ओंजळ : पल्लवी अष्टेकर
आजच्या धावपळीच्या युगात, जेव्हा आपण इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडलेलो आहोत, त्याच वेळी अनेक लोक मानसिक, भावनिक आणि सामाजिक पातळीवर एकटे पडत आहेत. सामाजिक एकाकीपणा ही आता एक गंभीर सामाजिक समस्या झाली आहे, जी केवळ वृद्धांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तरुण, प्रौढ आणि अगदी लहान मुलांनाही ती आपल्या कवेत घेते आहे.
एकाकीपणा म्हणजे केवळ एखाद्या व्यक्तीच्या आजूबाजूला कोणी नसणे नव्हे, तर मनातल्या मनात आपण एकटे असल्याची भावना निर्माण होते. काही वेळा माणूस गर्दीत असूनही एकाकी असतो, तर कधी माणूस एकटाच असूनही समाधानी असतो.
‘माणूस हा समाजशील प्राणी आहे’ असं जरी आपण मानत आलो असलो, तरी आजचा माणूस अधिकाधिक एकटा पडत चालला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे नोकरीच्या निमित्ताने माणसं गावापासून, कुटुंबापासून दूर जातात. कामाच्या वेळा लांबतात, थकवा वाढतो आणि उरतो तो एकाकी वेळ. वृद्धांना त्यांच्या व्यस्त मुलांकडून वेळ मिळत नाही व तरुण पिढीला मैत्रीच्या खऱ्या नात्यांची भूक लागलेली असते.
कुंदाताईंचे वय आता ऐंशीला झुकलेले आहे. पूर्वी त्यांच्या नवऱ्याचा पगार जेमतेमच होता, म्हणून कुंदाताईंनी नोकरी धरली. दिवस, महिने, वर्ष भराभर पळत होती. मुलगी लग्नं होऊन सासरी गेली. मुलाने परगावी आपला संसार थाटला. काळाच्या ओघात कुंदाताईंच्या पतीचे निधन झाले. कुंदाताई एकट्या पडल्या. त्यांचे वय वाढत होते. कुणाच्या आधाराशिवाय त्यांना जगणे कठीण वाटत होते. शेवटी कुंदाताईंच्या मुलीने त्यांना आपल्याकडे आणले. आता त्यांचा वेळ चांगला जाऊ लागला. मुख्य म्हणजे पूर्वी असलेली असुरक्षिततेची भावना जाऊन मनाला सुरक्षितता वाटू लागली.
सामाजिक एकाकीपणा म्हणजे एखाद्या व्यक्तीचे इतर लोकांशी पुरेसे संबंध न ठेवणे किंवा सामाजिक सहभाग कमी होणे. यामध्ये केवळ शारीरिकदृष्ट्या एकटे राहणे एवढेच नव्हे, तर मानसिकदृष्ट्या कुणाशीही जोडलेले नसणे, आपल्याला कोणी समजून घेत नाही किंवा आपली कोणी साथ देत नाही, अशी भावना असणेही आले.
पूर्वीच्या काळी लोक एकत्र कुटुंबात राहात असत. एकत्र आलेले जीवन माणसाला आधार देत असे. आता मात्र ‘न्यूक्लिअर फॅमिलीची’, एकमेकांना वेळ देण्याची क्षमता कमी झाली आहे. शहरातील जीवन स्पर्धा, यश, वेग या चक्रात फिरत आहे. अशा चक्रात मनुष्य संवाद, सहवास, सहवेदना गमावून बसतो. संवादाची जागा आता ‘चॅट’, ‘इमोजी’ यांनी घेतली आहे. ही साधने माहिती पोहोचवतात, पण भावना पोहोचवू शकत नाहीत.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण एकमेकांशी सतत संपर्कात असतो; परंतु प्रत्यक्ष संवाद आणि संबंध कमी झाले आहेत. सोशल मीडियावर हजारो “फ्रेंड्स” असले तरी, खरी मैत्री किंवा भावनिक जिव्हाळा हरवलेला दिसतो.
आई-वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे, लहान मुलांना किंवा वृद्धांना घरी एकटे राहावे लागते. हे सर्व घटक सामाजिक एकाकीपणाला खतपाणी घालतात. सामाजिक एकाकीपणा ही एक मानसिक आरोग्याची समस्या बनत चालली आहे. एकटे राहणाऱ्या व्यक्तींमध्ये नैराश्य, चिंता, असुरक्षितता, आत्मविश्वासाचा अभाव अशा समस्या अधिक प्रमाणात आढळतात. दीर्घकाळ एकाकी राहिल्यास, व्यक्तीच्या विचारसरणीवर, निर्णयक्षमता व सर्जनशीलतेवर विपरित परिणाम होतो. शारीरिकदृष्ट्याही एकाकीपणाचे परिणाम दिसतात-उदा. हृदयविकार, उच्च रक्तदाब, निद्रानाश, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे इ. आज आपण ज्या सोयीसुविधांनीयुक्त जीवन जगतो, त्यात ‘स्वातंत्र्य’ आणि ‘गोपनीयता’ यांचा आग्रह आहे. लोक एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ नकोसे समजतात. पण याच बरोबरीने, भावनिक आधार, संवाद आणि आपुलकीची कमतरता भासत आहे. अनेकदा डिजिटल जगात आपण कनेक्टेड असतो, पण खरं कनेक्शन हरवून बसतो. समाधान, सोबती व जिव्हाळा हे कोणत्याही आधुनिक साधनांपेक्षा अधिक मौल्यवान आहेत.
मोबाइल फोन, इंटरनेट, सोशल मीडिया ही संवादाची साधने असली तरी, त्यांनी खरी मैत्री आणि सहवासाची जागा घेतलेली नाही. संवादात सौहार्द आणि आत्मीयता हरवते आहे.
पूर्वी एकाकीपणा वृद्धांमध्ये अधिक दिसून येत असे, पण सध्या कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी, नवतरुण व नवविवाहित जोडपी देखील या समस्येने ग्रासलेली दिसतात. करिअरच्या स्पर्धा, रिलेशनशिपमधील तणाव, सोशल मीडियावरच्या दिखाव्यामुळे निर्माण होणाऱ्या न्यूनगंडामुळे तरुण मन अधिक अस्थिर होत आहे.
कुटुंब, मित्र, शेजारी, सहकारी यांच्याशी नियमित संवाद साधावा. छोटे गट, सामाजिक संस्था, सांस्कृतिक कार्यक्रम यात सहभाग घ्यावा. आपली सुखं दुःखं एकमेकांना सांगावीत. यातून मानसिक आरोग्य चांगले राहते. काही काळ सोशल मीडियापासून दूर राहून प्रत्यक्ष भेटी आणि संभाषणावर भर द्यावा. घरामध्ये ‘क्वालिटी टाइम’ द्यावा.
जेवण एकत्र घेणे, घरातील वृद्धांशी गप्पा मारणे, मुलांसोबत खेळणे या छोट्या गोष्टीही मोठा फरक घडवू शकतात. जर एकाकीपणामुळे नैराश्य किंवा चिंता निर्माण होत असेल, तर तज्ज्ञ सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. सायकोथेरपी, काउन्सेलिंग या सेवा खूप उपयोगी ठरतात. त्यामुळे शाळा, महाविद्यालये, कार्यस्थळे, नगरपालिका आणि समाजसेवी संस्था यांनी एकत्र येऊन सहकार्य करणे गरजेचे आहे. भौतिक सुखसुविधा, गगनचुंबी इमारती, स्मार्टफोन आणि आभासी जगाच्या गर्दीत माणूस माणसाला हरवत चालला आहे.
“माणूस माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होतो, तेव्हाच समाज खऱ्या अर्थाने समृद्ध होतो” हे सत्य विसरून चालणार नाही. म्हणूनच, आधुनिकतेच्या प्रवाहात आपले सामाजिक नाते व भावनिक संबंध जपले पाहिजेत. आपण सगळेच कधीतरी एकटे पडतो, पण त्यातूनच आपल्याला नवे अर्थ, नवे नाते, नवी ऊर्जा मिळू शकते. फक्त थोडी मदत हवी व मन मोकळं करायला कोणी हवं असतं.