Monday, September 1, 2025

मानसशास्त्रातील मानाचे पान

मानसशास्त्रातील मानाचे पान

वैशाली गायकवाड

मानसिक आरोग्य या संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये डॉ. शुभा सदानंद थत्ते यांचे नाव अत्यंत सन्मानाने घेतले जाते. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी क्लिनिकल सायकोलॉजी, संशोधन, अध्यापन, आणि मानसिक आरोग्य जनजागृती या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. आज आपण डॉ. शुभा थत्ते यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.

जन्मतःच मुंबईकर असलेल्या शुभाताईंना समाजसेवा या विषयांमध्ये एमएसडब्ल्यू केलेल्या त्यांच्या मामीकडून समाजकार्याचे बाळकडू लाभले. आई गृहिणी व त्यांचे वडील हे चित्रपट व्यवसायात असल्याने माडगूळकरांसारख्या दिग्गज व्यक्तींचा सहवास देखील त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला लाभला.

शालेय शिक्षणानंतर त्यांनी रुईया कॉलेजला ॲडमिशन घेतले सेकंड इयरला असताना सायकॉलॉजी विषयांतर्गत मेंटल हॉस्पिटलला विजिट दिली असताना तिथल्या पेशंटची केविलवाणी अवस्था बघून त्या क्षणी त्यांनी याच पेशंटसाठी आपण काम करायचं असा मनाशी ठाम निश्चय केला व त्यांनी बीए झाल्यानंतर क्लीनिकल सायकॉलॉजी मध्ये एमए करायचे ठरवले; परंतु असा कोर्स चार ते पाच वर्षांत डेव्हलप होणार होता. त्यादरम्यान अभियंता असणाऱ्या सदानंद थत्ते यांच्याशी शुभाताईंचा विवाह झाला व त्या ठाणेकर झाल्या. त्यांनी चार वर्षांनी त्यांच्या शिक्षणाकडे पुन्हा वाटचाल केली व शिक्षण घेता घेताच त्यांच्या कृतिशील प्रयोगशीलतेने त्यांना विविधांगी अनुभवांनी समृद्ध केले.

त्यांनी मुंबई विद्यापीठातून “Attentional Deficits in Psychiatric Disorders in Relation to Arousal and Pathology Level” या विषयावर डॉक्टरेट मिळवली. याशिवाय, NIMHANS, बंगळूरु येथून अ‍ॅडव्हान्स बिहेवियर थेरपी आणि बायोफीडबॅक कोर्स पूर्ण केला. त्यांनी केईएम रुग्णालयात वर्तणूक थेरपी युनिट सुरू करून अनेक रुग्णांना नवे जीवन दिले.

प्रो. किशोर फडके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी Rational Emotive Behaviour Therapy (REBT) (तर्कसंगत भावनिक वर्तन थेरपी ) मध्ये प्रशिक्षण घेतले. १९९६ पासून त्यांनी समाजसेवक, वैद्यकीय पदवीधर, उद्योग व्यवस्थापक, कामगार आणि सर्वसामान्य लोकांसाठी REBT प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत.

१९७२ पासून त्यांनी केईएम रुग्णालय आणि सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज येथे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून काम केले. १९९४ पासून त्यांनी सल्लागार म्हणून ठाणे आणि दादर येथे वैयक्तिक प्रॅक्टिस सुरू केली. पी. डी. हिंदुजा रुग्णालयातही त्यांनी एक वर्ष सल्लागार म्हणून काम केले. त्यांचे संशोधन कार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी ‘ट्रीटमेंट रेसिस्टंट स्किझोफ्रेनिया’ आणि ‘युनियन कार्बाईड भोपाल प्रकल्प’ यावर काम केले. त्यांनी अस्तीत्त्व, आशा निकेतन, विश्वास, आणि स्वानंद यांसारख्या मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक व्यक्तींना मदत करणाऱ्या संस्थांच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

१९९० मध्ये स्थापन झालेल्या Institute for Psychological Health(मानसिक आरोग्य संस्था) संस्थेच्या त्या संस्थापक सदस्य, ट्रस्टी आणि क्लिनिकल सुपरवायझर आहेत. आयपीएचमध्ये पालक शाळा सुरू केल्यामुळे खूप उत्तम प्रतिसाद त्यांना लाभला, पाळणाघर चालवणाऱ्या महिलांसाठी कार्यशाळा तसेच स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी सेशन, करिअर गायडन्स, सायकोलॉजिस्ट्स, मनोचिकित्सक, व सामाजिक कार्यकर्त्यांसाठी त्यांनी अनेक रिफ्रेशर कोर्सेस घेतले आहेत. तसेच अंतरंगात डोकावताना, मनाचे इंद्रधनुष्य असे कार्यक्रमदेखील आयोजित केले. तसेच या संस्थेमार्फतच त्यांनी १२०पेक्षा जास्त वॉलेंटियर्स तयार केले की जे त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमांवर निशुल्क काम करू शकतात . विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी सफर होणाऱ्या पेशंट्स ना शुभार्थी व त्याच्या शुभचिंतक असणाऱ्या पालकांना शुभंकर अशा दोन संकल्पना आयपीएचमधून मांडल्या की ज्या डब्ल्यूएचओलासुद्धा आपल्या करून घ्याव्याशा वाटल्या.

२०१८ मध्ये IPH अंतर्गत त्यांनी ‘सप्तसोपान’ हे ज्येष्ठ नागरिकांसाठी न्यूरोसायकॉलॉजिकल नर्चरन्स सेंटर सुरू केले. मानसिक आरोग्य व रुग्णांचा विकास करण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या शोभाताईंचे संशोधन SAGE’ प्रकल्पामार्फत त्यांनी ६० वर्षांवरील ५१० नागरिकांच्या मानसिक आरोग्याचे सर्वेक्षण केले आणि त्यावर आधारित २ शोधनिबंध प्रकाशित केले. ‘निरामय वृद्धत्व’ या नावाने त्यांनी ५० वर्षांवरील नागरिकांसाठी जीवनशैलीत बदल घडवणारे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. Parkinson’s Disease वरील PDMDS संस्थेसाठी देखील एक प्रशिक्षण मॉड्युल तयार केला आहे. मुंबई विद्यापीठात त्यांनी एम. ए., एम. फिल., एम. डी., डी. पी. एम., एम. एस्सी. नर्सिंग आणि ऑक्युपेशनल थेरपीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. त्या पीएचडी. आणि एम.फिल. मार्गदर्शिका असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ७ पीएच.डी. व ५ एम.फिल. शिष्यांनी पदवीप्राप्त केली आहे.

कोरोना काळात त्यांनी ऑनलाइन मार्गदर्शन सत्रांद्वारे अँगर मॅनेजमेंट”, “पालकत्व”, “ताणतणाव व्यवस्थापन”, “REBT”, “आत्मभान” अशा विविध विषयांवर कार्यशाळा घेतल्या.

तसेच त्या रिलायन्स समूहाच्या POSH समित्यांवर कार्यरत आहेत. ‘Ethicos’ या स्वतंत्र नीतिशास्त्र समितीच्या त्या अध्यक्षा असून, औषध चाचण्यांचे मूल्यांकनही करतात. मराठी विश्वकोशाच्या मानसशास्त्र विभागाच्या त्या समन्वयक आहेत.

बऱ्याच आजारांचे मूळ हे मनाशी संबंधित असते मनावरच काम करणाऱ्या या मनस्वींना राष्ट्रीय व प्रादेशिक मानसोपचार परिषदांमध्ये पाच वेळा ‘सर्वोत्कृष्ट शास्त्रीय निबंध’ पुरस्कार मिळाले आहेत. १९८७ साली बेल्जियम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांना सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. २००७ मध्ये ‘वर्किंग वुमन इंटरनॅशनल’तर्फे वुमन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१८ मध्ये ‘ग्लोबल अवार्ड फॉर एक्सलेन्स इन क्वालिटी लिडरशिप इन मेन्टल हेल्थ केअर आणि ‘मैत्र मनाचे’ अशा अनेक नामांकित पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मानसिक विकासाच्या दृष्टीने सगळ्यांनीच आपला मेंदू सतत यामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होतेच आणि वयानुसार येणाऱ्या शारीरिक व्याधींकडे बघण्याचा दृष्टिकोनही आपला बदलतो एक नवी दृष्टी आपणास मिळते असा मोलाचा सल्ला शुभाताई सगळ्यांना देतात.

नामांकित वृत्तपत्रातील त्यांच्या लेखांचे पुस्तक लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. तसेच आयपीएचमधील त्यांची नवीन टीम ही समर्थपणे पुढील कार्याची धुरा सांभाळत असल्याचे शुभाताई आवर्जून सांगतात. शुभाताईंचे मिस्टर खूपच लवकर गेले; परंतु संकटे ही माणसाला नेहमी नवीन काहीतरी शिकवायलाच येत असतात अशा सकारात्मक विचारांच्या दृष्टिकोनामुळे त्यांची मुलं आणि त्यांच नातं अधिकच घट्ट झाल्याचे शुभाताई सांगतात.

रुग्ण, डॉक्टर हॉस्पिटल या सगळ्यात रमणाऱ्या शुभाताई स्वयंपाक घरातदेखील तितक्याच तन्मयतेने रमतात व त्यांना सगळ्यांना खाऊ घालायला देखील खूप आवडते.डॉ. शुभा थत्ते यांचे जीवन आणि कार्य हे केवळ वैद्यकीय किंवा शैक्षणिक योगदानापुरते मर्यादित नाही. त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि विज्ञानाधिष्ठित विचारसरणीचा संगम दिसतो. त्यांनी असंख्य माणसांच्या जखमांवर फुंकर घालण्याचे काम अत्यंत समर्पितपणे केले आहे. त्यांचे आयुष्य हे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील सर्व अभ्यासक, संशोधक व सेवाभावी व्यक्तींना प्रेरणादायी आहे. आज वयाच्या ८४ व्या वर्षी सुद्धा लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत मानसिक आरोग्यासाठी अविरत कार्य करणाऱ्या ह्या ज्येष्ठ आणि थोर व्यक्तिमत्त्वाला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा !

Comments
Add Comment