मंत्री छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ओबीसी समाजातील प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळण्याच्या मुद्द्यावर छगन भुजबळ यांचा विरोध कायम राहिला आहे, आणि याच पार्श्वभूमीवर इतर ओबीसी प्रतिनिधींसोबत आज भुजबळ महत्वाची चर्चा करणार आहेत.
कुणबी आणि मराठा समाज एकसारखे नाहीत
ओबीसीमधून मराठा आरक्षण मुद्द्यावर भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हंटले की, कालेकर आयोग आणि नंतर मंडल आयोगाने मराठा समाजाचा मागासवर्गीय म्हणून समावेश केलेला नाही. मुख्यमंत्री आयोगाच्या शिफारशी लागू करू शकतात, परंतु त्यांच्या मर्जीने कोणत्याही जातीचा समावेश अरक्षणात करू शकत नाहीत.' त्यांनी असेही स्पष्ट केले की उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने आधीच सांगितले आहे की कुणबी आणि मराठा समाज एकसारखे नाहीत.
दुसरीकडे, मनोज जरांगे गेल्या शुक्रवारपासून मुंबईतील आझाद मैदानावर अनिश्चित काळासाठी उपोषण करत आहेत. ते इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गांतर्गत मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. जरांगे यांचा असा युक्तिवाद आहे की मराठा समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे आणि या आधारावर त्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळावे.
त्यांच्या मागणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे आणि विविध पक्षांमध्ये या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मनोज जरांगे म्हणतात की मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असलेली कुणबी, शेतकरी जात म्हणून मान्यता देण्यात यावी, जेणेकरून त्यांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षणाचा लाभ मिळू शकेल. त्यामुळे आज होणाऱ्या या बैठकीत ओबीसी समाजाच्या चिंता आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भविष्यातील रणनीती ठरवली जाण्याची अपेक्षा आहे.
जालन्यातील अंतरवाली सराटीत आजपासून ओबीसी समाजाचं उपोषण
जालन्यातील अंतरवाली सराटीत आजपासून ओबीसी समाजाचं उपोषण सुरू होणार आहे तर नागपूरच्या संविधान चौकातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात हे उपोषण करण्यात येत आहे.