Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा लालबाग राजाच्या दर्शनाला : देशाच्या प्रगतीसाठी केली प्रार्थना

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा लालबाग राजाच्या दर्शनाला : देशाच्या प्रगतीसाठी केली प्रार्थना

मुंबई : केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी रविवारी मुंबईतल्या गणेश मंडळांना भेट दिली . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत लालबाग येथील गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती व्हावी यासाठी त्यांनी प्रार्थना केली.

दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना नड्डा म्हणाले, “गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत येणे आणि शहरात प्रसारित होणारे ‘मन की बात’ ऐकणे ही माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. गणपती बाप्पा हे बुद्धी आणि ज्ञानाचे दैवत आहेत, ते जीवनातील अडथळे दूर करतात. या शुभ प्रसंगी येथे उपस्थित राहणे हे माझे भाग्य आहे.”

या प्रसंगी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगल प्रभात लोढा, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम हे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करत , “गणेशोत्सवाच्या पावन प्रसंगी ‘वर्षा’ निवासस्थानी नड्डा जी व त्यांच्या परिवाराचे स्वागत करण्याचा सन्मान मिळाला,” असे नमूद केले.

इतिहासाचा उल्लेख करताना नड्डा म्हणाले की, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि हा उत्सव सामाजिक तसेच सांस्कृतिक व्यासपीठ ठरला. स्वातंत्र्य संग्रामात जनतेला एकत्र आणण्यात या उत्सवाची मोठी भूमिका राहिली. “आज त्याला १३३ वर्षांची परंपरा लाभली आहे,” असे त्यांनी सांगितले.

देशाच्या भविष्याविषयी बोलताना नड्डा म्हणाले, “भारत आत्मनिर्भर राष्ट्र व्हावे, यासाठी मी गणरायाचे आशीर्वाद मागितले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपण मजबूत, सुरक्षित, समृद्ध आणि विकसित भारताकडे वाटचाल करत आहोत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बाप्पा आपल्याला बळ देणार आहेत.”

सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असताना, नड्डा यांची भेट ही सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली आहे.

Comments
Add Comment