Monday, September 1, 2025

Ganeshotsav 2025 : लहानशा खोलीतलं मोठं मन! चाळीतल्या १०x१० खोलीतून २ बीएचके घरापर्यंतचा प्रवास!

Ganeshotsav 2025 : लहानशा खोलीतलं मोठं मन! चाळीतल्या १०x१० खोलीतून २ बीएचके घरापर्यंतचा प्रवास!

जुन्या आठवणींना उजाळा देणारी अनोखी गणेश सजावट

नायगाव बी.डी.डी. चाळ नंबर १७/१८, लहान चाळीच्या खोलीतून आजच्या मोठ्या घरापर्यंतचा प्रवास... अशी सुंदर संकल्पना असणारा देखावा नायगाव दादर बी.डी.डी.मध्ये गणेशोत्सवात साकारण्यात आला आहे.

नायगाव-दादर बी.डी.डी. चाळीतल्या १०x१० च्या छोट्याशा खोलीत आमचं बालपण फुललं. त्या एका खोलीतच आमचं हसणं, खेळणं, अभ्यास, भांडणं आणि प्रत्येक सणाचा उत्सव रंगायचा. गणपती असो, नवरात्र असो वा दिवाळी—सगळं चाळीतल्या शेजाऱ्यांसोबत मनमोकळेपणानं साजरं व्हायचं. जागा कमी होती, पण मनं मात्र प्रचंड मोठी होती.

आज आम्हाला नवीन २ बीएचके घर मिळालं आहे. अभिमान, आनंद आणि समाधान आहे; पण तरीही त्या चाळीतील दिवस विसरणं कठीण आहे. बालपणीची धावपळ, एकमेकांना दिलेला आधार, आणि शेजाऱ्यांशी असलेलं ममत्व अजूनही मनात जिवंत आहे.

यंदाच्या गणेश सजावटीतून आम्ही आमचा हा प्रवास मांडला आहे—लहान चाळीच्या खोलीतून मोठ्या घरापर्यंतचा. जुन्या आठवणींना उजाळा देत, नवीन आयुष्याचं स्वप्न बाप्पाच्या चरणी अर्पण केलं आहे. प्रत्येक टप्प्यावर बाप्पाची साथ लाभली म्हणूनच हा बदल शक्य झाला.

आज नवीन घरात आहोत, पण जुन्या दिवसांच्या गोड आठवणी अजूनही हृदयाला हळवं करतात. त्यामुळे ही सजावट आमच्यासाठी फक्त सजावट नाही, तर आमच्या आयुष्याची खरी कहाणी आहे.

Comments
Add Comment