प्रशांत कोठावदे । सटाणा : तालुक्यातील अंबासन येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून गावातील एका डुक्कर मालकाने स्वतःच्या डुक्करांचे रक्षण करण्याच्या नावाखाली गावात फिरणाऱ्या कुत्र्यांना विष देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, यात सुमारे वीसहून अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. या घटनेत काही मांजरांचाही बळी गेला आहे. ही घटना गावातील अंगणवाडी केंद्राजवळ व चौकात घडल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावातील अनेक नागरिकांनी आरोप केला आहे की, डुक्कर मालकाने आपली डुकरे सुरक्षित राहावेत यासाठी गावात काहीतरी विषारी पदार्थ टाकून कुत्र्यांना ठार मारण्याचे कृत्य केले. या प्रकारामुळे गावातील नागरिकांनी व प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात स्वतः डुक्कर मालकाने पोलीस ठाण्यात कबुली दिली आहे. परिसरात फिरणाऱ्या अनेक कुत्र्यांनी विषारी अन्न खाल्ले आणि काही वेळातच तडफडून मृत्यूमुखी पडले. मृत्यूमुखी पडलेले कुत्रे आणि मांजरी काही काळ परिसरात पडून होते. त्यामुळे या दृश्याने गावकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली. जायखेडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकारी डी एस. पठाडे यांनी कुत्र्यांचे शवविच्छेदन केले.
ग्रामपंचायतीच्या आवारात दरवेळी ग्रामसभेत गावानजीकचे शेतकरी शेतीचे नुकसान करणाऱ्या डुकरांचा प्रश्न उपस्थित करत होते. मात्र डुक्कर मालकांकडून कुठलाही बंदोबस्त केला जात नव्हता. ग्रामसभेतही याबाबत नेहमीच साधकबाधक चर्चा होत होत्या. सदर डुक्कर मालकांनी सात दिवसांत गावातील डुक्कर हद्दपार करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनानेही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.