
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत भारतीयांना एकत्र येण्यास आणि सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी होती. लोकमान्य टिळकांनी हे लक्षात घेतले की गणपती उत्सव हा धार्मिक श्रद्धेशी जोडलेला असून त्याद्वारे समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणता येईल. त्यामुळे त्यांनी गणेशोत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले, जेणेकरून राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत होईल. टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून व्याख्याने, देशभक्तीपर भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून जनतेत स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली. आजच्या घडीला गणेशोत्सव हा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि परदेशातही मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे आणि टिळकांचे हे योगदान अजूनही लोकांच्या मनात अमूल्य आहे.
जो गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला तो तसाच आज साजरा होतो का? आज साजरा होणाऱ्या या उत्सावावर टीका होत आहे. टिळकांचा उद्देश आज जरी आवश्यक नसला तरी हा गणेशोत्सव आजही जनसमुदायाला एकत्रित करत आहे हे देखील विसरता कामा नये. मुंबईतील गणेशोत्सवावर बरीच चौफेर टीका होताना आपण पाहतो, त्या उत्सवाला आलेले स्वरूप त्यातील मागे पडत चाललेला उद्देश, त्यात बेधुंद झालेली तरुणाई या उत्सवात इतरांचा विचार न करता नियम पायदळी तुडवणे हे प्रकार सर्वत्र सर्रास सुरू असण्याची टीका होत आहे. दुसरीकडे गणेशोत्सवामुळे पर्यावरणाचे नुकसान होते म्हणून पर्यावरणवादी नियमितपणे गणेशोत्सवात कार्यरत होतात व विघ्ने आणण्याचा प्रयत्न करतात. त्यात न्यायालयाने दिलेले निरनिराळे आदेश त्यात सापडलेला मूर्तिकार, हल्ली लागू केलेले सरकारी कडक नियम यातून गणेशोत्सव नित्यनेमाने साजरा करणाऱ्यास खूप अडथळे निर्माण होत आहेत. कितीही महागाई असू दे मात्र गणपती उत्सवात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यात कोणी एकेकाळी मराठी महाराष्ट्राशी विशेषतः कोकणाची निगडित असलेला सण आता इतर प्रांतात नव्हे तर देशातच नव्हे तर प्रदेशातही दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे हे ही विशेष. आज इतकी वर्ष गणेशोत्सव साजरा होत आहे त्यात पीओपी व शाडूच्या मूर्ती बनवल्या जातात. त्यांचे विसर्जनही नैसर्गिक पाण्यात होत आहे. मात्र तेव्हा कधी प्रदूषण झालेले आठवत नाही मात्र आत्ताच प्रदूषण होत आहे अशी बोंबाबोंब का होत आहे. मूर्ती मातीचीच असावी लागते. मात्र हल्ली कशाच्याही मूर्ती बनवून त्याला विकृत रूप दिले जाते. कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती पर्यावरणपूरक असतात. मात्र हा दावा चुकीचा असून उलट कागदाचा लगदा पाण्यातील प्राणवायू (ऑक्सिजन) शोषून घेतो आणि सजीवांसाठी हानीकारक असलेला मिथेन हा वायू उत्सर्जित करतो. कागदातील ‘लिग्निन’ घटक जैविक ऑक्सिजनची मागणी वाढवतात, जे जलचरांसाठी हानीकारक आहे. कागदाचा लगदा लहान तुकड्यांमध्ये विघटित होतो, जे जलचरांसाठी हानीकारक आहे. काही स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणवादी असा दावा करतात की, ‘गणेशमूर्तींचे नद्यांमध्ये विसर्जन केल्याने जलप्रदूषण होते.’ ते मूर्ती विसर्जनासाठी कुत्रिम हौदांमध्ये मूर्ती विसर्जित करणे, स्वयंसेवी अथवा सरकारला मूर्ती दान करणे किंवा अमोनिया बाय कार्बोनेटेडमध्ये मूर्ती विरघळवणे असे उपाय सांगतात. मात्र दान केलेल्या मूर्तींचे दगडाच्या खाणीत टाकून तसेच नद्यांमध्ये फेकून विटंबना केली जाते. गणेशमूर्ती विसर्जन केल्याचे आध्यात्मिक लाभ आहे. मूर्ती रसायनात विसर्जित केल्यास हे लाभ होऊ शकत नाही, देवतेची मूर्ती दान देणे किंवा स्वीकारणे’ हा देवतांचा घोर अपमान आहे; कारण मानवात देवतेच्या मूर्तींचे दान देण्याची किंवा स्वीकारण्याची क्षमता नाही. अध्यात्मशास्त्रानुसार गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यातच विसर्जन करणे शास्त्रानुसार योग्य आहे. हे ढोंगी पर्यावरणवादी वर्षभर गाढ झोपेत आढळतात आणि केवळ हिंदू सणांच्या वेळीच जागृत होतात. दुसरा वाद होतो, की पीओपी की शाडूची मूर्ती. जरी शाडूच्या मुर्ती, प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींपेक्षा वजनाला जड आणि महाग असल्या तरी दरवर्षी अनंतचतुर्दशीनंतर दुसऱ्या दिवशी येणारे फोटो पाहून मन हेलावून टाकते. काही स्वयंसेवक आणि संस्था सोडल्या तर बाकी जनतेत याबाबत निरुत्साहच दिसून येतो. दिवसेंदिवस सार्वजनीक गणपतीच स्वरुप बाजारु होत चाललय. गणपतीच्या उंचीवरून विभागातल्या गणेशमंडळात चढाओढ असते. मात्र शाडूच्या मूर्तीमुळे गणेश मूर्तींच्या आकारावर बंधन येणार आहेत. म्हणून आजही पीओपीला जास्त प्राधान्य दिले जात आहे. एकट्या मुंबईमध्ये दोन लाख २५ हजार इतके घरगुती गणपती आहेत. त्यांपैकी २०-२२ टक्के घरांनी शाडू मातीच्या किंवा पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा पर्याय स्वीकारला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या १२ हजारांच्या घरात आहे. त्यापैकी १० ते १२ टक्के मंडळांनी पर्यावरणपूरक उत्सवाचा मार्ग पत्करला आहे. मुंबईमध्ये सध्या तीन हजार मूर्तिकार गणेशमूर्तींचे काम करतात. त्यांच्याकडील कारागिरांची संख्या २० हजारांच्या घरात आहे. या निमित्ताने निर्माण होणाऱ्या इतर व्यवसायांवर लाखो कुटुंबांची उपजीविका अवलंबून आहे. एकट्या पेण, हमारापूर पट्ट्यात ५० हजारांहून अधिक कुटुंबे गणेशमूर्ती घडविण्याच्या व्यवसायात आहे. सध्या तरी ९० टक्के व्यवसाय ‘पीओपी’शी संबंधित आहे. पीओपी’ला उत्तम पर्याय द्या आणि मग त्यावर बंदी घाला, अशी मंडळांची मागणी आहे.
दुसरीकडे, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखणेही आवश्यक आहे, अशा कात्रीत सध्या सरकार सापडले आहे. त्यातच राज्य सरकार, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकांकडून वेगवेगळ्या नियमावली येत असल्याने, गोंधळात अधीकच भर पडत आहे. हे जरी किती खरं असले तरी आपले सगळे आपणच साजरे केले पाहिजे. आज या सणांनी आपली मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. कित्येक लोकांना रोजगार मिळतो. कोकणवासीयांची गावाला जाणारी लगबग त्याच निमित्ताने सर्वांनी एकत्र मिळून गावाला आपल्या घरी घालवले गेलेले एकत्र क्षण गणपतीसोबतच हरतालिका गौरी यांचे आगमन त्यातून निर्माण होणारे एक चैतन्याचे वातावरण मनाला मोहरून टाकते. त्यात पावसानेही धरती ओलीचिंब न्हाऊन निघाली असल्याने त्यात आणखी मनमोहकतेची भर पडते. आपल्या विभागातील सार्वजनिक गणेशोत्सवात होणारे कार्यक्रम सर्वांनी एकत्र येणे त्या निमित्ताने होते. हल्लीचे जग खूप फास्ट आहे.
आधुनिकतेकडे आपण किती जायचे म्हटले तरी शेवटी माणसाला एक अध्यात्मची जोड हवीच असते. या यांत्रिक युगात त्यालाही कुठेतरी थांबावसे वाटते. हे आपलेच सण ते त्यांना असे क्षण देऊ इच्छितात. टिळकांचा उद्देश त्याकाळी काहीही असो मात्र काही अपवाद वगळता आज याच उत्सवाला एक ग्लोबल स्वरूप प्राप्त झाले आहे. म्हणूनच हा महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणून घोषित करण्यात आला आहे. आज आपल्या देशात नव्हे जगभरातही मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात, की साता-समुद्रापारच्या त्या देशांनाही या उत्सवांची नोंद घ्यावी लागत आहे. कोणत्याही चांगल्या गोष्टींना विरोध होतोच मात्र त्यातूनही मार्ग काढून आपण आपली मार्ग क्रमिकापुढे सुरू ठेवायची असते, हेच गणराया आपल्याला शिकवतो म्हणून किती अडथळे आले तरी आपण मात्र आपले हे सण साजरे करणारच. यासाठी निसर्गाची कुठेही हानी होणार नाही, ज्यामुळे आपल्या येणाऱ्या पिढ्यांना त्याचा त्रास भोगावा लागेल. गणराया हे बुद्धीचे दैवत आहे हेच भान ठेवून आपणही आपली बुद्धी शाबूत ठेवून एक धार्मिकतेचा आधार ठेवून आपण आपले सण साजरे करूया! हाच निर्धार आपण कायम ठेवून बोलूया गणपती बाप्पा मोरया!!
- अल्पेश म्हात्रे