
मान्सून म्हणजे केवळ पाऊस नसून, तो संपूर्ण वातावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा एक असा नैसर्गिक बदल आहे, जो वाऱ्यांच्या दिशेमध्ये होतो. मान्सूनच्या आगमनानंतर कधी जोरदार पाऊस पडतो, कधी हलका तर कधी-कधी दुष्काळसदृश्य परिस्थितीही निर्माण होते. मान्सूनचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडतो. तो आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. सध्या संपूर्ण उत्तर भारत मान्सूनच्या संकटाशी झुंज देत आहे. जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि पंजाब या उत्तरेतील राज्यात मान्सून पावसाचा कहर सुरू आहे. एनडीआरएफ आणि लष्कर तसेच इतर एजन्सीजनी आपले कार्य वाढवले आहे तरीही मान्सून आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानाची तीव्रता वाढतच आहे. जम्मू आणि काश्मिरातील मृतांची संख्या ४१ वर गेली आहे. पावसाचा मारा आणि मैदानी प्रदेशात नद्यांना पूर यामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर भारतातील टेकड्या आणि मैदानांवर पावसाचा तडाखा बसला असून त्यामुळे कित्येक प्रदेश पाण्याखाली गेले आहेत. वैष्णोदेवी मार्ग सध्या पावसाच्या तडाख्यात सापडला असून या यात्रेतील कित्येक यात्रेकरूंचे जीव गेले आहेत. २०१३ साली जशी पावसाने विनाशाची लाट आणली होती तितकीच भयंकर लाट यंदाही आली. संपूर्ण उत्तर भारताला पावसाच्या विनाशकारी लाटेचा सामना करावा लागत आहे. एकट्या जम्मू प्रदेशात २४ तासांत १९०.२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील गावांना पावसाचा रोष सहन करावा लागला आहे आणि काही गावे काही सेंकंदाच्या आत नष्ट झाली आहे. अर्थात या मागे कोणतीही परमेश्वरी शक्ती नाही तर मानवाचा प्रचंड अहंकारी आणि विध्वंसक लोभ हेच कारण आहे. कारण जम्मू असो वा काश्मीर किंवा आपल्याकडे मराठवाडा, येथे बिल्डरांनी पाणी अडवायला जागाच ठेवली नाही. त्यामुळे उत्तराखंड असो की मराठवाड्यातील नांदेड किंवा पंजाब असो, येथे विनाशाची लाट येत आहे.
मान्सूनचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी सरकला आहे आणि त्यामुळे येथे भूस्खलन, दरडी कोसळणे असे प्रकार वारंवार होत आहेत. पंजाब आणि हिमाचल येथील म्हणजे भारतीय उपखंडात पश्चिमी विक्षोभ हिमालय पर्वतामुळे अडवले जातात आणि त्यामुळे प्रचंड असा प्रलयकारी पाऊस पडतो. उत्तर भारतात अशीच विनाशाची लाट सध्या दिसत आहे. ती दरवर्षीच येते पण २०१३ मध्ये ती जशी विनाशकारी होती तशीच यंदा आहे. पश्चिमी विक्षोभामुळे या प्रदेशात भूस्खलन आणि ढगफुटीसारखे प्रकार घडतात आणि त्यातच दुर्घटना घडतात. काश्मिरातील रामबन येथे ११ जणांचा मृत्यू झाला, तर वैष्णोदेवी मार्गावर भूस्खलन झाल्याने ३४ यात्रेकरूंचा मृत्यू झाला, या सर्वांचा एकच अर्थ आहे. निसर्गावर मानवाने मात केली तर निसर्ग ते सहन करत नाही आणि कधी ना कधी त्याचा बदला घेतोच. कारण काश्मीर असो, की उत्तराखंड असो, की अगदी महाराष्ट्र असो या सर्वच ठिकाणी जागेची अपरंपार हाव आणि जमिनी हडपण्यामुळे बिल्डरांची लॉबी सक्रीय झाली. ती महाराष्ट्रापासून ते उत्तराखंडपर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र पसरली आहे. त्या लॉबीची कृत्ये लोकांना मृत्यूच्या दारात ढकलतात. काश्मीर जे एकेकाळी पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जात होते. त्याचे रूपांतर आता जलाशयात आणि बिलडरांच्या अनिर्बंध लालसेपोटी कुख्यात बांधकाम सागरात झाले आहे. पावसाचा कहर आणि निसर्गाचे थैमान यामुळे सर्वात जास्त हानी होते ती काश्मीरची. कारण पर्यटनावरच तर काश्मीर, गोवा, केरळ ही राज्ये जगतात. यावरच त्यांची अर्थव्यवस्था असते. उत्तराखंडमध्ये तर अनेक बांधकामे उभी राहिली आहेत, की जी निसर्गाला गिळंकृत करत आहेत. त्यामुळे उत्तराखंडचे काय झाले ते आपण पाहतोच आहोत. तसेच काश्मीर आणि आता तर कोकण जे निसर्गाचे वरदान लाभलेले आहे त्याची अवस्थाही तशीच आहे. हिमालयातील नद्या उन्हाळ्यात वितळतात आणि त्यामुळे पूर येतात. उत्तरेतील नद्या या सपाट प्रदेशात असल्यामुळे त्यांची ड्रेनेजची कमी क्षमता असते. हवामान बदलामुळे अतिवृष्टी वाढते. गंगेसारख्या मोठ्या नद्या हिमालयातून उगम पावतात आणि सपाट मैदानात त्यांचा उतार कमी असतो. यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. आपल्याकडेही मुंबईत २००५ साली असाच महापूर आला होता आणि त्याचे मुख्य कारण होते ते मिठी नदीच्या पाण्याचा निचराच झाला नाही. तसेच उत्तरेतील नद्यांचे आहे. पण ही झाली नैसर्गिक कारणे. मानवी कारणे जास्त जबाबदार आहेत आणि ती असतात अनियोजित शहरीकरण आणि सिमेंटची बांधकामे असल्यामुळे नैसर्गिक ड्रेनेजचा मार्ग बंद होतो. काश्मीर काय किंवा उत्तर भारत काय, याच कारणांमुळे सध्याचा पूर आणि भयावह परिस्थिती ओढवली आहे.
उत्तराखंड असो, की काश्मीर असो की महाराष्ट्र, बिल्डरांची लॉबी सर्वत्र फोफावली आहे आणि तिला काहीही तरणोपाय नाही. सरकारे त्यावर उपाय करू शकत नाहीत किंवा करू इच्छित नाही. कारण बिल्डरांचा मलिदा सरकारी यंत्रणेलाही मिळालेला असतो. त्यमुळे यावर कुणाकडेच काही उपाय नाही, आता पावसाचे रौद्र रूप पाहणे आणि विनाशाच्या लाटेत वाहून जाणे हेच सामान्य माणसांच्या भाळी लिहीले आहे की काय अशी भीती वाटते. पावसाचे रौद्र रूप काश्मीरपासून ते अगदी मराठवाड्यातील नांदेडपर्यंत पाहायला मिळाले. कधी ही सृष्टी आपला घास घेईल याचा काहीच भरोसा नाही. पण तिला तरी दोष का द्यायचा. आपणच मानव सृष्टीच्या विनाशास कारण आहोत. निसर्गाच्या विनाशास मानवाची अति लोभी वृत्ती कारण आहे आणि त्याचे प्रत्यंतर जम्मू-काश्मीरपासून ते उत्तराखंडपर्यंत सर्वत्र येत आहे, त्यावर उपाय आपल्याकडेच आहे. मानव आणि निसर्ग यांच्यात सुसंवाद साधणाऱ्या इतक्या सर्व संस्था कार्य करतात. पण त्यांच्यात सुसंवाद नाही, तो प्रस्थापित केला पाहिजे, तरच मानव आणि निसर्ग या दोघांनाही आपल्याला वाचवता येईल.