नाशिक: नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरामध्ये असलेल्या नंदिनी नदीच्या परिसरात वापरलेल्या जिलेटिनच्या कांड्या फेकून देण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे याचा वापर कोणी केला आहे? आणि अशाप्रकारे स्फोटके सापडल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी संबंधीत ठिकाणी येऊन सर्व तपास केल्यानंतर, कोणताही संभाव्य धोका नसल्याचे सांगितले आहे.
सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि दुसरीकडे शुक्रवारी ईद-ए-मिलाद चा सण देखील साजरा होणार आहे. या पार्श्वभूमी वरती आधीच पोलिस बंदोबस्त तैनात असताना अचानक पणे नाशिक शहरात स्फोटके सापडल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती देखील निर्माण झाली होती. मात्र पोलिस तपासणीनंतर असे निदर्शनास आले आहे की, या सर्व कांड्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जी साफसफाई मोहीम चालू होती त्यादरम्यान सदर ठिकाणी टाकण्यात आल्या होत्या. ज्याबद्दल माहिती मिळताच तातडीने पोलिसांना कळवण्यात आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरा मुंबई नाका परीसरात असलेल्या दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या मागील बाजूस असणाऱ्या नंदिनी नदीच्या किनारी या जिलेटीनच्या कांड्या संशयास्पदरित्या आढळून आल्या आहेत. या कांड्या वापरलेल्या असल्याने कोणताही धोका नाही.
दरम्यान, या कांड्या कुणी टाकल्या याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तर घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक दाखल झाले असून, संशयास्पद वस्तुंची तपासणी सुरू आहे. तसेच या कांड्यापासून कोणताही धोका नसल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.