Sunday, August 31, 2025

मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा सुचवणाऱ्यांना शरद पवारांना काय म्हणाले अजित पवार ?

मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा सुचवणाऱ्यांना शरद पवारांना काय म्हणाले अजित पवार ?

मुंबई : मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्याची आग्रही मागणी करत असलेल्या मनोज जरांगे यांनी मुंबईत येऊन आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जरांगेंसोबत त्यांचे शेकडो समर्थक मुंबईत आले आहेत. मुंबई पोलिसांनी जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना आझाद मैदानावर रविवार संध्याकाळपर्यंतच आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्य शासनाला दिलेल्या सल्ल्याची सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. तामिळनाडूत आरक्षण वाढू शकतं तर महाराष्ट्रात का नाही ? असे शरद पवार एका सार्वजनिक कार्यक्रमात म्हणाले. घटनेत दुरुस्ती केल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, असेही शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या वक्तव्यावर आता अजित पवारांचीही प्रतिक्रिया आली आहे.

जे नेते वेगवेगळे सल्ले देत आहेत ते यापूर्वी अनेक वर्षे सत्तेत राहिले आहेत. त्यामुळे मला त्यावर बोलायला लावू नका, त्याच्या खोलात जायला लावू नका. तुम्हाला माहिती आहे का, ५० टक्क्यांच्या संदर्भात देण्यात आलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या आधीच दिलं आहे, असे अजित पवार म्हणाले. राज्य कायद्याने, नियमाने आणि लोकशाही पद्धतीने चालवायचे असते. जनतेच्या भल्यासाठी काम करायचे असते. आरक्षणासंदर्भात काही नेतेमंडळी ज्या काही सूचना करतात. ही सर्व मंडळी बराच काळ सरकारमध्ये होती. ते लोक १०-१० दहा वर्षे सरकारमध्ये होते. त्यामुळे मला उगीच त्याच्या खोलात जायला लावू नका. सगळेजण वंदनीय, पूजनीय, आदरणीय आहेत. त्यामुळे मला त्याच्या खोलात जायचं नाही; असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केले.

शरद पवार नेमके काय म्हणाले होते ?

आरक्षणाचा तिढा संसदेतच सुटू शकतो. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यायला हवा. राष्ट्रीय पातळीवर निर्णय व्हायला हवा, असे शरद पवार म्हणाले होते.

Comments
Add Comment