Monday, September 1, 2025

जगदीप धनखड यांनी राजीनाम्यानंतर ४० दिवसांनी सोडला सरकारी बंगला, आता कुठे राहणार ?

जगदीप धनखड यांनी राजीनाम्यानंतर ४० दिवसांनी सोडला सरकारी बंगला, आता कुठे राहणार ?

नवी दिल्ली : भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर ४० दिवसांनी दिल्लीतला सरकारी बंगला सोडला आहे. ते छतरपूरच्या गदाईपूरमध्ये एका खासगी घरात स्थलांतरित झाले आहेत. लवकरच ते सरकारकडून मिळणार असलेल्या टाइप आठ प्रकारच्या बंगल्यात स्थलांतरित होणार आहेत. तात्पुरती सोय म्हणून जगदीप धनखड खासगी घरात राहण्यास गेले आहेत.

जगदीप धनखड यांना ३४ एपीजे अब्दुल कलमा मार्गावरील टाइप आठ प्रकारचा एक बंगला देण्याचा निर्णय झाला आहे. बंगला निश्चित झाला आहे. पण या बंगल्याच्या डागडुजीसाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. याच कारणामुळे धनखड खासगी घरात राहण्यास गेले आहेत. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक सप्टेंबर महिन्यात होणार आहे. मतदान झाल्यानंतर संध्याकाळी मतमोजणी होईल आणि निकाल जाहीर केला जाईल. यामुळे नव्या उपराष्ट्रपतींचा अधिकृत बंगला देता यावा यासाठी जगदीप धनखड यांना बंगला सोडण्याची विनंती करण्यात आली. या विनंतीला मान देत धनखड यांनी काही दिवस खासगी बंगल्यात स्थलांतरित होण्याचा नर्णय घेतला. आता धनखड अभय चौटाला यांच्या फार्महाऊसवर काही दिवस राहणार आहेत.

धनखड हे राजस्थानच्या किशनगड विधानसभा मतदारसंघाचे १९९३ ते १९९८ या कालावधीत आमदार होते. या आमदारकीच्या कार्यकाळासाठी धनखड यांना निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन सुरू झाले होते. पण २०१९ मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल झाल्यावर नियमानुसार हे पेन्शन बंद झाले होते. नंतर उपराष्ट्रपती झाल्यामुळे पेन्शन पुन्हा सुरू झाले नव्हते. मात्र उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनखड यांनी राजस्थान विधानसभा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. पेन्शन पुन्हा सुरू करण्यासाठी अर्ज पाठवला आहे. नियमानुसार लवकरच राजस्थान विधानसभा प्रशासन धनखड यांचे पेन्शन सुरू करेल. उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यापासून पुढे धनखड यांना आमदारकीचे पेन्शन लागू होणार आहे. धनखड यांनी २१ जुलै २०२५ रोजी रात्री उपराष्ट्रपती या पदाचा राजीनामा दिला आहे.

राजस्थानच्या माजी आमदारांना दरमहा ३५ हजार रुपये पेन्शन मिळते. पण राजस्थानच्या ७० पेक्षा जास्त वयाच्या आमदारांना मूळ पेन्शन अधिक मूळच्या पेन्शनच्या वीस टक्के एवढी रक्कम पेन्शन स्वरुपात मिळते. धनखड हे ७४ वर्षांचे आहेत. यामुळे धनखड यांना आता दरमहा ४२ हजार रुपये पेन्शन मिळेल.

पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल म्हणून धनखड यांना एक मदतनीस नियुक्त करण्यासाठी दरमहा २५ हजार रुपये दिले जातील. माजी खासदार म्हणून धनखड यांना दरमहा ४५ हजार रुपये पेन्शन मिळेल. तसेच माजी उपराष्ट्रपती म्हणून धनखड यांना दरमहा दोन लाख रुपये पेन्शन, एक टाइप आठ बंगला तसेच एक खासगी सचिव, एक अतिरिक्त खासगी सचिव, एक खासगी मदतनीस, एक डॉक्टर, एक नर्सिंग अधिकारी, चार परिचारक एवढे नियुक्त करण्याचा अधिकार आहे. नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी नियमानुसार केंद्राच्या तिजोरीतून पगार दिला जाईल. यामुळे धनखड हे एकाचवेळी माजी उपराष्ट्रपती, पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल, माजी खासदार आणि राजस्थानचे माजी आमदार म्हणून पेन्शन आणि इतर अनेक लाभांसाठी पात्र आहेत.

Comments
Add Comment