
मुंबई : येरवडा येथील बालग्राम (एस.ओ.एस. चिल्ड्रन्स व्हिलेज) संस्थेला पुणे शहरात मिळालेल्या जमिनीच्या भाडेपट्ट्याला राज्य सरकारने मुदतवाढ दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष लक्ष घालून कराराचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
बालग्रामला ३७,८०० चौरस मीटर (३ हेक्टर ७८.३८ आर) जमीन ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यात आली होती. त्यापैकी २,६१० चौरस मीटर क्षेत्र पुणे महानगरपालिकेला २० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळे आता संस्थेकडे ३५,१९० चौरस मीटर जमीन शिल्लक आहे. आता नूतनीकरण मूळ जमीन प्रदान आदेशातील अटी व शर्ती कायम ठेवून करण्यात आले आहे. यासोबतच, १ ऑगस्ट २०१९ पासून आजपर्यंत प्रचलित वार्षिक दरानुसार, जमिनीच्या किमतीच्या २५ टक्केच्या ०.५ टक्के दराने वार्षिक भुईभाडे आकारले जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या रिट याचिका क्रमांक २३७९/२०२३ मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अहवालानंतर महसूल व वन विभागाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे बालग्राम संस्थेला त्यांच्या कार्यासाठी आवश्यक जमीन दीर्घकाळासाठी उपलब्ध होणार आहे.