
स्नेहधारा : पूनम राणे
एक घनदाट अरण्य होतं. त्या अरण्यामध्ये प्राण्यांनी सभा घ्यायची ठरवली. हत्ती, सिंह, लांडगा, कोल्हा, वाघ हे पंच कमिटीतील मेंबर होते. वाढत्या लोकसंख्येमुळे माणसाचं निवासस्थान आपल्या थेट अरण्यापर्यंत येऊन पोहोचते आहे. हा खास विषय सभेचा होता.
थेट विषयासंबंधी न बोलता काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रमाचे निमित्त ठेवून आपण ही सभा आयोजित करावी असे सर्वांनुमते ठरले. तारीख, वार निश्चित करण्यात आला. सर्वांनी मिळून सभामंडप रंगीबेरंगी फुलांनी सजवला. मनमोहक रांगोळ्या काढल्या. सुरेख वातावरण निर्मिती करण्यात आली. कार्यक्रम पत्रिका तयार करण्याचे काम ससोबाकडे सोपवले. ससेरावाने उत्तम कार्यक्रम पत्रिका तयार केली. सूत्रसंचालनाची जबाबदारी चिऊताईकडे सोपवली.
नटून थटून सगळेच कार्यक्रमाला उपस्थित राहिले. कोकिळेने आपल्या मंजूळ आवाजात अप्रतिम ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून सगळ्यांची मने जिंकून घेतली. मोराने सुंदर नृत्य सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कोल्ह्याने आपल्या एकपात्री अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. माकड आणि त्यांच्या मुलांनी तालवाद्याच्या सुरात उत्तम समूहगीत सादर केले.
सर्वच प्राण्यांनी जोरदार टाळ्या वाजवून कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्राण्यांचे आत्मबळ, मनोधैर्य वाढवून कौतुक केले. शेवटी अध्यक्षीय भाषण करण्यासाठी जंगलचा राजा सिंह मोठ्या डौलाने व्यासपीठावर उभा राहिला. सर्व सभागृहात शांतता पसरली होती. सर्वजण कान देऊन ऐकत होते.
सर्वप्रथम सर्वांचे मी स्वागत आणि कौतुक करतो. आज इथे आपण सर्वांनी सुप्तगुणांचे प्रकटीकरण करून सभागृहात नवचैतन्य निर्माण केलेत. सर्वांचे मनोरंजन केलंत. त्यामुळे इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसत आहे. या भाद्रपद महिन्यात मनुष्यवस्तीमध्ये घरोघरी गणपतीचे पूजन चालू आहे.
लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधनासाठी, समाजबांधणीसाठी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव साजरे केले. त्यामुळे समाज संघटित होऊ लागला. समाजाची प्रगती झाली. दहा-दहा स्तराचे मनोरे रचून मोठमोठ्या दहीहंड्या एकजुटीच्या जोरावर फोडल्या जात आहेत.
मात्र... मात्र येत्या आधुनिक काळात भौतिक सुखांची लयलूट मोठ्या प्रमाणात होत आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. आपलं जंगल नष्ट होण्याची भीती वाटते आहे. भविष्यकाळात आपल्या जाती नष्ट होतील की काय? याची शंका मनामध्ये येत आहे. याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यासाठी आपणा सर्वांची एकजूट फार महत्त्वाचे आहे. आपल्या सर्वांमध्येही शक्ती युक्ती आणि बुद्धीचा संचार आहे.
ही एकजूट अखंड टिकावी, याकरिता या सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. आपण सर्व या सभेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे अध्यक्षीय भाषण संपवतो. अखेर छोट्या खारुताईने सर्वांचे आभार मानून कार्यक्रम समाप्तीची घोषणा केली.
दुसऱ्या दिवशी सर्वांनी एकत्र येऊन, पर्यावरण संबंधी घोषवाक्य तयार करून आंदोलन करण्याचे ठरवले. दोन दिवस आंदोलन केले. कोणीही या दिवसात अन्नग्रहण केले नाही. काहीजण चक्कर येऊन खाली कोसळले; परंतु आंदोलनात सर्वांनी सहभाग देऊन आंदोलन यशस्वी केले. आपल्या अरण्यात अतिक्रमण करणार नाही असे आश्वासन मनुष्यवस्तीकडून मिळाले.सर्वांनी आंदोलन यशस्वी झाल्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवून कमिटी मेंबरचे स्वागत केले.
तात्पर्य : संघटन आणि एकजुटीने अनेक मोठी मोठी कार्य साध्य करता येतात.