Monday, September 1, 2025

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात महापूर, २० लाख नागरिक झाले बेघर

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात महापूर, २० लाख नागरिक झाले बेघर

पंजाब : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात महापूर आला आहे. या पुरामुळे २० लाख नागरिक बेघर झाले आहेत. प्रशासन नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या कामात गुंतले आहे. सरकारने सुरक्षित ठिकाणी नागरिकांसाठी तात्पुरते कॅम्प सुरू केले आहेत. या ठिकाणी बेघर झालेल्यांची सोय करण्यात आली आहे.

आतापर्यंत अनेक पूर आले पण पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा पूर आहे. यामुळे संपूर्ण प्रांताची व्यवस्था पुरती कोलमडली आहे. पहिल्यांदाच सतलुज, चिनाब आणि रावी या तीन नद्यांना एकाचवेळी पूर आला आहे. यामुळे महापुराचे संकट निर्माण झाले आहे. नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करताना प्रशासनाची पुरती दमछाक झाल्याचे चित्र आहे.

भारताने मागच्याच आठवड्यात हवामान खात्याने पावसाबाबत दिलेल्या अंदाजांच्या आधारे पाकिस्तानला महापुराच्या संकटाची माहिती देऊन सावध केले होते. पण पाकिस्तानने पुरेशी खबरदारी घेतली नाही. यामुळे पुराने पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची एकूण लोकसंख्या १५ कोटी आहे. यापैकी २० लाख नागरिकांचे पुरामुळे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. पाकिस्तानचा पंजाब प्रांत हा कृषीप्रधान आहे. पाकिस्तानमध्ये गव्हाचे सर्वाधिक उत्पादन याच पंजाब प्रांतात होते. याआधी २०२२ मध्ये पुरामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गहू शेतीला मोठा फटका बसला होता. आता महापुरामुळे पुन्हा एकदा गव्हाच्या वार्षिक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यंदा १ जुलै ते २७ ऑगस्ट दरम्यान पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मागच्या वर्षींच्या तुलनेत २६.५ टक्के जास्त पाऊस पडला. मुल्तानमध्ये प्रशासनाने बांध फोडण्यासाठी पाच ठिकाणी स्फोटके बसवली आहेत. थोड्याच वेळात बांध फोडून पाणी शहरांपासून दूर दुसऱ्या दिशेने वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पुराचे संकट मोठे आहे. आता पाणी अडवणे अशक्य आहे पण पाणी दुसऱ्या दिशेला वळवून मोठ्या नागरी वस्तीला वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहे, अशी महिती प्रशासनाने दिली. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात महापुरामुळे आतापर्यंत ८४९ मृत्यू झाले असून ११३० जण जखमी झाले आहेत. सरकारी शिबिरांमध्ये लाखो नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. आणखी काही जणांचे स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment