
कथा : प्रा. देवबा पाटील
दुपारच्या सुट्टीत सुभाष आल्यानंतर आदित्य मित्रमंडळाच्या व सुभाषच्या डबा खाता खाता गप्पाटप्पा सुरू झाल्या. “सुभाष, सूर्य कोठेच जाऊ शकत नाही? या प्रश्नाचे तू त्यादिवशी दिलेल्या उत्तरावर विचार करता करता मला त्या प्रश्नाचे दुसरेही उत्तर सापडले.” आदित्यने सांगितले. “दुसरे असे कोणते ठिकाण आहे ते सांग बरे मग?” चिंटूने त्याला विचारले. “दुसरे ठिकाण म्हणजे थंडगार ठिकाणी अर्थात कुठल्याही गार प्रदेशात सूर्य मुळीच जाऊ शकत नाही.” आदित्यने उत्तर दिले. “तेथे का नाही जाऊ शकत?” पिंटूने विचारणा केली. “त्याचे कारण असे आहे की सूर्य हा स्वत:च प्रखर उष्णतेचा अतिशय तेजस्वी आणि अत्यंत उष्ण असा प्रचंड गोळा आहे. त्याचे उष्णतामान महाभयंकर आहे हे तुम्हा आम्हा सर्वांना माहीतच आहे. तो जिथे कुठे थंडगार प्रदेशात जाईल तेथे तो जाण्याच्या अगोदरच त्याचे तप्त किरण पोहोचतील. तो ज्या थंडगार भागात जाण्यासाठी निघेल त्या प्रदेशाचे व त्याचे अंतर हे कमी कमी होत जाईल. ते अंतर जसजसे कमी कमी होत जाईल तसतसे त्याच्या प्रखर उष्ण किरणांच्या उष्णतेने तो भागही गरम व्हायला सुरुवात होईल व तेथील थंडी दूर पळून जाईल नि तो प्रदेशही तसाच उष्ण होईल.” आदित्य खुलासा करत होता.
“त्याचे असे आहे की, सूर्य हा आपल्या पृथ्वीपासून खूप दूर आहे. तसेच थंडी म्हणजे उष्णतेचा अभाव. थंडीचे कोठल्याही भागावरील प्रमाण हे त्या भागावर सूर्याचे किरण कसे पडतात यावर अवलंबून असते. त्या सूर्यकिरणांचे पृथ्वीवर पडणे हे सुद्धा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गती व स्थितीवर अवलंबून असते. आपली पृथ्वी ही स्वत:भोवती सतत फिरत असताना सदैव सूर्याभोवतीही फिरत असते; परंतु सूर्याभोवती फिरण्याचा तिचा मार्ग हा वर्तुळाप्रमाणे गोलाकार नसून अंड्यासारखा लंबवर्तुळाकार आहे आणि विशेष म्हणजे ती थोडीशी कलती होऊनच फिरत असते. त्यामुळे तिच्या काही भागावर सूर्यकिरण सरळ पडतात, तर काही भागावर ते तिरपे पडतात. ज्या भागावर ते सरळ सरळ पडतात त्यांचा मार्ग आखूड असल्याने त्या प्रदेशावर सूर्याची उष्णता जास्त पडते व थंडी कमी पडते. म्हणून उन्हाळ्यात मुळीच थंडी वाजत नाही; परंतु ज्या भागावर सूर्याचे किरण हे तिरपे पडतात त्यांची लांबी अर्थात अंतर जास्त झाल्यामुळे त्यांची उष्णता तेथे कमी पडते व थंडी जास्त पडते. म्हणून हिवाळ्यात थंडी जास्त वाजते.” आदित्य सविस्तर सांगत होता.
तो पुढे सांगू लागला, “मित्रांनो, आपल्या पृथ्वीवर समशीतोष्ण वातावरण आहे म्हणून सजीव जगू तरी शकतात. एखाद्या भागात बर्फही असले आणि तेथे जर सूर्याची प्रखर उष्णता खूप जास्त पडली तर सूर्याच्या प्रखर उष्णतेने ते बर्फही वितळून जाईल व त्याचे पाणी होईल नि त्या पाण्याचीही वाफ होईल. वाफसुद्धा अतिशय उष्ण असते. त्यामुळे त्या वाफेने तो प्रदेश जास्तच उष्णच होईल. वरून सूर्याची उष्णता व खाली वाफेची उष्णता म्हणजे तेथे थंडी वा गारवा मुळीच राहणार नाही. एखाद्या उंच डोंगरावर ढगातून जाताना आपणास ऊबदार वाटते कारण ढगातील वाफ ही गरम असते. या कारणांनी सूर्याला थंडगार भागातही मुळीच जाता येणार नाही.” आदित्यने स्पष्टीकरण दिले. “आता मला तुमचे सांगणे पटले दादा.” सुभाषने त्याच्या स्पष्टीकरणाला दुजोरा दिला. “तुला तर आधी हे माहीत नव्हते. मग आताच ही माहिती तुला कोठून मिळाली?” पिंटूने प्रश्न केला. “परवा मलासुद्धा विज्ञानाचे “सृष्टी चमत्कात्छ हे पुस्तक आमच्या मोहल्यातील एका मित्राकडे दिसले. मी ते त्याच्याजवळून आणून वाचून काढले. त्यातून मला ही सर्व माहिती मिळाली. ते पुस्तकसुद्धा आपल्यासारख्या अभ्यासू व जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी खूपच कामाचे आहे.” आदित्यने सांंगितले. “छान झाले दादा. म्हणजे तुम्हालासुद्धा विज्ञानाच्या पुस्तकांचे महत्त्व पटलेले दिसते... ” त्यांचे बोलणे सुरू असतानाच त्यांची मधली सुट्टी संपल्याची घंटी वाजली व ते वर्गात जायला निघाले.