
कणकवली : मनसेतून बडतर्फ करण्यात आलेले वैभव खेडेकर चार सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका आणि २०२९ च्या विधानसभा निवडणुका या दृष्टीने भाजपने कोकणात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून चिपळूण येथील उद्योजक प्रशांत यादव यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. आता दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. याचाच भाग म्हणून वैभव खेडेकर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. मनसेत कोकण संघटक म्हणून काम करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या खडेकेर यांच्या मदतीने भाजप पक्षाची ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. महाराष्ट्र भाजप अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वैभव खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
मनसेने केले बडतर्फ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचा कोकणात विस्तार व्हावा यासाठी काम करणाऱ्या वैभव खेडेकर यांना पक्षाने २५ ऑगस्ट रोजी बडतर्फ केले. राज ठाकरेंच्या स्वाक्षरीचे पत्र मनसेच्यावतीने वैभव खेडेकर यांना पाठवण्यात आले. मनसेकडून वैभव खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे, सुबोध जाधव यांना बडतर्फ करण्यात आले. पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे, तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने तुम्हाला पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे, असे बडतर्फ केलेल्या सदस्यांना पत्राद्वारे कळवण्यात आले.
कोण आहेत वैभव खेडेकर ?
अनेक वर्ष वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांचे कोकणातील महत्त्वाचे शिलेदार होते. त्यांनी २०१४ मध्ये दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यापासून ते त्यांच्याबरोबर होते. मनसेला खेड नगर परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवून देण्यात वैभव खेडेकर यांची महत्त्वाची भूमिका होती. ते काही काळ खेडमध्ये नगराध्यक्ष होते. काही काळ वैभव खेडेकर आणि रामदास कदम यांच्यात वितुष्ट होते. पण आता ते निवळले आहे. कोकणातील तरुणांमध्ये वैभव खेडेकर लोकप्रिय आहेत. यामुळे वैभव खेडेकर यांच्या प्रवेशामुळे भाजपची कोकणातील ताकद वाढण्यास मदत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.