
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कडक आमरण उपोषणाला बसणार आहेत. गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली जरी असली तरी, आजपासून ते पाणीदेखील पिणार नसल्याची घोषणा त्यांनी कालच्या आंदोलनात केली. त्यांच्या या पवित्र्यानंतर राज्य सरकार मराठा आरक्षणाचा विषय अधिक काळ ताणू इच्छित नाही, आणि त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काल रात्री उशिरा वर्षावर महत्वाची बैठक केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली? आणि काय निर्णय झाला, याचा खुलासा आज होण्याची शक्यता आहे.
काल रात्री उशिरा झालेली ही बैठक मराठा आरक्षणाच्या मुद्यावर झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या चर्चेतून काही ठोस तोडगा निघतो का ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मध्यरात्री तातडीची बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. मात्र, त्यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीसाठी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करत थेट मुंबई गाठली. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळगावी आले होते. मात्र, ते देखील काल रात्री वर्षा बंगल्यावर उपस्थित राहिले.