Sunday, August 31, 2025

सोनपावलांनी घरा, गौराई येई माहेरा !

सोनपावलांनी घरा, गौराई येई माहेरा !

मनाचा गाभारा - अर्चना सरोदे

आज माझ्या उंबरठ्यात उभी गौर सवाशीण चला लिंबलोण करू, आली माहेरवाशीण ओलांडूनी उंबरठा आली, गौराई वाड्यात सोनपावलांचे ठसे तिचे, पडती घरात

पूर्वांपार चालत आलेल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण, व्रत वैकल्ये यांना जनमनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच इथे सांस्कृतिक सण उत्साहात साजरे होतात. गणेश चतुर्थी हा सगळ्यात मोठा सण. राखीपौर्णिमा झाल्यानंतर वेध लागतात ते गणेशाच्या आगमनाचे. नुकतेच घरोघरी गणरायाचे आगमन मोठ्या थाटामाटात झाले. महिनाभर आधीपासून चालू असलेली लगबग, धावपळ अखेर गणरायाचे स्वागत करूनच थोडी विसावली. पण घरातील स्त्रियांची लगबग मात्र इथेच थांबत नाही बरं...!

त्या माहेरवाशिणी येणार म्हणून तिच्या पाहुणचाराच्या तयारीला लागतात देखील. माहेरवाशिणींना माहेराची ओढ लावणारा सण म्हणजेच ज्येष्ठा गौरी आगमन. अतिशय उत्साहाने गौराईचा हा सण साजरा करण्यासाठी आणि माहेरवाशिणींचे कोडकौतुक पुरवण्यासाठी सासुरवाशिणी अगदी सज्ज होतात. बाप्पाच्या आगमनानंतर साधारण चार दिवसांनंतर घरोघरी गौराईचे आगमन होते. काही ठिकाणी गौरी म्हणून पूजन करतात, तर काही ठिकाणी महालक्ष्मी म्हणून पूजतात.

पहिल्या दिवशी आगमन, दुसऱ्या दिवशी पूजन व पाहुणचार आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन असे तीन दिवस या माहेरवाशिणींच्या घरोघरी वात्सव्य असते. अनुराधा नक्षत्रावर त्यांची स्थापना केली जाते. ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर त्यांचे विसर्जन करण्यात येते. गौराईच्या आगमनाने घराघरांत चैतन्य आणि पावित्र्याने भरलेले मंगलमय वातावरण असते. काही ठिकाणी धातूची किंवा मातीची प्रतिमा करून अथवा कागदावर श्री महालक्ष्मीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी वा महालक्ष्मी म्हणून पूजन केले जाते. बहुतांश ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुगंधी फुले येणाऱ्या वनस्पती अथवा तेरड्याची रोपट्याची एकत्र बांधून त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्या मूर्तीला साडी नेसवून विविध अलंकारांनी सजवतात. गावाकडे सगळ्या सवाष्णी नटूनथटून नदीवर जातात. नदीतील पाच खडे उचलून तेरड्याचे पान वाहून पुजा केली जाते आणि उत्साहाने गौर म्हणून त्या खड्यांना घरी आणले जाते. घरी आल्यानंतर गौर आणणाऱ्या सवाष्णींचे गरम पाण्याने पाय धुतले जातात. त्यांना हळद-कुंकु लावून औक्षण केले जाते. घरात आणताना दारात धान्याचे माप ठेऊन ते गौरींनी ओलांडायची प्रथा आहे. तिचे आगमन अतिशय शुभ आणि धनधान्यांच्या सोनपावलांनी होत असल्याची समजूत असल्याने या समयी हळदीकुंकुवाची पावलं देखील काढली जातात. दारोदारी रांगोळ्या काढण्यात येतात. त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना संपूर्ण घरातून फिरवण्यात येतं. स्वयंपाक घर, झोपायची खोली, कपाटं, तिजोरी असं सगळं सगळं फिरवून “या सर्व ठिकाणी तुझा सदैव वास असू दे” अशी महालक्ष्मीला प्रार्थना केली जाते. दुसऱ्या दिवशी गौराईला जेऊ घालतात. पुरणावरणाचा सगळा स्वयंपाक तयार केला जातो. १६ किंवा ३२ भाज्यांची एकत्र भाजी तयार केली जाते. आगमन आणि महानैवेद्याचा दिवस थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि तिसरा दिवस येतो तोच मुळी गौराईला निरोप द्यावा लागणार ही हुरहुर घेऊनच. तीन दिवस पाहुणचाराला आलेली माहेरवाशिणीला निरोप द्यावा लागणार म्हणून मन उदास होते. जड अंतःकरणाने रितीप्रमाणे गौराईला दहीभाताचा आणि करंजीचा नैवेद्य दाखवला जातो. अक्षदा वाहून “पुनरागमनायच” म्हणत ओटी भरून गौराईला निरोप दिला जातो.

दोन दिवस राहून, निघे गौराई माघारा ! देई प्रसन्न होऊन आशीर्वाद साऱ्या घरा !! अशी ही माहेरवाशीण माहेरचा पाहुणचार घेऊन प्रसन्न होते आणि साऱ्या घरावर आपल्या आशीर्वादाची फुले उधळून गौराई आपल्या घरी परतते.

Comments
Add Comment