
कल्याण: महाराष्ट्रातील कल्याण पश्चिम येथील रॉयस बिल्डिंगमध्ये सहाव्या मजल्यावरून लिफ्ट पडल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. लिफ्टमध्ये अडकलेल्या आठ जणांपैकी चार जण गंभीर जखमी झाले तर दोघांचे पाय तुटले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इमारतीतील रहिवाशांनी महापालिकेवर दोषपूर्ण लिफ्ट चालवल्याचा आरोप केला आहे. तसेच सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.
कधी घडली ही घटना?
कल्याण पश्चिम येथील गांधारी परिसरातील रॉयस बिल्डिंगमध्ये शनिवारी रात्री हा दुर्दैवी अपघात घडला. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून अचानक लिफ्ट खाली कोसळत आली. या अपघातात लिफ्टमध्ये अडकलेल्या आठ जणांपैकी चार जण गंभीर जखमी झाले. याशिवाय, दोघांच्या पायांना फ्रॅक्चर झाले आहे. त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि काहींना मुंबईतील रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
गणेश दर्शनासाठी जाताना अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, रॉयस बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या अंकित मिस्त्री यांच्या घरी काही लोक गणेश दर्शनासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली. लिफ्ट अचानक पडल्याने गोंधळ उडाला. स्थानिक रहिवाशांनी तातडीने जखमींना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
रहिवाशांच्या मते, गेल्या अनेक दिवसांपासून लिफ्टची डागडूजी सुरू होती. तरी सुद्धा रहिवाशांकडून दोषपूर्ण लिफ्ट चालवली जात असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. रॉयस बिल्डिंगमध्ये एकूण आठ मजले आहेत आणि त्यात दोन लिफ्ट आहेत. मात्र तरीसुद्धा सुरक्षा मानकांचे उल्लंघन करून नागरिकांच्या जीवाशी खेळल्याबद्दल राहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या अपघातामुळे रॉयस बिल्डिंगच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. स्थानिक लोक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.