
महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे
ध्रुवानंतर आठव्या पिढीत अंग नावाचा राजा झाला. त्याच्या पत्नीचे नाव सुनिथा असे होते. त्याला अपत्य नव्हते. म्हणून अंगाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला. यज्ञ समाप्तीनंतर यज्ञातून एक यज्ञ पुरुष प्रकट होऊन त्याने प्रसादरूपी खीर अंगाला देऊन पत्नीस देण्यास सांगितले. पुढे कालांतराने सुनीथाला पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव वेन होते.
क्रूर व अधर्मी वेन बालपणापासूनच हा वेन अधर्मी होता. सुनीथा ही मृत्यूची कन्या होती व त्यामुळे आजोबाचे गुण वेनमध्ये आल्याने तो अधार्मिक झाला होता. तो आपल्या सवंगड्यांना त्रास देत असे, मारीत असे. पशु-पक्ष्यांचाही क्रूरतेने बळी घेत असे. त्याची दुष्ट वृत्ती पाहून राजा अंगाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र वेन सुधारला नाही. त्याला पाहताच लोक घाबरून वेन आला वेन आला म्हणून पळून जात असत. त्याच्या या सर्व दुर्गुणामुळे त्रासलेल्या अंगाने राजमहाल सोडून वनात प्रस्थान केले. अंग राजकारभार सोडून गेल्यामुळे ऋषीमुनींनी वेनला राज्याभिषेक केला. आधीच क्रूर असलेला वेन अधिकार प्राप्तीमुळे स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागला व महापुरुषांचाही अपमान करू लागला इतकेच नव्हे तर त्यांने राजाशिवाय कोणीही श्रेष्ठ नाही तेव्हा सर्व प्रकारची धार्मिक कृती बंद करून केवळ राजाचीच आराधना करावी, अशी आज्ञा काढली. हे एकून सर्व प्रजाजन त्रस्त झाले. ऋषीमुनी संकटात पडले. त्यांनी राजमहालात जाऊन राजाला समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला; परंतु वेन कोणालाही ऐकेनासा झाला होता. अखेर सर्व ऋषीमुनींनी मंतरलेल्या दर्भाच्या साह्याने त्याला ठार केले व आश्रमात परत गेले. तेव्हा वेनची शोकाकुल माता सुनिथा मंत्र सामर्थ्याने तसेच अन्य उपायाने आपल्या पुत्राच्या शवाचे रक्षण करू लागली.
पृथू श्रीहरीचा अंश ब्राह्मणांनी वेनच्या मृत शरीराच्या बाहूचे मंथन केले असता त्यातून एक तेजपंज पुरुष व सुंदर स्त्री निर्माण झाले. हा पुरुष म्हणजे साक्षात श्रीहरीचा अंश पृथू होता व ती स्त्री म्हणजे माता लक्ष्मीचे स्त्री रूप आर्ची होते. त्यांच्या जन्माच्या वेळी ब्राह्मण पृथूची स्तुती करू लागले. गंधर्व गायन करू लागले. सिद्ध पुष्प वर्षाव करू लागले. अप्सरा नाचू लागल्या. आकाशामध्ये शंख, तुताऱ्या, मृदंग, दुंदुभी आदी वाद्ये वाजू लागली. ब्रह्मदेवासह सर्व देव ,ऋषी आणि पितर आपापल्या लोकांमधून त्या ठिकाणी आले. त्यांनी पृथूच्या हातावर भगवान विष्णूंच्या हस्तरेषा आणि चरणावर कमळाचे चिन्ह पाहून त्यांना नमन करून शुभाशीर्वाद दिले. वयात आल्यानंतर जनतेने पृथूचा राज्याभिषेक केला. तेव्हा कुबेराने सुवर्ण सिंहासन दिले. वरुणाने चंद्रासारखे प्रकाशमय आणि यातून सदैव पाण्याचे तुषार उडत होते असे छत्र दिले. इंद्राने मुकुट, ब्रह्मदेवांनी वेदमय कवच, विष्णूने सुदर्शन चक्र, रुद्राने तलवार, तसेच अन्य सर्व देवांनी आपापल्या जवळची श्रेष्ठ वस्तू व आयुधे व गुण पृथूला अर्पण केली.
पृथूद्वारा पृथ्वीचे दोहन त्यावेळी पृथ्वी अन्नहीन झाली होती. तिने काहीही उगवणे बंद केले होते. त्यामुळे प्रजा भुकेमुळे व्याकुळ झाली होती. त्यांची शरीरे अगदी सुकून किडकिडित झाली होती. त्यामुळे प्रजेने पृथूजवळ येऊन आपली ही विपदा कथन केली. तेव्हा पृथूने धनुष्याला बाण लावला ते पाहून पृथ्वी भयभीत झाली. ती गाईचे रूप घेऊन पळू लागली. पृथू तिचा पाठलाग करू लागला. अखेर पृथ्वी पृथूला शरण आली. पृथ्वी तिला तू पूर्वी ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेल्या अन्य इत्यादी विजांना आपल्यामध्ये दडवून ठेवले आहे आणि आता ते बाहेर काढत नाहीस तू यज्ञातून हविर्भाग घेतेस; परंतु बदल्यात प्रजेला अन्न का देत नाहीस. तेव्हा पृथ्वी म्हणाली “हे प्रभो! पृथ्वीवर अराजक माजले होते. सर्व लोक चोराप्रमाणे झाले होते. यमनियमादी व्रतांचे पालन न करणारे दुराचारी लोकच पृथ्वीवरील अन्नधान्य खाऊन टाकत. त्यामुळे अन्नासाठी लागणाऱ्या व सर्व वनस्पती मी गिळून पोटात साठविल्या होत्या. आपण आता योग्य वासरू दोहनपात्र व दोहनाची व्यवस्था केल्यास मी त्या वस्तू आपणास परत देईन असे आश्वासन दिले. तेव्हा सर्व जाती व समाजातील प्रमुखांनी वासराच्या रूपाने दोहन करून आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू प्राप्त करून घेतल्या. हे पाहून पृथूला आनंद झाला. त्याच्या मनात पृथ्वीबद्दल कन्येप्रमाणे प्रेम उत्पन्न झाले म्हणून पृथ्वीला पृथूची कन्या असेही मानल्या जाते. पृथूच्या पुण्यबलाने पापी वेनचा नरकवासही टाळला पृथूने पृथ्वी व प्रजा समृद्ध केली.पृथूच्या आधी लोक आपापल्या सोयीप्रमाणे बेधडक इकडे तिकडे फिरत व राहत होते. पृथ्वीतलावर नगरे गावे विभाग नव्हते. पृथूने भूमी सपाट करून प्रजेसाठी सगळीकडे यथायोग्य निवासस्थानाचे विभाग तयार केले. गावे, कसबे, नगरे, किल्ले, गौळवाडी, पशूंचे गोठे, छावण्या, खाणी, खेडी, आदी निर्माण केल्या. त्यांनी प्रजेचे योग्य रीतीने पालन केले. दृष्टांचे दमन केले. प्रजेला व राज्याला समृद्ध केले. त्यामुळे त्याची सर्वत्र कीर्ती पसरली .
पृथूला देवांचा उपदेश व आत्मबोध पृथूने ९९ यज्ञ केले. शंभराव्या यज्ञासाठी देव ऋषी, मुनी, गंधर्व, अप्सरा आदी सर्व उपस्थित होते. हे पाहून इंद्र देव अस्वस्थ झाले. त्यांना पृथूचा हा उत्कर्ष सहन झाला नाही. म्हणून त्यांनी यज्ञात विघ्न आणण्याचे ठरविले. त्याने पाखंडी वेश धारण करून यज्ञाचा घोडा पळवीला. अत्रिमुनींच्या हे लक्षात येताच त्यांनी पृथूच्या मुलांना त्याच्या पाठलागावर पाठविले त्याला येताना पाहून इंद्राने वेष व घोडा यांचा त्याग करून तो अंतर्धान पावला. त्याच्या या पराक्रमामुळे महर्षींनी त्याचे नाव विजेताश्व असे ठेवले. त्याने घोडा आणून युपाला बांधला. त्यावेळी पुन्हा अंधार निर्माण करून इंद्राने पुन्हा तो अश्व पळविला. हे पाहून पृथूला अत्यंत राग आला. त्याने धनुष्यबाणाने इंद्राचा नेम घेतला असता ब्राह्मणांनी त्यांना अडविले व यज्ञांची दीक्षा घेतल्यानंतर यज्ञ पशुशिवाय कोणाचाही वध करता येत नाही हे समजाविले. ब्रह्मदेवांनीही त्याला तू व इंद्र हे एकाच भगवान श्रीहरीचे शरीर आहात त्यामुळे इंद्रावर राग करू नकोस. तसेच तू मोक्ष धर्म जाणणारा आहेस म्हणून तुला आता या यज्ञाच्या अनुष्ठानाची आवश्यकता नाही असे सांगीतले. पृथूनेही त्यांचे म्हणणे मान्य करून इंद्राबरोबर प्रेमपूर्वक मैत्री केली. तसेच सर्व देवांनी यज्ञांनी तृप्त होऊन पृथूला इच्छितो वर दिले. स्वतः विष्णूंनी येऊन पृथूला उपदेश दिला. तसेच सनकादी मुनींनीही पृथूला आत्मबोध दिला.
पृथूचा प्रजेला उपदेश पृथूने आपल्या प्रजेला एकमेकांचे दोष न पाहाता हृदयात भगवंताचे स्मरण करीत आपापल्या कर्तव्याचे पालन करीत राहण्याचा उपदेश दिला. पृथूची कीर्ती त्रिलोकात पसरली. कालांतराने त्याने आपल्या मुलांकडे राज्याचा भार सोपवून स्वतः पत्नीसह वानप्रस्थान स्वीकारला व हरिचिंतनात व आराधनेत मग्न राहू लागला. जेव्हा त्याचा अंतकाल जवळ आला तेव्हा पृथूने आपले चित्त दृढतापूर्वक परमात्म्यामध्ये स्थिर करून तो ब्रह्मभावात स्थिर राहिला आणि वेळ आल्यावर आपल्या शरीराचा त्याग केला. महाराणी आर्चीनेही त्याच्यासोबत सहगमन केले.
पृथूचे हे परम पवित्र चरित्र वाचन व श्रवण करणाऱ्याचे कलियुगातील सर्व दोष नाहीसे होऊन तो पुत्रवान, धनवान, कीर्तिवान, पंडित बनतो असे श्रीमद्भागवतात सांगितले आहे.