये पदार्पण केले होते आणि १३ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने ६५ सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने २३.८१ च्या सरासरीने ७९ बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियासाठी टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो ॲडम झाम्पानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाने टी-20 विश्वचषक जिंकला, त्यात त्याने मोलाची कामगिरी बजावली होती.
स्टार्कने आपल्या निवृत्तीच्या घोषणेवेळी सांगितले की, "कसोटी क्रिकेट नेहमीच माझी सर्वोच्च प्राथमिकता राहिली आहे. ऑस्ट्रेलियासाठी टी-20 क्रिकेट खेळताना मी खूप आनंद घेतला. विशेषतः २०२१ चा विश्वचषक जिंकण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. पण आता मला कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे."
मिचेल स्टार्क हा कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी चौथा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे आणि कसोटीमध्ये ४०० हून अधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार आहे.