
डॉ. साधना कुलकर्णी
पत्रव्यवहार हा अनेकांच्या हृदयातला एक हळवा, नाजूक आणि भावनाप्रधान असा कोपरा असतो. आजही अनेकांच्या कपाटात जपून ठेवलेल्या जुन्या पत्रांची चळत सापडेल. १ सप्टेंबर हा दिवस विश्व पत्र दिन म्हणून साजरा केला जातो. भावनिकच नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही पत्रविश्वाला मोठे महत्त्व आहे. त्यानिमित्ताने पत्रव्यवहार या लोप पावत चाललेल्या एका जिव्हाळ्याच्या संदेशवहनाला उजाळा देण्याचा एक प्रयत्न.
‘पत्र लिही पण नको पाठवू शाईमधून काजळ गहिरे, लिपी रेषांच्या जाळीमधूनी, नको पाठवू हसू लाजरे. चढण लाडकी भुवई मधली, नको पाठवू वेलांटीतून, नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून.’
इंदिरा संत यांची ही कविता वाचताना आपण (अर्थातच मध्यमवयीन पिढी) भूतकाळात केव्हा प्रवेश करतो हे समजतही नाही आणि पत्रांच्या त्या अनोख्या, जादूई विश्वात हरवून जातो. पत्रव्यवहार हा अनेकांच्या हृदयातला एक हळवा, नाजूक आणि भावनाप्रधान असा एक कोपरा असतो. आजही कित्येकांच्या कपाटात, जपून ठेवलेल्या जुन्या पत्रांची चळत सापडेल याची खात्री आहे. १ सप्टेंबर हा विश्व पत्र दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पत्रव्यवहार या लोप पावत चाललेल्या एका जिव्हाळ्याच्या संदेश वहनाला उजाळा देण्याचा एक प्रयत्न करायला हवा.
मानवी जीव हा संवादाशिवाय राहू शकत नाही. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे संवाद ही त्याची प्राथमिक गरज आहे. आदिमानवाच्या हाळी देणाऱ्या संवादापासून आजच्या इन्स्टाग्रामपर्यंतचा संदेशवहनाचा हा प्रवास विलक्षण थक्क करणारा आहे. पण यात सगळ्यात सहज सोपे, लोकप्रिय, प्रभावी आणि अनेक शतकांपासून अविरत सुरू असलेले माध्यम म्हणजे पत्रलेखन अर्थात टपाल सेवा. टपाल सेवेच्याही आधी पत्रलेखन होतेच. पण पोस्ट खाते नसल्याने निरोप्यांच्या हाती पत्र पोहोचवले जात असे. पौराणिक काळात रुक्मिणीने कृष्णाला आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी पत्र लिहिल्याची नोंद आहे. चांगदेवाने तर ज्ञानेश्वरांना कोरे पत्र पाठवले. त्याचा अर्थ मुक्ताबाईला समजला आणि चांगदेवांना मुक्ताबाईसारखा गुरू लाभला आणि चांगदेव पासष्टीची निर्मिती झाली. पत्रातील ‘ध’चा ‘मा’ केल्यामुळेच पेशवाईत अनर्थ घडला. थोडक्यात काय, मानवी जीवनात पत्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे.
ईस्ट इंडिया कंपनीने १६८८ मध्ये मुंबई आणि चेन्नई येथे टपालसेवा सुरू केली. १७७४ मध्ये ती संपूर्ण देशात सुरू झाली. १८७८ मध्ये जागतिक पातळीवर युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना झाली आणि जास्तीत जास्त देश या युनियनचे सभासद असणारी ही एकमेव संघटना आहे. भारतात २५० वर्षांपासून तर पाश्चात्त्य देशात त्याही आधीपासून पत्रलेखनाची परंपरा आहे. अनेक थोर विचारवंत, तत्त्वज्ञ, साहित्यिक, लोकनेते, शासनकर्ते यांनी पत्रलेखनाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, मार्टिन ल्युथर किंग, अब्राहम लिंकन, थोरो, साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक महानुभावांनी पत्रलेखनातून अमूल्य असे साहित्यिक, वैचारिक समाजप्रबोधन केले. त्यामुळेच या पत्रसंपदेच्या संग्रहाची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आणि अशा असामान्य पत्रांना साहित्याचा दर्जा देऊन पत्र वाङ्मय म्हटले गेले. हा एक ऐतिहासिक दस्तावेज असून त्या काळच्या संस्कृतीचा, राजकीय, सामाजिक परिस्थितीचा, लेखकाच्या मनोवृत्तीचा, व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा त्यातून घेता येतो. अनेक विद्यापीठांमध्ये या पत्र वाङ्मयाला संदर्भ ग्रंथ म्हणून जतन केले आहे. इतिहास संशोधकांना तर पत्र वाङ्मयातून अनेक महत्त्वाचे दुवे हाती लागतात. अलीकडच्या साहित्यात ‘लोकहितवादींची शतपत्री’, ‘विश्रब्ध शारदा’, नरहर कुरुंदकरांची समीक्षात्मक पत्रे, जीए कुलकर्णी आणि ग्रेस, सुनीताबाई देशपांडे आणि जी. ए. कुलकर्णी यांच्या पत्रांनी साहित्यात मोलाची भर टाकली.
वैयक्तिक पत्र व्यवहाराची तर गोष्टच वेगळी. हा एक हळवा, आनंददायी आणि स्नेह वृद्धिंगत करणारा अनुभव असतो. ही पत्रे औपचारिक आणि अनौपचारिक असतात. औपचारिक पत्रे, नोकरी-व्यवसाय, शासकीय, कार्यालयीन संबंधित असतात. त्यात स्वहस्ताक्षर नसते. मात्र अनौपचारिक पत्र लिहिणे व घरी आलेले पत्र वाचणे ही प्रक्रिया मनाला आनंद देणारी असते. आपल्या संबंधित व्यक्तीला पत्र लिहिण्यासाठी कागद-पेन घेऊन विचार करणे, भावनांना शब्दांची जोड देऊन प्रत्यक्ष कागदावर लिहिणे, ही रचनात्मक प्रक्रिया आहे. पत्र म्हणजे साचेबंद उत्तर किंवा निबंध नसतो. तो दोन व्यक्तिंमधला संवाद असतो. त्यामुळे मनातले विचार मेंदूतून हृदयाद्वारे बोटामध्ये येतात आणि शाईच्या साह्याने शब्दांमध्ये प्राण फुंकले जातात. कागदाला, पेनला जिवंत माणसाचा स्पर्श होणे, जे बोलणे शक्य नाही ते पत्रात लिहिणे, त्यातून डोकावणारी मनस्थिती, संस्कार, व्यक्तिमत्त्व, स्वभाव हे सगळे विलक्षण जिवंत आणि चैतन्यपूर्ण असते. पत्राची वाट पाहण्यात हुरहुर, उत्कंठा, अधिरता याबरोबरच संयमही असतो. प्रत्येक टप्प्यावर जिवंतपणाच्या स्पर्शाची खूण बाळगत अखेर पोस्टमनच्या हातून पत्र आपल्याला मिळते. त्यामुळे या जिवंत संदेशवहनाची तुलना कोणत्याही माध्यमाशी होऊ शकत नाही. पत्रामधील हस्ताक्षर हे आठवण, प्रेम, मनाची घालमेल-आंदोलने अशा अनेक बाजू स्पष्ट करत असते. हस्ताक्षर ही प्रत्येक व्यक्तीची ओळख असल्याने पत्र वाचताना लिहिणारी व्यक्ती आपल्यासमोर साकार होत असते. पत्रलेखनामुळे विचार, भावना, बुद्धी, भाषाशैली, हस्ताक्षर, शब्दसंपदा या अंगभूत कौशल्यांना वाव मिळत असतो. कागदावर हाताने, पेनाच्या मदतीने लिहिणे ही एक संपूर्ण वैयक्तिक क्रिया आहे. ती एकाग्रता वाढवते. ही समाधान देणारी, स्वनिर्मितीची एक कृती असते. त्याची तुलना कीबोर्डवर लिहिलेल्या लेखनाशी होऊ शकत नाही. पत्र लिहिण्यासाठी अक्षर ओळख, कागद आणि स्पेन एवढीच सामग्री लागते. तिच्या मदतीने जगातली कोणतीही व्यक्ती पत्र लिहू शकते. पत्र डिलीट होत नाहीत. इकडची पत्रे तिकडे फॉरवर्ड करण्याची सोय पत्रव्यवहारात नाही. ही सर्वात मोठी ताकद पत्रलेखनात आहे! वैयक्तिक पत्रातही नवनिर्मिती सर्जनशीलता असते आणि साहित्यिक मूल्य नसले तरी त्यात वाचणाऱ्याचा दिवस उजळून टाकण्याची क्षमता असते.
वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहता पत्रलेखन ही एक उपचारपद्धती आहे. पत्र लिहिण्याच्या विचारानेच व्यक्तीला उत्साह वाटू लागतो. मनात सकारात्मकता निर्माण होते. मेंदूच्या पेशी उत्तेजित होतात. कागद-पेनाचा स्पर्श हाताला होताक्षणी विचार आणि भावनांच्या निर्मितीला चालना मिळते. या भावनांना शब्दरूप देण्यासाठी बुद्धी कार्यान्वित होते. प्रत्यक्ष लिखाण करताना बोटे, हात, पाठीचा कणा, मान, डोळे आणि मेंदू यांचा समन्वय होऊन एकाग्रता साधली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया शरीर आणि मनाला एक सकारात्मक ऊर्जा देते. सेन्सरी आणि मोटॉर या दोन्हीही मज्जासंस्थेला सक्रियता देण्यासाठी पत्रलेखन ही एक उपचारपद्धती आहे, त्याला ‘मेंटल वर्कआऊट’ म्हणतात. पत्रलेखनामुळे डिप्रेशन आणि एकाकीपणा कमी होतो. मनात साचलेले विचार कागदावर उतरवले, की उदासीनता कमी होते. थोडक्यात काय, तर वैयक्तिक, सामाजिक, वैद्यकीय, व्यावसायिक, शैक्षणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रांना पत्रव्यवहाराने समृद्ध केले आहे.
डिजिटल माध्यमाच्या आहारी जाऊन आम्ही आज पत्रव्यवहार बंद केला आहे; परंतु त्यामुळे पत्रव्यवहाराचे महत्त्व कमी होत नाही. म्हणूनच ऑस्ट्रेलियन लेखक रिचर्ड सिंपकीन याने २०१४ पासून १ सप्टेंबर हा जागतिक पत्रलेखन दिवस साजरा करणे सुरू केले आहे. तसेच पत्रलेखनाला चालना देण्यासाठी भारतीय टपाल विभागातर्फे दरवर्षी पत्रलेखन स्पर्धा आयोजित होत असते. ‘ढाई आखर’ हे या स्पर्धेचे नाव असून त्यात अठरा वर्षांखालील आणि अठरा वर्षांवरील असे दोन वयोगट केले आहेत. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असते. विशेषतः शालेय मुलांमध्ये पत्र लेखनाला उत्तेजन देण्यासाठी, शाळांमधून हा उपक्रम राबवला जातो. आज मध्यमवयीन पिढी तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन स्वतः हाताने लिहिण्याचे विसरत चालली आहे, तर पत्रलेखन ‘आऊटडेटेड’ समजले जाते. हस्ताक्षर आणि पत्रलेखन ही आपली कौशल्ये आहेत. यांचा वापर न केल्यास हे कौशल्य अस्तंगत होईल. आज अनेक मध्यमवयीन लोक लिहिण्याचा सराव नसल्याने लिहू शकत नाहीत. हे किती गंभीर आहे. डिजिटल युगाचा वेग, संदेशवहनातील सहजता, क्षणात जगभर पोहोचण्याचे सामर्थ्य हे सर्व मान्य आहे. काळाची ती गरज आहे. पण त्यासाठी पत्रव्यवहार या समृद्ध, लोकप्रिय, सांस्कृतिक, दीर्घकालीन संदेशवहनाचा बळी देण्याची काहीच गरज नाही. इंदिरा संतांच्या कवितेचाच आधार घेत सांगायचे तर... ‘नको पाठवू अक्षरातुनी, शब्दांमधले गहिरे स्पंदन, कागदातुनी नको पाठवू स्पर्शामधला कंप विलक्षण, नको पाठवू असे कितीदा सांगितले मी, तू हट्टी पण, पाठविसी ते सगळे सगळे, पहिल्या ओळीमध्येच मिळते. पत्रच पुढचे त्यानंतर पण वाचायाचे राहून जाते.’ अशा शब्दातीत संवेदना एसएमएसमधून मिळतील का हो?