Monday, September 1, 2025

‘विकत घेतला शाम...’

‘विकत घेतला शाम...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

सुमारे ६५ वर्षांपूर्वी आलेला एक सिनेमा आजही अनेकांच्या लक्षात आहे. राजाभाऊ परांजपे यांच्या ‘श्रीपाद चित्र’ने निर्माण केलेल्या आणि त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या त्या चित्रपटाचे नाव होते ‘जगाच्या पाठीवर.’ पटकथा, संवाद आणि गीते होती ग. दि. मांची अर्थात गीतरामायण लिहिणाऱ्या मराठीतल्या वाल्मिकी मुनींची!

सिनेमा लोकांच्या लक्षात आहे तो त्यातल्या गाण्यांमुळे आणि सुधीर फडके यांच्या कर्णमधुर संगीतामुळे. सिनेमातली बाबुजींबरोबर आशाताईंनी गायलेली सर्व गाणी लोकप्रिय झाली. त्याचे आणखी एक कारण होते - रेडिओ! त्याकाळी लोक सिनेमा सहसा एकदाच पाहू शकत. गाणी मात्र रेडिओमुळे नियमित कानावर पडायची. ती पाठच होऊन जात.

आकाशवाणी हेच सामान्य माणसाचे हक्काचे आणि विनामूल्य मनोरंजनाचे साधन होते. आकाशावाणीची मुंबई, ‘अ’, ‘ब’ केंद्रे, पुणे आणि सांगली केंद्र, अतिशय उत्तम कार्यक्रम सादर करत. सकाळी ११ वाजता लागणारी ‘कामगार सभा’ आणि आठवड्यातून एकदा लागणारी ‘आपली आवड’ हे कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय होते.

‘जगाच्या पाठीवर’मध्ये राजाभाऊंनी स्वत: काम केले होते. त्यांच्याबरोबर सीमा, राजा गोसावी, ग. दि. माडगूळकर, रमेश देव, धुमाळ, शरद तळवलकर, माई भिडे, विनय काळे, राजदत्त, राजा पटवर्धन, कुसुम देशपांडे, रेखा जोशी, अण्णा जोशी आणि रेखाताई कामत असे सहकलाकार होते.

सिनेमातील सर्वच गाणी लोकांच्या ओठावर उतरली होती. आशाताईंच्या आवाजातील बैठकीतली लावणी, “काहो धरिला मजवरी राग”, किंवा सीमा आणि राजाभाऊ रस्त्यावर गात फिरतात ते गाणे “थकले रे नंदलाला”, आणि ज्या शब्दांच्या नावाची टीव्ही मालिकासुद्धा परवा निघाली होती ते “तुला पाहते रे, तुला पाहते.” हे गोड प्रेमगीत त्याकाळी अतिशय लोकप्रिय झाले होते.

त्याशिवाय बाबूजींच्या आवाजातील, “जग हे बंदिशाळा”, “एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे”, “अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार” ही गाणी तर आजही मराठीच्या सदाबहार गाण्यात समाविष्ट आहेत.

सिनेमाची कथा गुंतागुंतीची होती. अनाथ सखाराम (राजा परांजपे) नोकरी शोधत फिरत असतो. एका ठिकाणी एका मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून एक आंदोलन सुरू असते त्यात चुकून तो सामील होतो आणि जाळपोळ सुरू झाल्यावर पोलिसांकडून पकडला जातो. खटला चालतो तेव्हाचे न्यायाधीशाशी झालेले त्यांचे संवादही जबरदस्त होते. न्यायाधीश म्हणतात, ‘तुमच्यावर मंदिर जाळण्यासाठी समुदायाला चिथवल्याचा आरोप आहे. पलिते घेतलेल्या त्या जमावाने मंदिरात जावे असे तुमचे मत होते का?’ त्यावर राजाभाऊंचे उत्तर गदिमांमधला तत्त्वज्ञ दाखवणारे होते. राजाभाऊ म्हणतात, “माझं काय, तुमचेसुद्धा मत असेच असायला पाहिजे. कारण देव सगळ्यांचा नाही का?” न्यायाधीश म्हणतात, “अहो पण ते मंदिर खासगी मालकीचं होतं.” त्यावर राजाभाऊ उत्तरतात, “आभाळ, समुद्र, ऊन, पाऊस हे कुणाच्या खासगी मालकीचं असतं का न्यायाधीशसाहेब? तसंच देवाच आहे.” त्याच्या बोलण्यामुळे गुन्हा शाबीत झाला असे म्हणून न्यायाधीश त्याला ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावतात.

सखाराम हा मुळात अतिशय निरागस आणि प्रामाणिक माणूस असल्याने जेलरलाही त्याच्या निर्दोषपणाची खात्री असते. ते त्याला अतिशय आदराने वागवतात. जेलमधून सुटल्यावर योगायोगाने त्याची एका अंध भिक्षेकरी मुलीशी (सीमा देव) भेट होते. ते दोघे रस्त्यात गाणी म्हणून, नाच करून पैसे मिळवत असतात. त्यावेळचे एक गाणे अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण होते. त्या भजनवजा गाण्याचे शब्द होते- “नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम. विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम!”

भोळ्या भावाने केलेल्या भक्तीमुळेच देव पावतो अशी भक्तिमार्गीयांची दृढ श्रद्धा आहे. कवी म्हणतो, ‘मी देवाला प्रेमाने विकतच घेऊन टाकले पण मी एक पैसाही खर्च केला नाही.’ धर्ममार्तंडांनी तुकाराम महाराजांपासून सर्वांना कसे छळले ते माहीत असल्याने कवी लगेच खुलासाही करतो, ‘मी देवाला प्रेमाने वश केले पण लोक म्हणतील, याने काहीतरी गैरमार्गानेच देवाची कृपा मिळवली. जणू देवाची चोरीच केली. पण मी देवाला कसे प्रसन्न केले ते कोणालाच माहीत नाही. मी तर पूर्ण आयुष्यात जितके श्वास घेण्याचा अधिकार देवाने दिला आहे तितक्या वेळा त्या प्रभूच्या नामाचा जप करून त्याचे प्रेम मिळवले आहे. इथे गदिमांनी जवळजवळ संत कबीरदासांच्या ‘हम तो हरी नामके व्यापारी’ या भजनातलाच आशय मांडला होता -

‘कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी, जन्मभरीच्या श्वासांइतुके मोजियले हरिनाम!’

मग गदिमा परमेश्वराच्या विविध रूपांचे लोभस वर्णन करतात. त्यांना गोकुळातला कान्हा आठवतो, ते म्हणतात, ‘हा तर एका ‘गुराख्याचा पोर.’ तुकाराम महाराजांचा ‘विठू’ तो हाच. समर्थ रामदास ज्याला रघुकुलतिलकं म्हणतात तोच हा राम! यानेच तर नाथांच्या घरी श्रीखंड्या बनून पाण्याच्या कावडी टाकल्या, जनाबाईंच्या जात्यावर बसून दळणे दळून दिली तो त्यांचा नोकर हाच की! संताच्या घरी राबणारा गुलाम. त्यालाच मी अखंड नामजप करून आपलासा करून घेतले आहे. त्याची नावे भलेही वेगवेगळी आहेत. जनाबाई त्याला ‘विठ्या’ म्हणत तर तुकाराम महाराज ‘पांडुरंग’ आणि संत रामदास ‘राम’ म्हणत, तो शेवटी हाच एक आहे. त्याच्या या सगळ्या मालकांनी फक्त त्याला वेगवेगळी नावे दिली आहेत इतकेच.

‘बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संतांघरचा, हाच तुक्याचा विठ्ठल, आणि दासाचा श्रीराम!’ गदिमा पुढे सांगतात-हा संताचा घरगडी राहतो कुठे? तर भक्तांच्या हृदयात! त्यामुळे जितक्या हृदयात हा वास करतो ती सर्व याची गावे आहेत. याचा पत्ता म्हणजे भक्ताचे निर्मल मन; परंतु तरीही याला कुणी ओळखले नाही. हा दिनांचा नाथ स्वत: मात्र अनाथ आहे, अनामिक आहे आणि त्यालाच मी प्रेमाने, भक्तीची किंमत देऊन विकत घेतले आहे.

‘इतुके मालक, तितुकी नावे, हृदये तितुकी, याची गावे. कुणी न ओळखी तरीही याला, दीन अनाथ अनाम! बाई मी विकत घेतला श्याम!’

असे जन्मभराच्या श्वासाइतके रोख दाम मोजून प्रत्यक्ष ‘देवालाच विकत’ घेण्याची कल्पना मांडणारा गदिमांसारखा शब्दप्रभू पुन्हा थोडाच मराठीला पाहायला मिळणार आहे? म्हणून तर हा ‘नॉस्टॅल्जिया.’

Comments
Add Comment